Sat, Feb 29, 2020 11:34होमपेज › Belgaon › बेळगाव-बंगळूर बसला अपघात; ३ ठार

बेळगाव-बंगळूर बसला अपघात; ३ ठार

Last Updated: Nov 04 2019 1:03AM
बंगळूर : प्रतिनिधी

बेळगावहून  बंगळूरला निघालेल्या खासगी आराम बसची समोरून निघालेल्या टेम्पोला नियंत्रण सुटून धडक बसली. यामध्ये क्‍लीनरसह दोघे प्रवासी जागीच ठार झाले. मृतांमध्ये एकजण गोकाक येथील आहे. या घटनेत आठजण जखमी झाले आहेत. रविवारी (दि. 3) पहाटे पाचच्या सुमारास तुमकूरमधील राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील रंगापूरनजीक उरकेरे क्रॉसजवळ हा अपघात झाला.
बसचा क्‍लीनर महंमद फजदुल्ला (29, रा. बंगळूर), रामाप्पा यलेबेळ्ळी (रा. गोकाक) व पाशा पीर (45) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातात अरविंद, विनोद, तीर्थप्रसाद, अनंत, अश्‍विन,

उपेंद्रकुमार, रघु व जयशंकर हे जखमी झाले असून, यातील बहुतांशी बंगळूर येथील असल्याचे तुमकूर ग्रामीण पोलिसांनी सांगितले. बसमधील आणखी एक चालक उल्‍ला खान (42) हे जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 38 प्रवासी आणि दोन चालक होते. याबाबत तुमकूर ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महामार्गावरून समोरून साबणाचे बॉक्स भरलेला टेम्पो निघाला होता, त्याच्या पाठीमागून खासगी आरामदायी बस निघाली होती. समोरील टेम्पो चालकाने अचानक ब्रेक मारल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेला क्‍लिनर महंमद हा जागीच ठार झाला, तर उर्वरित दोघांना उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. 

जखमींना बंगळुरातील निम्हान्स, तुमकुरातील  टीएचएस  आणि सिद्धगंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुमकूर जिल्हा पोलिसप्रमुख कोनवंशीकृष्ण यांनी घटनास्थळी पाहणी केली. ग्रामीण पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

साबणांची पळवापळवी

धडकेनंतर टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. यामधील साबणाचे बॉक्स  रस्त्यावर विखुरले. बसमधील अनेकजण विव्हळत खिडकीतून दरवाजातून बाहेर येऊन मदतीची याचना करत होते. परंतु, येथे आलेले  नागरिक त्यांना मदत करण्याऐवजी येथे पडलेले साबणाचे बॉक्स पळविण्यासाठी झुंबड उडाली. काही मिनिटांतच टेम्पोतील सर्वच बॉक्स गायब झाले. माणुसकी जपणार्‍या काहींनी अपघातग्रस्तांना मदत केली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.