बेळगाव : शिवपुतळा पुनर्प्रतिष्ठापनेचा निर्धार

Last Updated: Aug 10 2020 1:15AM
Responsive image


बेळगाव (पुढारी वृत्तसेवा) :

मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील शिवपुतळा हटवण्यास भाग पाडल्यामुळे बेळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातूून निषेध सुरू होताच पुतळ्याला विरोध करणार्‍या संघटनांनी काहीशी नमती भूमिका घेतली आहे. त्यानंतर मणगुत्ती ग्रामस्थांनी पंधरवड्यात शिवपुतळ्याची पुनर्प्रतिष्ठापना करण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा प्रशासनानेही या निर्धाराला पाठिंबा दिला आहे;  प्रतिष्ठापनेसाठी 15 दिवसात परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ‘प्रतिष्ठापनेआधी परवानगी घेतली नाही’, हेच कारण देत प्रशासनाने शनिवारी शिवपुतळा हटवण्यास ग्रामस्थांना भाग पाडले होते. येत्या पंधरवड्यात परवानगी मिळण्याची आशा ग्रामस्थांना आहे. 

हुक्केरी तालुका प्रशासनाने परवानगीची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर ढकलली आहे; मात्र जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलिसप्रमुख यापैकी कोणीही परवानगीबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही. ‘पुढारी’ने दोन्ही अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण दोघांनीही प्रतिसाद दिला नाही.

पुढील पंधरा दिवसांत कायदेशीर बाबी पूर्ण करून शिवपुतळ्याची त्याच चबुतर्‍यावर दिमाखात पुनर्प्रतिष्ठापना करू, असा निर्धार मणगुत्ती रविवारी ग्रामस्थांनी केला. पुतळ्याला विरोध करणार्‍या संघटनांनीही त्याला संमती दर्शवली आहे; मात्र प्रशासनाने परवानगीसाठी मुदत दिलेली नाही. 

मणगुत्तीत पुतळा बसवण्यास जवळच्या बोळशानट्टी व बेनकोळी  गावातील युवकांनी विरोध केला होता. त्यामुळेच प्रशासनाच्या दबावामुळे पुतळा हटवावा लागला होता. त्याचे पडसाद उमटताच रविवारी तिन्ही गावांतील पंच मंडळींनी एकत्र बैठक घेऊन पंधरवड्यात पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्धार केला.

गेल्या चार दिवसांपासून मणगुत्तीतील शिवपुतळ्यावरून तणावाचे वातावरण आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता प्रतिष्ठापित केलेला शिवपुतळा शनिवारी मध्यरात्री उतरवण्यात आला. कन्नड रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी पुतळ्याला विरोध केल्याने हे सर्व नाट्य घडले. परंतु, पुतळा उतरवल्यानंतर कर्नाटक-महाराष्ट्रात रान पेटले. कर्नाटक शासनाचा सर्वत्र निषेध होऊ लागल्याने जिल्हा व तालुका प्रशासनासह विरोध करणार्‍या गावांमधील पंच मंडळींनीही रविवारी नरमाईची भूमिका घेतली. 

रविवारी सकाळी गावात मणगुत्ती, बोळशानट्टी व बेनकोळी या तीन गावच्या पंचमंडळींची बैठक झाली. बैठकीला अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी, हुक्केरीचे  उपअधीक्षक गुरूराज कल्याणशेट्टी, मणगुत्तीचे ज्येष्ठ नागरिक शरद पाटील, श्रीरासेना हिंदूस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

महिलांसह तरुण आक्रमक 

बैठकीवेळी काही तरुण व महिला आक्रमक बनल्या होत्या. बसवलेला पुतळा काढला का? असा सवाल तरुणांकडून पंच मंडळींना व पोलिस अधिकार्‍यांना विचारला जात होता. रितसर परवानगीला किती दिवस लागतील, असे युवकांनी विचारलेल्या प्रश्‍नाला ठोस उत्तर मिळाले नाही. ते सरकारी काम आहे, तातडीने होणार नाही, असे व्यासपीठावरील अधिकारी व पंच मंडळींनी म्हणताच सर्व ग्रामस्थ उठून उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत होते.

दुसर्‍या गावची दादागिरी का?

यावेळी काही तरुण तसेच महिला अमरनाथ रेड्डी यांच्यासमोर आक्रमक झाल्या. दुसर्‍या गावच्या लोकांची आमच्या गावात दादागिरी का? ते अंगावर धावून येऊन मारहाण करत आहेत, त्यांच्यावर कारवाई का करत नाही. आमच्या गावचा प्रश्‍न आम्ही मिटवून घेऊ. परंतु, अन्य गावच्या लोकांनी यामध्ये विनाकारण हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका महिलांनी मांडली. 

बैठकीनंतर जमावाला माहिती देताना शरद पाटील म्हणाले, कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही समस्या सोडवू, तिन्ही गावचे लोक एकत्र येऊन यावर तोडगा काढू, पुतळा बसविण्यासाठी तीन गावातील कोणाचाही विरोध नाही. जागेचा ताबा, कायदेशीर नोंदणी, यासाठी वेळ जाणार असून, पंधरा दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल. उतरवलेला पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे.

रमाकांत कोंडुसकर म्हणाले, तीन गावांच्या मान्यतेने पुतळा बसवायचा ठरले आहे. बैठकीला तिन्ही गावचे प्रमुख आले होते. या आधीची परवानगी ठराव पास करूनही मिळाली नाही. त्यामुळे आता कायदेशीर बाबींची पूर्तता करून भविष्यात काहीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी मंगळवारी पुन्हा  बैठक होऊन तपशीलवार चर्चा केली जाईल. 

कन्‍नडिगांची दादागिरी

रविवारी सकाळी मणगुत्ती गावात बेळगावसह महाराष्ट्रातून शिवप्रेमींनी गर्दी केली होती. यामुळे पित्त खवळलेल्या काही कन्‍नड तरुणांनी येथे पार्किंग केलेल्या वाहनांवर दगडफेक करत गावातील चौघांना मारहाण केली. यामध्ये एकाला किरकोळ दुखापत झाली. या घटनेबाबत फिर्याद न दिल्याने नोंद झाली नसल्याचे यमकनमर्डी पोलिसांनी सांगितले.