Wed, Sep 23, 2020 23:12होमपेज › Belgaon › खेणींच्या प्रवेशावर खर्गे असमाधानी

खेणींच्या प्रवेशावर खर्गे असमाधानी

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 12 2018 11:52PMगुलबर्गा : प्रतिनिधी

कर्नाटक मक्‍कळ पक्षाचे आमदार व नाईस कंपनीचे मालक, उद्योजक अशोक खेणी यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यापूर्वी आपल्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नाही. त्यांच्यापासून पक्षाचा कोणता फायदा होणार आहे, हे मला माहीत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.

खेणी यांनी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला. त्याबद्दल खर्गे यांनी नाराजी व्यक्त केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, खेणी कोण आहेत, त्यांच्यापासून पक्षाला काय फायदा होणार आहे, त्यांना पक्षात कोणी बोलावले, हे आपल्याला नेमके माहीत नाही. याचे उत्तर ज्यांनी पक्षात त्यांना प्रवेश दिला आहे, त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा. खेणी यांच्या पक्षप्रवेशाला दिवंगत मुख्यमंत्री धरमसिंग यांचे चिरंजीव अजयसिंग व जावई यांनी देखील विरोध दर्शविला आहे. ते बिदर दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. एकंदर खेणी यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यामध्ये असणारे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

स्वागत व विरोधही

काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अशोक खेणी यांचे बिदर शहरात प्रथमच आगमन झाले. यावेळी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. खेणी यांच्या समर्थकानी त्यांच्या गळ्यात 50, 100 रुपयाच्या नोटांचा हार घातला. काँग्रेस पक्ष कार्यालयात दहा ते बारा कार्यकर्त्यांनी मात्र यावेळी जोरदार घोषणाबाजी करत खेणी यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. येत्या विधानसभा निवडणुकीत धरमसिंग यांचे जावई चंद्रसिंग यांना तिकिट देण्याची मागणी  या कार्यकर्त्यांनी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. 1972 पासून कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा विरोध नसून त्यांच्याविषयी आपल्याला आदर आहे. आ. अशोक खेणी