होमपेज › Belgaon › बैठका, पत्रकांद्वारे जागृती करणार

बैठका, पत्रकांद्वारे जागृती करणार

Published On: Mar 04 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 11:48PMबेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समितीच्या 31 मार्चला होणार्‍या महामेळाव्यासंबंधी ग्रा. पं. स्तरावर जागृती बैठका घेणे, पत्रके काढून वाटप करणे, गावातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पुढील रुपरेषा ठरविणे,  सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती करणे, सीमाप्रश्‍नासंबंधी व शेतकर्‍यांची व्यथा मांडणारी चित्रफित व प्रदर्शन भरविण्याबाबत बैठकीत सूचना करण्यात आल्या. 

31 मार्च रोजी आयोजित मेळाव्यासंबंधी तालुका म. ए. समितीची पूर्वतयारी बैठक मराठा मंदिरात पार पडली. अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार होते. व्यासपीठावर माजी आ. मनोहर किणेकर, एस. एल. चौगुले, एल. आय. पाटील, बी. एल. आंबेवाडीकर, जि. पं. सदस्या माधुरी हेगडे, सरस्वती पाटील होत्या. 

मेळाव्याच्या जागृतीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कार्य केले पाहिजे. समितीसाठी एकनिष्ठेने काम करावे. राष्ट्रीय पक्षांच्या आमिषाला बळी न पडता समितीची ताकद त्यांना दाखवून देणे गरजेचे आहे, असे मत यावेळी व्यक्‍त करण्यात आले. 

माजी आ. किणेकर म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर मेळावा यशस्वी करायचा आहे. यासाठी सुमारे 1 लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील याचे नियोजन व प्रचार यंत्रणा राबविणे गरजेचे आहे. महिला आघाडी, युवा आघाडी, ग्रा.पं., ता. पं., जि.पं. सदस्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्य केले पाहिजे. समितीने राबविलेल्या कार्यक्रमांची पुस्तिका काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

विनायक पाटील म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबर ना. धनंजय मुंडे यांना मेळाव्याला आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. मराठी बांधवांनी कोणत्याही आमिषाला न भुलता समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. 

जि. पं. सदस्या सरस्वती पाटील  म्हणाल्या, राजकीय पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता आपण समितीशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. निंगोजी हुद्दार, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, बी. बी. देसाई, पी. डी. होनगेकर, एस. एल. चौगुले, मोतेश बार्देशकर, राजु पाटील आदींनी मते मांडली. यावेळी ता. पं. सदस्य काशिनाथ धर्मोजी, रावजी पाटील, आप्पासाहेब किर्तने, महेश जुवेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.