Wed, Apr 01, 2020 00:08होमपेज › Belgaon › कचरामुक्‍त रेल्वेमार्गासाठी हवा मानसिक बदल : पाटील

कचरामुक्‍त रेल्वेमार्गासाठी हवा मानसिक बदल : पाटील

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 15 2018 1:47AMखानापूर : प्रतिनिधी

तालुक्याच्या जंगलभागातून गेलेल्या लोहमार्गावर प्लास्टिक व टाकाऊ पदार्थांच्या कचर्‍यामुळे वन्यजीवांना जीव गमवावा लागत आहे. या समस्येवर उपाय योजण्यासाठी रेल्वेच्या सहकार्याची गरज आहे. निसर्ग रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव ठेवून रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रत्येकाने जंगलभागात तरी कचरा टाकू नये. निसर्ग हेच प्राण्यांचे घर असल्याने वन्यजीवांच्या अधिवासाला त्रास होणार नाही, याबाबत समाजाच्या मानसिकतेत बदलाची आवश्यकता असल्याचे मत खानापूरचे उपवनसंरक्षणाधिकारी सी. बी. पाटील यांनी व्यक्‍त केले.

खानापूर वनविभागाच्यावतीने शनिवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती परिसर रक्षणाचा संदेश देत वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शेडेगाळी येथील रेल्वेमार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या शंभर विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने मोहिमेत भाग घेऊन दोन कि. मी. अंतराचा रेल्वेमार्ग साफ केला.

टाकाऊ खाद्यपदार्थांच्या आशेने जंगलातील प्राणी लोहमार्गाच्या दिशेने येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी अडचणीच्या ठिकाणी रेल्वेची गाठ पडल्यास हकनाक जीव गमावण्याची वेळ गवीरेड्यांसारख्या प्राण्यांवर येते. विशेष करुन शेडेगाळी ते हारुरी या भागात वन्यजीवांच्या अपघाती बळींचे प्रमाण अधिक असल्याने जाणीवपूर्वक या मार्गावरच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. लोहमार्गाच्या दोन्ही बाजूचा प्लास्टिक कचरा, बाटल्या, ग्लास, टाकाऊ पदार्थांचे संकलन करण्यात आले. त्यामुळे दोन्ही दिशेचा लोहमार्ग उजळून निघाला होता.

तत्पूर्वी कचरामुक्‍त लोहमार्गाची जंगलभागातील आवश्यकता याविषयी वनक्षेत्रपाल एस. एस. निंगाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, रेल्वेच्या धडकेने वन्यजीवांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी समाजात जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. खानापूरचे जंगलवैभव वाचविण्याची आपलीच जबाबदारी असल्याने आजपासून रेल्वेतून प्रवास करताना जंगलभागात कोणीही कचरा टाकणार नाही, याची शपथ घ्यावी. 
स्वतःच्या घराइतकेच वन्यजीवांचे घरही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केल्यास ही समस्या मार्गी लागू शकते, अशी आशा व्यक्त केली.

दै. पुढारीच्या वृत्ताची दखल !

वन्यप्राण्यांच्या अपघातांना लोहमार्गावरील वाढता कचरा आणि प्रदूषण कारणीभूत असल्याचे नमूद करत दै. पुढारीने गेल्या आठवड्यात रेल्वेट्रॅक नव्हे डंपिंग ग्राऊंडच या मथळ्याखाली विशेषवृत्त प्रसिद्ध केले होते. रेल्वेविभाग आणि वनखात्याच्या सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे सांगून कचरामूक्त लोहमार्ग ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केले होते. आजच्या अभियानाप्रसंगी अधिकार्‍यांनी त्या वृत्ताचा पुनरुच्चार करत जागृतीबद्दल आभार मानले.

Tags : Air mental change , garbage-free, railroad ,belgaon news