Fri, Apr 23, 2021 14:31
संप सुरू, बससेवा बंद

Last Updated: Apr 08 2021 2:03AM

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

सहावा वेतन आयोेग लागू करा, सर्व सुविधा द्या यासह विविध मागण्यांसाठी मार्ग परिवहन कर्मचार्‍यांनी बुधवारपासून बेमुदत संपाला प्रारंभ केला. यामुळे संपूर्ण बससेवा ठप्प झाली होती. प्रशासनाकडून अनेक ठिकाणी खासगी बस, मॅक्सीकॅबची सोय करण्यात आली होती. अनेक इशारे देऊन खासगी वाहनचालकांनी जादा प्रवासी दराची आकारणी केली, तर संपाची कल्पना असल्याने बहुतेक प्रवासी बस स्थानकाकडे फिरकले नव्हते.

सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा, सहावा वेतन आयोग लागू करावा यासाठी बुधवारपासून जिल्ह्यातील सुमारे पाच हजार परिवहन बस कर्मचारी संपावर गेले. ते बसस्थानक किंवा आगाराकडे फिरकले नाहीत.  

प्रशासनाकडून काही मार्गांवर  खासगी बस, मॅक्सीकॅब, जीपची सोय करण्यात आली होती. हुबळी, धारवाड, बैलहोंगल, रामदुर्ग, गोकाक, चिकोडी, अथणी मार्गावर खासगी वाहने सोडण्यात आली होती. इतर तालुक्याला जाणार्‍या खासगी बस आणि मॅक्सीकॅबचालकांनी प्रत्येक तिकिटामागे 20 ते 30 रुपयांची जादा आकारणी केल्याचे आढळून आले.

मध्यवर्ती बस स्थानकात सुमारे 50 खासगी वाहने थांबून होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. कर्नाटक परिवहन महामंडळाचे सुमारे वीस कर्मचारी कामावर हजर होते. त्यामुळे केवळ चार ते पाच बस सोडण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्राच्या दोनच बस आल्या...

बुधवारी दिवसभर कोल्हापूर ते बेळगाव अशा दोनच महाराष्ट्र बस आल्या. इतर राज्यांच्या कोणत्याही बस आल्या नाहीत. गोव्यासाठी जाणारे प्रवासी बसस्थानकात अडकून पडले होते. खासगी वाहनचालकांनी केवळ सोयीच्या ठिकाणीच आपली सेवा सुरू केली होती. कर्मचार्‍यांनी परिस्थितीचे भान ठेवून संप मागे घ्यावा, असे आवाहन विभागीय नियंत्रक एम. आर. मुंजी यांनी केले आहे.