Sat, Sep 26, 2020 23:01होमपेज › Belgaon › मंडोळीत चौघांवर विळ्याने हल्‍ला

मंडोळीत चौघांवर विळ्याने हल्‍ला

Published On: Sep 03 2019 1:43AM | Last Updated: Sep 03 2019 1:43AM
बेळगाव : प्रतिनिधी

श्रीमूर्ती मिरवणुकीवेळी शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून दगड व विळ्याने वार केल्याने चौघेजण जखमी झाले. मंडोेळी (ता. बेळगाव) येथे सोमवारी (दि. 2) सायंकाळी ही घटना घडली. महेश कृष्णा दळवी (वय 22) शेकर कृष्णा दळवी (27) कल्पना कृष्णा दळवी (58) राजू खंडोबा पाटील (बडस्कर) (24 सर्वजण रा. मंडोळी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी, गणेशमूर्तीची मिरवणूक सुरू असताना एकाकडून शिवीगाळ करण्यात आली. याचा जाब विचारण्यासाठी गेल्याने दुसर्‍या गटाने वाद उकरून काढला. याचे पर्यवसान विळा, दगड  हल्ल्यात झाले. यात चौघेजण जखमी झाले. तर भांडण सोडवण्यास गेलेल्यांनाही धक्‍काबुक्‍की करून मारहाण करण्यात  आली.

जखमींना उचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी शेखरच्या मानेवर तर महेशच्या डोक्यावर विळ्याने वार करण्यात आला आहे. राजू पाटील याच्या दोन्ही हातावर वार करण्यात आला आहे. तर भांडण सोडवण्यास गेलेली शंकरची आई कल्पना यांच्यावरही दगडाने वार करण्यात आला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्त समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी 17 जणांवर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यावेळी जखमींचे नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

ग्रामीण एसीपींकडून चौकशी

ग्रामीण एसीपी के. शिवारेड्डी यांनी जिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. सदर वाद पूर्ववैमनस्यातून झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.