Wed, Aug 12, 2020 19:55होमपेज › Belgaon › वाळू पासधारकांवर पोलिसांकडून खटले

वाळू पासधारकांवर पोलिसांकडून खटले

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 10:33PMबेळगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील अनेक पोलिस स्थानकांकडून वाळूपुरवठादार  व्यावसायिकांनी प्रशासनाकडून वाळू वाहतुकीसाठी रितसर परवाना घेतला आहे. तरीही पोलिस वाळू व ट्रक जप्त करून त्यांच्यावर खटले दाखल करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक पोलिस खात्याच्या छळाला वैतागले आहेत. वाळू वाहतूक करण्याकरिता परवाने घेतले तरी पोलिसांकडून वसूली व खटले दाखल करण्याचे काम राजरोस सुरू आहे. पास असूनसुद्धा खटले दाखल करणार असाल तर पासची पद्धतच कशाला अवलंबिता, असा प्रश्‍न व्यावसायिकांकडून विचारला जात आहे. 

खनिज व भूगर्भ खात्याच्या अधिकार्‍यांनी व पोलिसांनी पास असूनदेखील वाळू वाहतूक करणारे ट्रक वाळूसह जप्त केले आहेत. खनिज व भूगर्भ अधिकार्‍यांनी घातलेले खटले व जामीन मिळविण्यासाठी त्या ट्रकचालकाला किंवा मालकाला जिल्हा न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागत आहे. पास असूनही खटले दाखल करणार असाल तर जिल्ह्यामध्ये कायद्याचे प्रशासन आहे की हुकूमशाहीचे, असा प्रश्‍नही विचारला जात आहे. ट्रक चालकाकडे वाळू वाहतुकीचा पास असेल तर तो अधिकार्‍यांकडून हिसकावून घेतला जातो व त्यांच्याकडून पोलिस बिदागी वसूल करण्याचेच काम करीत आहेत.

चिरीमिरी देऊनही खटले दाखल करण्याचे सत्र पोलिस व खनिज आणि भूगर्भ अधिकार्‍यांनी आरंभिले आहे. त्याच्या निषेधार्थ संबंधित व्यावसायिकांनी पोलिस खात्याच्या व खनिज आणि भूगर्भ खात्याच्या अधिकार्‍यांवर न्यायालयामध्ये खटले दाखल करण्याची तयारी चालवली आहे. त्यांचे बिंग फुटेल व वाळू व्यावसायिकांना न्याय मिळेल, यासाठी काही वकिलांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले.