Tue, Jul 07, 2020 11:18होमपेज › Belgaon › निपाणीत आज भाजपचा महिला मेळावा

निपाणीत आज भाजपचा महिला मेळावा

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 13 2018 1:14AMनिपाणी : प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवार दि. 13 रोजी दुपारी   निपाणी दौर्‍यावर येत आहेत. निपाणी मतदारसंघातील महिला मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आ. शशिकला जोल्ले यांनी दिली.

म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर सभेसाठी व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे. निपाणी येथे दुपारी 4.45 वाजता  या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व कार्यकर्त्यांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. जोल्ले, सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले, भाजप शहराध्यक्ष जयवंत भाटले, ग्रामीण अध्यक्ष अ‍ॅड. संजय शिंत्रे, भाजपा शहर महिला अध्यक्षा विभावरी खांडके, ग्रामीण अध्यक्षा भारती आडदांडे यांनी केले आहे. 

अमित शहा हे 2 एप्रिल रोजी  निपाणी दौर्‍यावर येणार होते. त्यावेळी काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला होता.  शुक्रवारी होणार्‍या मेळाव्यासाठी 30 ते 35 हजार महिला उपस्थित राहणार आहेत. 
यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी व्यासपीठासह बैठक व्यवस्थेची तयारी पूर्ण झाली आहे.

 भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवारी निपाणी दौर्‍यावर येत असल्याने येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  निपाणीबरोबरच बेळगाव, कित्तूर, गोकाक, मुधोळ, नंदगड येथेही त्यांच्या सभा होणार आहेत.निपाणीतील बंदोबस्तासाठी अथणी, रायबाग, चिकोडी सर्कलअंतर्गत सुमारे 40 वरिष्ठ अधिकार्‍यांसह 180 पोलिस कर्मचारी, 80 होमगार्ड व प्रशिक्षणार्थी पोलिस असे एकूण 310 जण बंदोबस्तासाठी कार्यरत राहणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर गुरूवारी सकाळी  शहर पोलिस ठाण्यात चिकोडी उपविभागाचे पोलिस अधीक्षक  दयानंद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बंदोबस्त नियोजनासंदर्भात बैठक झाली. तसेच पवार यांनी यांनी श्रीपेवाडी रोडवरील शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूलच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅड तसेच म्युनिसीपल हायस्कूलच्या मैदानावर सभेसाठी उभारलेल्या व्यासपीठाची  पाहणी केली. 

बंदोबस्तासाठी खास करून 3 डीएसपी, 6 सीपीआय, 15 पोलिस उपनिरीक्षक, 25 साहाय्यक फौजदार, 180 पोलिस कर्मचारी, 80 प्रशिक्षणार्थी पोलिस व होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात निपाणीचे सीपीआय मुताण्णा सरवगोळ यांनी कर्मचार्‍यांना  सूचना दिल्या. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे फौजदार अशोक चव्हाण, ग्रामीणचे निंगनगौडा पाटील, बसवेश्‍वर ठाण्याचे रायगोंडा जानर, खडकलाटचे सी. एस. बागेवाडी उपस्थित होते.

Tags : BJP women's rally today ,belgaon news