Mon, Sep 28, 2020 13:44होमपेज › Belgaon › शहरात विनापरवाना फलकांची भाऊगर्दी

शहरात विनापरवाना फलकांची भाऊगर्दी

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 9:17PM

बुकमार्क करा
बेळगाव ः प्रतिनिधी

शहरात चौका-चौकात उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. यातील बरेचसे फलक विनापरवाना तसेच मुदतीनंतरही त्या ठिकाणी असतात. याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शहराची स्मार्टसिटी योजनेंतर्गत निवड होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला. मात्र, शहर स्मार्ट होताना दिसत नाही. शहरातील चौका-चौकात लावण्यात आलेल्या फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. अजूनही काही ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फलक असल्यामुळे शहरवासियांतून आश्यर्य व्यक्त करण्यात येत आहे. महानरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. 

शहरात फलक लावण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घेणे गरजेचे असते. तसेच परवानगी देताना फलक काढण्याचा कालावधी ठरवून दिलेला असतो. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी शहरातील अनेक ठिकाणी लावण्यात आलेले फलक मनपाने हटविले नाहीत. यासाठी मनपाने लक्ष देऊन फलक हटविण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे. धर्मवीर संभाजी चौक, राणी चन्‍नम्मा चौक, गोगटे सर्कल, सीबीटी, कोल्हापूर सर्कल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात फलक दिसत आहे. अनेक ठिकाणी महानगरपालिकेचे परवानगी न घेता फलक लावण्यात आले आहेत. विविध ठिकाणी आणि विविध प्रभागांमध्ये राजकारणी व्यक्तींचेच सातत्याने फलक लागत आहेत. यामध्ये विविध जयंती, कार्यक्रम, वैयक्तिक कार्यक्रम त्यांच्या फलकांचा समावेश आहे. अन्य शहरातील परिस्थिती पाहता बेळगाव शहरातील परिस्थिती वेगळी आहे. यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. केवळ जाहिरात फलकांच्या माध्यमातून मनपाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. यासाठी सर्व नगरसेवकांनी एकजूट दाखविणे गरजेचे आहे.