Tue, Sep 22, 2020 05:50होमपेज › Belgaon › सर्जिकल स्ट्राईकचे ‘घातक’ घडतात बेळगावात

सर्जिकल स्ट्राईकचे ‘घातक’ घडतात बेळगावात

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 1:32PM

बुकमार्क करा
बेळगाव : सतीश जाधव

भारतीय लष्कराच्या घातक कमांडो पथकाने एलओसीपार जाऊन पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आणखी एक कारवाई करून पाकिस्तानच्या सहा सैनिकांना यमसदनास धाडले. लष्कराकडून ज्या-ज्यावेळी  धक्कादायक कारवाई करण्याचा प्रसंग येतो, अशावेळी 20 जणांचे घातक पथक तथा घातक कमांडो आघाडीवर असतात. या कमांडो पथकाला बेळगाव येथे प्रशिक्षित केले जाते.

भारतीय सेनेतील प्रत्येक बटालियनमध्ये ‘घातक’ हे विशेष कारवाई करणारे पथक आहे. घातक हा हिंदी शब्द असून घातक म्हणजे जीवे मारणे होय. जनरल बिपिनचंद्र जोशी यांनी या पथकाचे हे नामकरण केले आहे.

‘घातक’ बेळगावात, ‘पॅरा’ आग्य्रात घातक कमांडो प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण बेळगावात दिले जाते.  घातक कमांडो प्रशिक्षणासाठी बेळगावमधील एमएलआयआरसी हे देशातील एकमेव केंद्र आहे. तर आग्य्रात पॅराकमांडो प्रशिक्षण चालते. पॅराशूटद्वारे विमानातून उडी घेऊन विशिष्ट ठिकाणी पोहोचून कारवाई करणे, हे पॅराकमांडोंचे काम. ते प्रशिक्षण आग्य्रात दिले जाते.


निवडीचे निकष काय? 

घातक कमांडोंमध्ये निवड करण्यात येणार्‍या जवानांना विविध प्रकारच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. 100 टक्के सुदृढ असणे, स्वतःच्या कुटुंबापासून सदैव दूर राहणे, विविध प्रकारचे सर्प पकडणे,  मानसिक क्षमता प्रबळ असणे, शत्रूला सामोरे जाण्याची क्षमता यासह विविध गुण पाहिले जातात. त्यानंतर घातक कमांडोंमध्ये या जवानांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर तब्बल दोन वर्षे कठोर प्रशिक्षण दिले जाते. 

अमेरिकेतही प्रशिक्षण

घातक कमांडोंना बेळगावात प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना लंडनमधील ब्रिटिश रॉयल मरिन (पॅरा) आणि ऑस्ट्रेलियातील सेकंड कमांडो रेजिमेंटच्या अंतर्गत खडतर प्रशिक्षण दिले जाते. याकरिता त्यांना काही कालावधीसाठी दक्षिण आफ्रिका व अमेरिकेतील घनदाट जंगलात प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. हे प्रशिक्षण अत्यंत गुप्तपणे देण्यात येते.

जबाबदारी काय? 

शत्रूने रचलेले सापळे उद्ध्वस्त करून कमीत कमी मनुष्यबळ गमावून शत्रूचे जास्तीत जास्त मनुष्यबळ नष्ट करणे ही घातक कमांडोंची मुख्य जबाबदारी असते. सैन्यदलाकडून करण्यात येणार्‍या शत्रूविरोधात विशेष कारवाईदरम्यान कमांडोंची मदत घेतली जाते. तसेच आपत्कालीन सेवेदरम्यानही कमांडोंना पाचारण केले जाते. देशातील अतिमहनीय व्यक्तींच्या संरक्षणासाठीही कमांडोंची नेमणूक केली जाते. सर्वाधिक शौर्य पुरस्कार आतापर्यंत सर्वाधिक परमवीर चक्र, अशोक चक्र असे सर्वोच्च पुरस्कार घातक कमांडोंना मिळालेले आहेत.