Thu, Sep 24, 2020 11:07होमपेज › Belgaon › बेळगाव : रेल्वेखाली माय-लेकराची आत्महत्या

बेळगाव : रेल्वेखाली माय-लेकाची आत्महत्या

Published On: May 22 2019 10:08AM | Last Updated: May 22 2019 11:59PM
बेळगाव : प्रतिनिधी

न्यू गांधीनगरमधील मारुतीनगर परिसरातील रेल्वे ट्रॅकवर माय-लेकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने दोन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; परंतु बारा वर्षांची मुलगी आईच्या हाताला हिसडा मारून पळून गेल्याने वाचली. आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत पतीविरोधात रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरारी असून, त्याचा शोध सुरू आहे. 

रेणुका यल्लाप्पा गुटगुद्दी (वय 32) व लक्ष्मण गुटगुद्दी (7) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब राहत असलेल्या पत्रेवजा शेडपासून रेल्वे रूळ अवघ्या 100 मीटरवर आहे. रागाच्या भरात महिलेने मुलगा लक्ष्मण व 12 वर्षांची सविता या दोघांनाही रेल्वे रूळाकडे ओढत नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलगी हाताला हिसडा मारून पळून गेल्याने वाचली.  

याबाबत घटनास्थळावरून व रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुटगुद्दी कुटुंब मूळचे  हुक्केरी तालुक्यातील करगुप्पी येथील आहे. यल्लाप्पा भीमराय गुटगुद्दी हा भाजीपाला विकतो. अनेक वर्षांपासून पती-पत्नी व त्यांची दोन मुले गांधीनगरजवळील मारुतीनगर परिसरात पत्रेवजा शेडमध्ये राहतात. या पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत असल्याचे शेजारी सांगतात. मंगळवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यानंतर रात्री अकराच्या सुमारास पत्नी रेणुकाने बारा वर्षाची मुलगी सविता व सात वर्षाच्या लक्ष्मणला हाताला धरून ओढत रेल्वे ट्रॅककडे नेण्याचा प्रयत्न केला.

राहत्या शेडपासून पासून ट्रॅक जवळच असल्याने ती तिकडे जाताना मुलीने आईच्या हाताला हिसडा मारून पळ काढला. यानंतर मायलेक ट्रॅकवर झोपल्यानंतर रात्री 11.30 वाजता जाणार्‍या मिरज-बेळगाव पॅसेंजरखाली सापडल्याचा संशय आहे. न्यू गांधीनगरमधील बंटरभवनच्या कंपाऊंडजवळ दोन मृतदेह पडल्याचे गेटमनने पाहिले व त्याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रेल्वेचे चाक गेल्यानंतर महिलेचा एक पाय तुटला असून आधी तो घटनास्थळावरून गायब होता. भटक्या कुत्र्यांनी पळविल्याच्या संशयातून तो आजूबाजूला शोधल्यानंतर सापडला. मुलाचे शिर धडा वेगळे झाले असून ते ट्रॅकच्या दुसर्‍या बाजूला पडले होते.  पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयाकडे पाठविला. 

घटनास्थळी घातपाताचा संशय  सुरू झाल्यामुळे माळमारुती ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश हंचनाळ हेदेखील दाखल झाले. रेल्वेचे उपनिरीक्षक बी. टी. वालीकर व त्यांचे सहकारी आधीच दाखल झाले होते. निसटून पळून गेलेल्या मुलीने दिलेल्या माहितीनंतर ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या घटनेची रेल्वे पोलिसांत नोंद झाली आहे. नातेवाईकांच्या आरोपामुळे पोलिसांनी यल्लाप्पाविरोधात  भादंवि कलम 306 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला. तो फरारी असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.

पती फरारी

पती यल्लाप्पाशी भांडणानंतरच पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, त्या आधी  रेणुकाच्या माहेरच्यांनी यल्लाप्पाने त्यांना मारल्याचा आरोप केला. कारण, पहाटे पाचच्या सुमारास यल्लाप्पाने फोन करून आपल्या सासरवाडीच्या लोकांना कल्पना दिली होती. शिवाय, घटनेनंतर तो फरारी झाल्याने त्याच्यावर संशय बळावला होता.