होमपेज › Belgaon › औद्योगिक वसाहतीच्या समस्या सोडवा

औद्योगिक वसाहतीच्या समस्या सोडवा

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 27 2017 10:24PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी 

सरकारला महसूल व बेरोजगारांना रोजगार देणार्‍या औद्योगिक वसाहतीमधील समस्या निवारण्यासाठी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पथदीप, रस्ते, स्वच्छता आदी समस्या दूर कराव्यात.  महापालिका व हेस्कॉम अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्यामुळे समस्यांत भर पडली आहे.  त्या सोडवण्याची मागणी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी बैठक झाली. उद्योजकांनी होनगा व उद्यमबाग, कणबर्गी औद्योगिक वसाहतींमधील समस्या मांडल्या. 

मागील बैठकीमध्ये वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी चर्चा करण्यात आली. मंजूर झालेल्या निधी अंतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिले होते. 80 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत दिली होती. मात्र या सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. वसाहतीमध्ये सायंकाळी पथदीप नसल्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. या ठिकाणी स्वच्छता नसल्याने कामगारांनाही व येथील उद्योजकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका व हेस्कॉम अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्यामुळे समस्या वाढल्या आहेत, असे चेंबरचे अध्यक्ष उमेश शर्मा यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी झियाउल्ला यांनी सदस्यांच्या समस्या ऐकून हेस्कॉम व मनपा अधिकार्‍यांना दखल घेण्याची सूचना केली. डीआयसीचे सहउपसंचालक टी.सिध्दण्णा यांनी जिल्हाधिकार्‍यांना वसाहतींमध्ये परवानगी देण्यापूर्वी योग्य ती दखल घेतली नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना धारेवर धरण्यात आले. आधी कायद्याचे ज्ञान जाणून घ्या, नियम व अटींची पूर्तता झाल्यानंतरच परवानगी द्या, असे बजावले. कणबर्गी, होनगा औद्योगिक वसाहतीमधील भूखंड वितरणबाबत चर्चा करण्यात आली. होनगा  वसाहतीमध्ये 110 केव्ही पुरवठा केंद्र उभारण्यासाठी तीन महिन्याचा अवधी देण्यात आला होता. त्यानुसार काम पूर्ण झाले असून लवकरच भुयारी वीज वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. काही कारणास्तव काम स्थगित असून लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितलेे. नवउद्योजकांनी  दिलेल्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली. यामध्ये नियम व अटींची पूर्तता केलेल्यांना उद्योग उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली.  गोपाल जिनगौडा, जी. बी. नाईक, विकास कलघटगी, सुधीर दरेकर आदी उपस्थित होते.