होमपेज › Belgaon › साठेंच्या साहित्यात कष्टकर्‍यांचे चित्रण

साठेंच्या साहित्यात कष्टकर्‍यांचे चित्रण

Published On: Dec 13 2017 1:53AM | Last Updated: Dec 13 2017 1:53AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून कष्टकरी समाजाचे चित्रण केले. अन्याय, अत्याचाराविरोधात त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आसूड ओढले. आयुष्यातील संकटांना भिडत आपले अनुभव शब्दबद्ध केले असल्याचे प्रतिपादन प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले. कुद्रेमानी येथे सोमवारी नियोजित कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या जागृतीबाबत बैठक करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी ईश्‍वर गुरव होते. त्यावेळी मेणसे बोलत होते. मेणसे म्हणाले, परिवर्तनशील चळवळीत कार्यरत असणार्‍या अण्णा भाऊंनी प्रत्यक्ष चळवळीत भाग घेत लिखाण केले. यामुळे त्यांच्या लेखणाला अस्सल अशा अनुभवाचा गंध लाभला आहे.

कामगार चळवळीबरोबरच संयुक्त महाराष्ट्र,  गोवामुक्ती आंदोलनात प्रत्यक्ष भाग घेऊन जागृती केली. हातात डफ घेऊन जनमाणसांना चेतविण्याचे काम केले. यासाठी त्यांनी नाटक, कथा, कादंबरी, तमाशा, वग, शाहिरी यांचा प्रभावी वापर केला. यामुळे बेळगावात होणारे संमेलन सर्वाथाने महत्त्वाचे असून यामध्ये ग्रामीण भागातील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. अनंत जाधव यांनीही संमेलनाविषयी बैठकीत माहिती दिली. ग्रा. पं. सदस्य नागेश राजगोळकर यांनी संमेलनात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आश्‍वासन दिले. 

यावेळी सावित्रीबाई फुले महिला मंडळ, बलभीम साहित्य संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीला ग्रा. पं. सदस्य काशिनाथ गुरव, एसडीएमसी अध्यक्ष शंकर पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, गोपाळ चौगुले, निंगाप्पा पाटील, अर्जुन राजगोळकर, राम गुरव, जी. जी. पाटील, बाळाराम धामणेकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सरिता गुरव यांनी केले. तर आभार राजाराम राजगोळकर यांनी मानले.