होमपेज › Belgaon › उसाच्या ट्रॉलीला कारची धडक

उसाच्या ट्रॉलीला कारची धडक

Last Updated: Nov 18 2019 1:25AM
निपाणी : प्रतिनिधी

समोरून निघालेल्या उसाच्या ट्रॅक्टरला कारची पाठीमागून धडक बसली. यामध्ये कारमधील वृद्धा ठार, तर सातजण गंभीर जखमी झाले.  पुणे-बंगळूर महामार्गावर यमकनमर्डी पोलिस ठाण्यासमोर रविवारी पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात घडला. 

हे सर्वजण शिर्शी (ता. जोयडा) येथून कोल्हापूरकडे नामकरण सोहळ्यासाठी निघाले होते. सुधा रवींद्र पै (वय 55) असे मृत वृद्धेचे नाव आहे. त्यांच्यावर बेळगाव येथील  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिसांत झाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, कारमधून (के.ए.25 एम.ए.7972) चालक सुनील शेट्टी(वय 23) हा शिरसी येथील पै कुटूंबियातील मयत सुधा यांच्यासह व्यकंटेश पै(वय 88),रवींद्र पै( वय 55),दिपा पै (वय 36), गुरूप्रसाद पै (वय 24), दामोदर पै (वय 51),खुशी पै(वय 12) यांना घेऊन कोल्हापूर येथे नामकरण सोहळ्यासाठी जात होते. त्यांची कार यमकनमर्डी पोलिस ठाण्यासमोर उतारावरून निघाली होती. यावेळी संकेश्‍वरच्या दिशेने ऊस भरून जाणार्‍या टॅ्रक्टर ट्रॉलीला ( एमएच 44 एस 2411) कारची पाठीमागून धडक बसली. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्‍काचूर झाला.

कारमधील वृद्धेेचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह 7 जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती  मिळताच   पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे  निरीक्षक सचिन हुक्केरी यांनी यमकनमर्डी  पोलिसांना माहिती देऊन कारमध्ये अडकून पडलेल्या जखमींना कंपनी व 108 वाहनातून उपचारासाठी बेळगाव येथील सरकारी व खासगी रुग्णालयात हलविले.

यावेळी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची भीषणता इतकी होती की, कारचा चक्‍काचूर होऊन कारमधील साहित्य अस्ताव्यस्त होवून पडले होते.  पहाटेची वेळ असल्याने कारमध्ये अडकून पडलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी पोलिस व पुंजलॉईडच्या पथकाला  शर्थीचे  प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी हुक्केरीचे सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी, यमकनमर्डीचे उपनिरीक्षक रमेश पाटील, हवालदार नगारे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी गर्दी झाली होती. याबाबत कारचालक सुनील शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनिरीक्षक रमेश पाटील यांनी पुढील तपास चालविला आहे.

ऊस ट्रॅक्टरचा धोका कायम 

उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागे रिफ्लेक्टर, रेडियम नसल्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहन चालकाला याचा अंदाजच येत नाही. हा अपघात देखील तसाच झाला असल्याचे सांगण्यात येते. 
 
नातवाचा नामकरण सोहळा अर्ध्यावरच....

या अपघातातील मयत सुधा पै यांचा मुलगा कोल्हापूर येथे वास्तव्यास आहे. त्या आपल्या कुटुंबासमवेत नातवाच्या नामकरण सोहळ्यासाठी कारने जात होत्या. पहाटेच्या सुमारास यमकनमर्डी हद्दीत त्यांच्या कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडक बसल्याने सुधा यांना आपला प्राण गमवावा लागला. तर, इतर सर्वजण जखमी झाले. यामुळे नातवाचा नामकरण सोहळा अर्ध्यावरच राहिला.