Sat, Feb 29, 2020 12:30होमपेज › Belgaon › गणपती बाप्पा आले घरा...

गणपती बाप्पा आले घरा...

Published On: Sep 03 2019 1:43AM | Last Updated: Sep 03 2019 1:43AM
बेळगाव : प्रतिनिधी

‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरता आणि ढोल-ताशांच्या गजरात मांगल्याचे प्रतीक असलेल्या बाप्पांचे सोमवारी चैतन्यमय वातावरणात घरोघरी आगमन झाले.  लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्‍तांचा उत्साह लक्ष वेधून घेत होता. घरगुती श्रींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सोमवारी सुरू झालेला आनंद सोहळा आता पुढील दहा दिवस नवचैतन्य निर्माण करणार आहे.

सोमवारी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळपासूनच गणेशभक्‍तांची  मूर्तिकारांच्या शाळेत लगबग दिसत होती. कुणी पाटावरून, कुणी डोकीवरून, कुणी  मोटारसायकलीवरून तर कुणी चारचाकी वाहनातून श्रीमूर्ती आणल्या. सकाळी 12 पर्यंत मूर्तिकारांच्या शाळेत गर्दी झाली होती. मोरयाचा गजर करत फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताशाच्या निनादात गणराय घरोघरी विराजमान झाले. नव्या मराठमोळ्या वेशभूषेत गणेशभक्‍तांमध्ये उत्साह संचारला होता. 

घरगुती श्री मूर्ती आणण्यासाठी काहीजणांनी दुपारी 12.30 पर्यंत चा मुहूर्त साधला. मात्र, अनेक गणेशभक्‍तांनी सायंकाळी सातपर्यंत श्रीमूर्ती आणल्या. शहरातील विविध गल्ल्यांमध्ये बाप्पांचा जयजयकार करत श्रीमूर्ती आणण्यात येत होत्या. शहापूर, टिळकवाडी, अनगोळ, वडगाव, खासबाग या उपनगरांतही बाप्पांचे स्वागत जल्‍लोषात करण्यात आले. या उपनगरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत श्रीमूर्ती घरी आणण्याची लगबग होती.

घरोघरी विधिवत पूजा करुन गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुरणपोळी आणि गोड नैवेद्य अर्पण करुन श्रींची मनोभावे पूजा करण्यात आली. घराघरांतून उमटणारे सामूहिक आरतीचे सूर लक्ष वेधून घेत होते. आपल्या घरातील बाप्पासमवेत काढलेले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करण्याचाही आनंद गणेशभक्‍तांनी घेतला. शहरासह ग्रामीण भागात बालचमूंचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

घरोघरी उत्साही वातावरणात बाप्पांचे आगमन होत असताना सार्वजनिक गणेशमंडळांच्या श्रीमूर्ती नेण्याची धांदल सुरू होती. दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत विविध मंडळांनी श्रीमूर्ती मंडपात नेल्या. अतिवृष्टीनंतर उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी  पुन्हा हजेरी लावल्याने सोमवारी संततधार कायम राहणार, असा अंदाज होता. मात्र, गणेशाचे आगमन होताना सोमवारी सायंकाळपर्यंत पावसाने उघडीप दिल्याने गणेशभक्‍तांना दिलासा मिळाला. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते बाप्पांचा जयजयकार करत चारचाकी वाहनातून श्रीमूर्ती नेत होते.

मंगळवारी ऋषीपंचमी असून, गुरुवारी (दि. 5) गौरी आवाहन आहे.  दि. 6 रोजी गौरीपूजन तर दि. 7 रोजी गणेश विसर्जन होणार आहे. यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रस्ते गजबजणार आहेत. 

गणेश मंदिरांतही गर्दी

घरेाघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर दुपारनंतर शहर परिसरातील विविध गणेश मंदिरात गणेशभक्‍तांनी दर्शनाचा लाभ घेतला. गणेश मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. अभिषेक, पूजा, महाआरती, भजन आदी कार्यक्रमांची रेलचेल होती. 

चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्‍तांची गर्दी दिसत होती. अरगन तलावाशेजारील विनायक मंदिरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी पूजा, अभिषेक झाल्यानंतर भक्‍तांनी दर्शनाचा लाभ घेतला.

पारंपरिक उत्साहाचा बाज कायम

गणेशोत्सवाची सोमवारी प्रतिष्ठापना  असल्याने सर्वत्र भक्‍तिभाव आणि चैतन्य पसरले होते. यंदा अतिवृष्टीच्या दणक्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य मिरवणुका व अनावश्यक खर्चाला बगल दिल्याचे दिसत होते. मात्र, पारंपरिक उत्साहाचा बाज कायम होता.

बाप्पाच्या स्वागताला पावसाच्या सरी

बाप्पाच्या आगमनाआधीपासूनच पुनरागमन केलेल्या पावसाने आजही उपस्थिती दर्शविली. रिमझिम पावसातच बाप्पाचे आगमन झाले. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार बरसून संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण केलेल्या पावसाने काही दिवसांपूर्वी विश्रांती घेतली होती. पण, गणेशोत्सवाची चाहूल लागताच पावसाला पुन्हा सुरुवात झाली. दिवसातून तीन-चार वेळा कोसळणार्‍या पावसामुळे गणेशोत्सवाची खरेदी करताना अडथळे येत होते. शनिवार आणि रविवारी तर बाजारपेठेत चिखल निर्माण झाला होता. त्याचा भाविकांना त्रास सहन करावा लागला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप घालतानाही त्रास आला. 

रविवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे सोमवारीही सकाळी ढगाळ वातावरण होते. सकाळी दहाच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भाविकांत काही प्रमाणात नाराजी दिसून आली. पावसाने विश्रांती घेताच गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यास वेग आला. त्यानंतर दिवसभरात अनेकदा पावसाच्या सरी कोसळल्या. रिमझिम पावसातच बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.