होमपेज › Belgaon › बेळगावला 24 तास पाणी दिवास्वप्नच?

बेळगावला 24 तास पाणी दिवास्वप्नच?

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 8:14PMबेळगाव : प्रतिनिधी 

बेळगावकरांना 24 तास पाणी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आणखी किमान आठ वर्षे थांबावे लागणार आहे. 2026 मध्येच पहिला टप्पा पूर्ण होईल, तर पूर्ण शहराला 24 तास पाणी पुरवले जाण्यासाठी 2041 साल उजाडावे लागणार आहे! म्हणजेच स्मार्ट सिटीच्या आजच्या युगात पाणी योजना राबवण्यासाठी अजून तब्बल 23 वर्षे म्हणजे जवळपास पाऊ़ण शतक वाट पहावी लागेल.

2005 पासून शहरातील 10 वॉर्डांना प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणी पुरवले जाते. हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. तरीही प्रायोगिकतेपासून प्रकल्पाकडे हा प्रवास करण्यासाठी अजून प्रशासनाला वर्षानुवर्षांचा कालावधी लागणार आहे. 24 तास पाणी योजनेसाठी जागतिक बँकेने बेळगाव शहरासाठी 662 कोटींचे कर्ज देऊ केले आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2026 पर्यंत 426 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यामध्ये 236 कोटी रुपयांचा निधी 2041 सालापर्यंत खर्च केला जाणार आहे.

कंत्राटदार मिळेना! 

दोन टप्प्यांतील हा निधी खर्च करण्यासाठी जागतिक पातळीवर कर्नाटक शहर मुलभूत विकास व अर्थ महामंडळाने निविदेद्वारे देऊ केलेले कंत्राट एखाद्या कंपनीने स्वीकारले तरच ते शक्य होणार आहे. कारण 24 तास  पाणी योजनेसाठी अर्थ महामंडळाने पहिल्यांदा काढलेली निविदा मलेशियन कंपनीने स्वीकारली होती. परंतु त्या कंपनीला कामाची ऑर्डर दिल्यानंतर त्या कंपनीने आपल्याकडून बेळगाव शहरासाठी 24 तास पाणी योजनेचे कामकाज शक्य नाही असे कारण माघार घेतली. त्यामुळे या योजनेच्या कामकाजाला विलंब झालेला आहे. 

दुसर्‍यांदा अर्थ महामंडळाने जागतिक पातळीवरची निविदा काढली. परंतु हे कंत्राट घेण्याकरिता एकही कंपनी पुढे आलेली नाही. त्यामुळे त्यासाठी पुन्हा आता तिसर्‍यांदा निविदा काढावी लागणार आहे. निविदा प्रक्रिया तिसर्‍यांदा स्विकारण्यात आली तरच या योजनेच्या कामकाजाला प्रारंभ होऊ शकेल. 

सध्याचा पुरवठा

सध्या बेळगाव शहराला राकसकोप व हिडकल जलाशयाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. बेळगाव शहरासाठी 24 तास पाणी योजना अंमलात अणावयाची असेल तर बेळगाव शहरासाठी तिसरी पाणी साठविण्याची व्यवस्था योजना सरकारने अंमलात आणण्याची नितांत आवश्यकता आहे. 

पर्यायी जलस्रोत काय?

राकसकोप जलाशय तुडूंब भरले तरी केवळ अर्धा टीएमसी इतकेच पाणी साठून राहते. हिडकल जलाशयाची क्षमता एकूण 51 टीएमसीची असली तरी तो जलाशय प्रामुख्याने पाटबंधारे योजनांसाठी वापरण्यात येणारा आहे. 24 तास पाणी योजनेसाठी हिडकल जलाशयामध्ये बेळगाव शहरासाठी ठराविक पाण्याचा साठा राखीव ठेवावा लागेल किंवा त्यासाठी तिसरी योजना हाती घ्यावी लागण्याची शक्यता आहे. हिडकल जलाशय पाणलोट क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या व्याप्तीमध्ये समाधानकारक पाऊस पडला तरच तो जलाशय पूर्ण भरू शकतो. परंतु पावसाचे प्रमाण कमी झाले तर तो जलाशय पूर्ण भरू शकत नाही. या कारणाकरिता जागतिक बँकेबरोबरच बेळगाव महानगरपालिका, कर्नाटक शहर पाणी पुरवठा मंडळ व कर्नाटक शहर मुलभूत विकास व अर्थ महामंडळाने 24 तास पाणी योजनेसाठी पाण्याचा तिसरा स्रोत शोधण्याची गरज आहे.