होमपेज › Belgaon › करवेच्या कन्‍नडप्रेमाची किमत 30 लाख

करवेच्या कन्‍नडप्रेमाची किमत 30 लाख

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 11:56PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

कन्नड भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी लढा देण्याच्या नावावर कन्नड रक्षणवेदिकेच्या नेत्यांनी चालविलेला कारभार चव्हाट्यावर आला आहे. बंगळूर येथे अभिनेत्री सनी लिओनच्या कार्यक्रमाला अडथळा न आणण्यासाठी  30 लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार एका वृत्तवाहिनीने  उघडकीस आणून कन्नड संघटनांचा कारभार चव्हाट्यावर आणला  आहे.  बंगळूर येथे नववर्षानिमित्त अभिनेत्री सनी लिओनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र कन्नड रक्षण वेदिकेचा नेत्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवून कन्नड संस्कृती व भाषेच्या विरोधात असणारा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी करत आंदोलन छेडले होते. यावरून सरकारने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करणे संयोजकांना भाग पडले होते. 

याबाबत एका वृत्तवाहिनीने कन्नड रक्षण वेदिकेच्या प्रविण शेट्टी व नारायण गौडाच्या गटाच्या पदाधिकार्‍यांनी कार्यक्रम विनाअडथळा होऊ देण्यासाठी 30 लाखांची मागणी केली असल्याचे उघडकीस आणले आहे. कन्नड  रक्षण वेदिकेच्या प्रविण शेट्टी  गटाच्या आर. पुनित व नारायणगौडा गटाचा वेदिकेचा उपाध्यक्ष अंजनप्पा  यांनी सदर कार्यक्रम  चालविण्यासाठी 30 लाख रू.खंडणीची मागितल्याचे स्टिंग ऑपरेशन वृत्तवाहिनीने प्रसारित केले. त्यातील दृष्यांनुसार, हा कार्यक्रम चालविण्यासाठी आपल्याकडून आवश्यक ते संरक्षण देण्यात येईल. यासाठी 30 लाख रू.द्यावे लागतील. असा प्रस्ताव पुनित आणि अंजनप्पा  सदर आयोजकांपुढे मांडताना दिसत आहेत. 

दोन्ही गटाच्या नेत्यांनी पैशाची मागणी ठेवून आयोजकांना संरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले आहे. आम्ही हा कार्यक्रम होऊ देण्यास विरोध करणार नाही, उलट कार्यक्रमात सनी लिओनला आमचे 30 कार्यकर्ते संरक्षणासाठी देऊ आणि इतर कुठल्याही संघटनेने विरोध केला तरी ते पाहून घेऊ, कार्यक्रम सुरळीत पार पडू देण्याची जबाबदारी आमची. याआधीही आम्ही अशा पद्धतीने काम केले आहे. लिओनीचा नृत्य कार्यक्रम होण्याआधी 15 ते 20 लाख आणि झाल्यानंतर 10 लाख असे 30 लाख रुपये. ते सुद्धा रोख स्वरुपात. असे व्यवहार आम्ही चेकने करत नाही, असेही हे दोन कथित नेते बोलताना त्या दृष्यांमध्ये दिसतात. 

वृत्तवाहिनीच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे कन्नड रक्षण वेदिकेच्या नेत्यांकडून भाषा व संस्कृतीच्या नावावर गैरकारभार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याआधीही नारायणगौडाच्या संघटनेवर राजकारण केल्याचा आरोप होता. आता तर थेट भाषेच्या नावाखाली खंडणी मागण्याचा प्रकार सुरू झाल्यामुळे कन्नड रक्षण वेदिका खरोखरच संस्कृती व भाषेसाठी काम करते की खंडणी वसुलीसाठी काम करते.  दुसरा वाद शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यास विरोध करून नारायण गौडाने कर्नाटकातील मराठा समाजाचा रोष ओढ़वून घेतलेला असतानाच, आता दुसर्‍या वादात त्याची संघटना अडकली आहे. यापूवीही रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कन्नड रक्षणाच्या नावाखाली बेळगावात गुंडगिरीचे प्रकार केले होते. शिवरायांबद्दलच्या वक्तव्यानंतर बेळगावातील मराठी संघटनांनी गौडाचा निषेध केलेला आहे. मात्र, स्टिंग ऑपरेशननंतर अजूनही वेदिकेच्या नेत्यांविरुद्ध कारवाई झालेली नाही.