Wed, Sep 23, 2020 21:46होमपेज › Belgaon › दुचाकी चोरणारी आंतरराज्य टोळी ताब्यात

दुचाकी चोरणारी आंतरराज्य टोळी ताब्यात

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 11:50PMचिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी, सांगली. मिरज, शिरोळ, इचलकरंजी, कोल्हापूर, बेळगाव परिसरातून दुचाकी वाहने चोरून अन्यत्र विकण्यासह चेनस्नॅचिंग प्रकरणातील आंतरराज्य टोळीला 29 दुचाकींसह ताब्यात घेण्यात चिकोडी पोलिसांना यश आले.

चिकोडीबाहेरील गणेशनगरनजीक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून लांबवल्या प्रकरणी 10 रोजी संशयास्पद फिरणार्‍या करण शिवाजी बागडी (रा. म्हैशाळ, ता. मिरज), बबलू अब्बास पठाण (रा.मुल्ला गल्ली रायबाग), राघवेंद्र उर्फ रघू मोहन माने (रा.रायबाग) यांना दुचाकींसमवेत ताब्यात घेण्यात आले होते.

कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन्ही दुचाकी चोरीच्या असल्याची कबुली दिली. त्यांच्यासोबत  दुचाकी चोरणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले. यातील अप्पय्या सिध्दप्पा केसरगोप्प (21, रा. अंकली रोड, रायबाग), सद्दाम कलिंदर पठाण (26, रा. मुल्ला गल्ली रायबाग), संतोष शंकर सनदी (30, रा. जलालपूर, ता. रायबाग) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील चोरीच्या 29 मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या. गणेश चव्हाण (रा. रायबाग) फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेळगाव, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील दुचाकी चोरी, मंगळसूत्र, दागिने लुटणे, खिसे कापणे यासह अनेक प्रकरणांत यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून जप्त बहुतांश दुचाकी महाराष्ट्रातील आहेत. 

पोलिस उपअधीक्षक दयानंद पवार व सीपीआय मल्लनगौडा नायकर  यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडी कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपनिरीक्षक संगमेश होसमनी व गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक अमृत होसमनींच्या नेतृत्वाखाली ल पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. पथकात  एएसआय ए. टी.कोळ्ळूर, एएसआय के. ए. पटेल, हेड कॉन्स्टेबल  मठपती, महिला पोलिस जी. एस. कांबळे, जे. एम. लांडगे यांचा समावेश होता.