Sat, Dec 05, 2020 23:29होमपेज › Belgaon › सिग्नल तोडणार्‍यांपुढे पोलिस हतबल

सिग्नल तोडणार्‍यांपुढे पोलिस हतबल

Published On: Dec 13 2017 1:53AM | Last Updated: Dec 13 2017 1:53AM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी भर चौकामध्ये उन्हात उभे राहून हवालदार वाहनधारकांना दिशा दाखवितो. मात्र, वाहनधारकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन केले जात आहे. सिग्नल तोडणार्‍या बहाद्दरांमुळे वाहतूक पोलिस यंत्रणा हतबल ठरत आहे. खांद्याला मोबाईल, वाकडी मान करून तसेच हेडफोन लावून सिग्नल तोडून घाईने वाहन दामटणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे शहरातील रस्त्यांवर गर्दी वाढत चालली आहे. वाहतुकीचे नियमन व्यवस्थित होण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी पोलिस विभाग व उपप्रादेशिक विभागाची यंत्रणा कार्यरत आहे. नियम स्वयंस्फूर्तीने पाळल्यास अपघाताच्या घटना टळतील.

यासाठी शहर वाहतूक विभागाच्या प्रयत्नास नागरिकांच्या सहकार्याची जोड अपेक्षित आहे. चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक, आरटीओ आदी वर्दळीची सिग्नलची ठिकाणे आहेत. या ठिकाणी वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक नियमनासाठी पोलिस कर्मचारी भर उन्हात, थंडी वार्‍यात कर्तव्य बजावत असतात. चौकाच्या ठिकाणी सिग्नलच्या यंत्रणेसह वाहतूक शाखेचा हवालदारही दिशानिर्देश देत असतो. वाहन आपले असले तरी रस्ता सार्वजनिक आहे. रस्त्यावरही वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. याचे भान येण्यासाठीच पोलिस उभे असतात.  

वास्तविक पाहता वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारक स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालतात आणि अशा प्रसंगी ट्राफीकवाले कुठे होते. असा मानभावी प्रश्‍न हमखास उपस्थित केला जातो. वर्दळीच्या चौकात ट्राफीक हवालदारासहीत सिग्नलची यंत्रणा आहे.मात्र, सिग्नल तोडून बेफामपणे निघू पाहणार्‍या वाहन चालकांची मनसिकता आणि वृत्ती बदलत नसल्याचे वारंवार आढळते. 
वाहतूकीचा नियम तोडणार्‍यांवर वाहतूक शाखेकडून नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. नियम तोडलेले वाहन पकडले की सोडा, असे सांगणारे फोन कर्मचार्‍यांना येतात. यावेळी अनेकांना सोडून देखील देण्यात येते. अनेकदा वाहनचालक झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल तोडणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. यामुळे पादचार्‍यांना अडथळा निर्माण होतो. तसेच छोटे-मोठे अपघातही होण्याची शक्यता असते. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टळता येतील.