Mon, Jan 18, 2021 10:12होमपेज › Belgaon › अशोक पट्टण यांच्यासमोर भाजपाचे आव्हान

अशोक पट्टण यांच्यासमोर भाजपाचे आव्हान

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 1:08AMबेळगाव : प्रतिनिधी

काँग्रेसने जाहीर केलेली आ. अशोक पट्टण यांची उमेदवारी आणि भाजपकडून माजी आ. महादेवप्पा यादवाड लढण्याची शक्यता यामुळे रामदुर्ग मतदारसंघात यादवाड-पट्टण यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक मागास भाग म्हणून रामदुर्ग मतदारसंघ ओळखला जातो. दुष्काळ स्थानिकांच्या पाचवीला पूजलेला. आ. अशोक पट्टण यांना मागील विधानसभा सभागृहात महत्त्वाचे स्थान होते. काँग्रेस पक्षाचे पक्षप्रतोद हे राज्यमंत्र्याच्या दर्जाचे पद देण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात दबदबा होता. परंतु, दुष्काळी तालुक्याचा शिक्‍का असलेल्या या मतदारसंघातील निम्म्याहून अधिक गावामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वाड्यावस्त्यावरील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागते.

पाण्याअभावी कायमस्वरुपी उत्पनाचा स्रोत या भागातील नागरिकांकडे उपलब्ध नाही. यामुळे येथून स्थंलातरित होणार्‍या नागरिकांची समस्या कायम आहे. भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणार्‍यांची संख्या मोठी आहे. यामध्ये माजी आ. महादेवप्पा यादवाड हे प्रमुख दावेदार मानले जातात. त्याचबरोबर जि. पं. सदस्य अ‍ॅड. रमेश देशपांडे, डॉ. व्ही. के. पाटील, रमेश पंचकटीमठ, अनिवासी भारतीय चंद्रकांत यत्नट्टी यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

निजदकडून एम. जावेद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण किती प्रमाणात करतात, यावर काँग्रेस व भाजपच्या यशाची गणिते अवलंबून आहेत. 
आजवर  काँग्रेस पक्षाला मतदारांना सहा वेळा पसंती दिली आहे. माजी आ. महादेवप्पा यांच्यारुपाने एकदा भाजप, एकदा निजद तर एकदा अपक्ष उमेदवार या मतदारसंघात विजयी ठरला आहे. 

परिणामी काँग्रेसचा एक ठराविक मतदार असून त्याची भूमिका निर्णायक ठरते. यामुळे आ. पट्टण यांना विजयाची खात्री आहे. तर भाजपकडून विकासाचा नारा पुढे करण्यात येत आहे. निजदने माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत सभा घेतली आहे. म्हादईचे पाणी मलप्रभेत सोडून कालव्याने पाणी हुबळी-धारवाडसह रामदुर्गलाही देण्याची योजना आहे. मात्र म्हादई प्रकल्प  वादात अडकल्यामुळे रामदुर्ग तालुकावासियांची सर्वात मोठी समस्या पाण्याचीच आहे. जो पाणी पुरवणार नाही, त्याला पाणी पाजण्याची आणि जो पाणी पुरवेल त्याच्या घरात विजयश्री पाणी भरेल अशी व्यवस्था करण्याची तयारी मतदारांनी केलेली दिसते आहे.

बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी जिल्हा  वेगळा करावा, अशी मागणी झाल्यानंतर रामदुर्ग भागही वेगळा करून रामदुर्ग हा स्वतंत्र जिल्हा करावा अशी मागणी पुढे आली आहे. तोही या निवडणुकीचा मुद्दा होण्याची शक्यता आहे.

Tags : BJP's challenge Ashok Pattan,belgaon news