Sat, Feb 29, 2020 18:21होमपेज › Belgaon › लग्‍नाची वरात, जाणार सातच्या आत घरात

लग्‍नाची वरात, जाणार सातच्या आत घरात

Published On: Apr 14 2018 7:29AM | Last Updated: Apr 14 2018 9:39AMबेळगाव: प्रतिनिधी

गावात दारुबंदीबरोबरच वरातीत डॉल्बी लावण्यावर बंदी घालणारा  ऐतिहासिक निर्णय बेळवट्टी ग्राम पंचायतीने घेतला आहे. लग्नाची वरातदेखील संध्याकाळी सातपर्यंत संपवण्याची अट घालण्यात आली आहे. या अटीचा भंग करणार्‍यांवर दहा हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

काही दिवसापासून बेळवट्टी ग्रा. पं. कार्यक्षेत्रात दारुबंदी करण्याची मागणी ग्रामस्थ आणि महिलांनी वारंवार केली होती. त्यानुसार ग्रामस्थांनी ग्रा. पं.वर मोर्चा काढून दारुबंदीवर निर्णय घेण्याची मागणी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दारुबंदीची मागणी केली.

नागरिकांच्या मागण्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेवून ग्रा. पं. च्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये दारुबंदी, डॉल्बीबंदी आणि वरातबंदीचा समावेश आहे.

Tags : wedding, seven to seven i, house ,belgaon news

बेळवट्टी परिसरात काजू पीक मोठया प्रमाणात आहे. काजूच्या मुरट्यापासून दारु काढण्याचा व्यवसाय अनेकजण करतात. यामुळे मद्यपींची संख्या वाढली असून अनेक कुटुंबे त्रस्त बनली आहेत. याला आळा घालण्यासाठी ग्रा. पं. व न्यायदान समितीने हा निर्णय घेतला आहे. त्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

गावात दारुविक्री आणि दारु काढणार्‍याला 10 हजारचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावात दारु पिवून तंटा काढणे, लग्न आणि हळदीला डॉल्बी लावणे,पाहुणे मंडळीनी मद्यप्राशन करून गोंधळ घातल्यास दंड आकारण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात लग्नसमारंभात डॉल्बी लावण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. डॉल्बीच्या तालावर बेधुंद होवून नाचणारी तरुणाई अनेकदा मद्यप्राशन करते. यातून महिलांची छेडछाड, भांडण, मारामारी यासारखे प्रकार सर्रासपणे होतात. याला आळा घालण्यासाठी बेळवट्टी ग्रा. पं. ने पुढाकार घेतला आहे. त्याचे तालुक्यात कौतुक होत आहे.

Tags :wedding, seven to seven i, house ,belgaon news