Sat, Feb 29, 2020 13:02होमपेज › Belgaon › भाजपकडून 29 मेपर्यंत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

भाजपकडून 29 मेपर्यंत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

Published On: May 26 2019 1:44AM | Last Updated: May 26 2019 1:44AM
बंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकात अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजपने सत्ताबदलाच्या हालचाली सुरू केल्या  होत्या; परंतु पक्षश्रेष्ठींकडून 29 मेपर्यंत ‘ऑपरेशन लोटस्’ स्थगित  करण्याचे आदेश दिले असल्याने ‘वेट अँड वॉच’चे  धोरण अवलंबल्याचे समजते.

 लोकसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकात भाजपला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. यानंतर भाजपकडून सत्तास्थापनेसाठी अंतर्गत घडामोडींना वेग आला. दरम्यान, मतदानाच्या एक दिवस अगोदर माजी मंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांनी कुमारस्वामी हे 23 मेपर्यंतच मुख्यमंत्री म्हणून     राहतील, असा दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे दहा आणि निजदचे 2 आमदार भाजपच्या गळाला लागल्याच्या चर्चा सुरु आहेत.  

याची काँग्रेस-निजद आघाडीने धास्ती घेत शुक्रवारी बैठक घेऊन  आघाडीमधील उपस्थित आमदारांना भाजपच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले होते.

दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी एका शनिवारी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या माहितीमध्ये आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप आमदार फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याच्या आरोपाचा इन्कार केला. ते म्हणाले, ‘आम्ही लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देणार आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठी जो काही आदेश किंवा निर्णय देतील तो प्रमाण मानून त्याची अंमलबजावणी केली जाईल.

सरकार स्थापण्यासाठी विरोधी आमदारांना भाजप आमिष दाखवत  नाही, हे सर्व आरोप सपशेल खोटे आहेत.- येडियुराप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष