Fri, Feb 28, 2020 22:49होमपेज › Belgaon › अमरसिंह पाटलांचा नमनालाच अपयशाशी सामना

अमरसिंह पाटलांचा नमनालाच अपयशाशी सामना

Published On: Apr 08 2019 1:54AM | Last Updated: Apr 07 2019 11:52PM
शिवाजी शिंदे
 

जिल्ह्याच्या राजकारणात रायबागचा वाघ म्हणून एकेकाळी दरारा असणार्‍या व्ही. एल. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान आहे. राज्य मंत्रिमंडळात ते मंत्री होते. त्यांचा राजकीय वारसा पहिल्यांदा बॅ. अमरसिंह पाटील यांनी चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पहिल्याच खेपेला त्यांना अपयशाचा सामना करावा लागला.

अमरसिंह पाटील 1987 ते 1991 या काळात बेळगाव जिल्हा परिषदेचेे अध्यक्ष होते. याकाळात त्यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावून पाहिले. परंतु, जनता दलाच्या सोयीस्कर आणि जातीय राजकारणाचा फटका बसला. परिणामी विजयापर्यंत झेप घेतलेल्या बॅ. पाटील यांना अवघ्या 22 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.

1989 च्या दरम्यान लोकसभा निवडणुकीत जनता दलात फूट पडली. यावेळी रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखालील जनता दलातून पाटील यांनी अर्ज दाखल केला. देवेगौडा यांच्या संयुक्त जनता दलातून ए. के. कोट्रशेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये मतांचे विभाजन झाले.

1989 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार एस. बी. सिदनाळ यांना 2 लाख 10 हजार 329 मते मिळवून विजय संपादन केला. बॅ. पाटील यांना दुसर्‍या क्रमांकाची 1 लाख 87 हजार मते मिळाली. ए. के. कोट्रशेट्टी यांनी 28 हजार मते मिळाली. यामुळे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पहिल्याच वेळी विजयाने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली. सलग चारवेळा खासदारपद भूषविलेल्या सिदनाळ यांना आव्हान दिले. यामुळे बॅ. पाटील यांचा उत्साह दुणावला. अनेकवर्षे ठाण मांडून बसलेल्या काँग्रेसला यातून इशारा मिळाला.

1991 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतादलाकडे बॅ. पाटील यांनी उमेदवारी मागितली. परंतु, पक्षाच्या वरिष्ठांच्या राजकीय डावपेचामुळे त्यांचे तिकीट हुकले. परिणामी जनतादलाच्या अधिकृत उमेदवाराला अनामत रक्कमदेखील गमवावी लागली.  जातीय राजकारणाने यावेळी जनतादलाने उचल खाली होती. पाटील यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वाने विरोध केला.  जातीच्या राजकारणातून  जनतादलाने  लिलावती प्रसाद यांना उमेदवारी दिली. तत्कालिन जिल्हाध्यक्ष ए. बी. पाटील यांची अमरसिंह पाटील  पक्षातून हकालपट्टी केली.लिलावती प्रसाद यांचा जिल्ह्यात संपर्क कमी होता. पाटील यांच्या तुलनेत प्रभावी नव्हता. यातून त्यांना अनामत रक्कम जप्त झाली 

जनतादलाने केलेल्या कारवाईने पाटील परिवार दुखावला. त्यांनी  बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सिदनाळ यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. यातून पाटील परिवाराची निजदशी असणारे बंध विरत गेले. काँग्रेसशी सूत जमू लागले. व्ही. एल. पाटील यांनी जनतादलाला रामराम करण्याचा निर्णय घेतला.