Thu, Sep 24, 2020 08:33होमपेज › Belgaon › बेळगाव : दंगलीनंतर अटक-आंदोलनसत्र

बेळगाव : दंगलीनंतर अटक-आंदोलनसत्र

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 20 2017 1:39AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

खडक गल्ली परिसरात सोमवारी रात्री उसळलेल्या धार्मिक दंगलीनंतर मंगळवारी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले, तर अटकेतील युवकांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनसत्र अवलंबिले. परिणामी, बेळगावात दिवसभर तणाव होता त्यामुळे पोलिसांनी सायंकाळी दंगलग्रस्त भागात पथसंचलन करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

अय्यप्पा स्वामींच्या पूजेची तयारी सुरू असताना स्वागत कमानीवर दगडफेक झाल्याचे निमित्त होऊन सोमवारी रात्री खडक गल्ली, भडकल गल्ली, जालगार गल्ली, दरबार गल्ली, चांदू गल्ली परिसरात धार्मिक दंगल उसळली. त्यात सात वाहने जाळण्यात आली तर प्रार्थनास्थळांवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत डीसीपी शंकर मारीहाळ जखमी झाले. त्याशिवाय खडक गल्लीतील एक महिलाही जखमी झाली. 

सोमवारच्या दंगलीनंतर पोलिसांनी मंगळवारी पहाटेपर्यंत  धरपकडसत्र चालवून 23 युवकांना अटक केली, तर मंगळवारी सायंकाळी आणखी चौघांना अटक केली. 
परिणामी, मंगळवारी खडक गल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता होती. परिसरातील अनेक व्यवहार बंद होते. दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर अफवांनाही ऊत आला होता. त्यामुळे  भेंडीबाजार परिसरात काही काळ बंदसदृश परिस्थिती निर्माण झाली. 

सोमवारी रात्री अचानकपणे घडलेल्या दंगलीमुळे संपूर्ण बेळगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी अफवांनाही उधान आले होते. खडक गल्ली, दरबार गल्ली, कोतवाल गल्ली, भडकल गल्ली, खडेबाजार, भेंडीबाजार या परिसरातील अनेक व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. रात्री झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी पहाटेपर्यंत अटकसत्र चालविले होते. त्यामुळे संपूर्ण भागात दहशत होती.  

नातेवाइकांचे आंदोलन 
पोलिसांनी 27 जणांना अटक केली. त्यानंतर अटकेतील युवकांच्या नातेवाइकांनी न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. घोषणाबाजीमुळे वकील संघटनेने  मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन आंदोलकांवर कारवाईची मागणी केली. 

याचवेळी काही राजकीय नेत्यांनी प्रभारी पोलिस आयुक्त रामचंद्र राव यांची भेट घेऊन समाजकंटकांवर कारवाईची मागणी केली. रामचंद्र राव यानी दोन्ही धर्मियांतील वरिष्ठांशी स्वतंत्र चर्चा करून दंगलीसंदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी सहकार्याची मागणी केली. 

सायंकाळी खडक गल्ली व संवेदनशील परिसरात पोलिसांचे पथसंचलन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयापासून पथसंचलनाची सुरुवात झाली. पथसंचलनात  रामचंद्र राव व जिल्हा पोलिस प्रमुख रविकांतेगौडा यांच्यासह शहर परिसरातील पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.  यामध्ये राखीव तसेच जलदकृती दलाचे पोलिस सहभागी झाले होते. खडक गल्ली, भडकल गल्ली. शनिवार खूट, खडेबाजार, जालगार गल्ली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पथसंचलनाची सांगता झाली. 

सोमवारी रात्री अय्यप्पा पूजेची तयारी सुरू असताना दंगलीला सुरुवात झाली होती. रात्रीच्या दंगलीमुळे मंगळवारची पूजा होणार की नाही असा प्रश्‍न होता. परिस्थितीचा अंदाज घेत पोलिस प्रशासनाने  नियोजित अय्यप्पा पूजेला परवानगी दिली. मंगळवारी सायंकाळी पूजा पार पडली. भागातील मंदिरे आणि प्राथर्नास्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शांततेसाठी प्रयत्न
तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी संवेदनशील परिसरात पथसंचलन केले. खडक गल्ली आणि परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उत्तर विभाग पोलिस महासंचालक रामचंद्र राव यांनी दोन धर्मीयांची स्वतंत्र बैठक घेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

संवेदनशील परिसरात तणावपूर्ण शांतता 
सोमवारी रात्री खडक गल्ली व परिसरात तुफान दगडफेक झाली होती. वाहनांची नासधूस करण्यात आली होती. मंगळवारी रस्त्यावरील वाहने आणि दगड-विटांचा खच हटविण्यासाठी सकाळपर्यंत प्रशासनाची  कसरत सुरू होती. त्यातच धरपकड  सत्रांतर्गत पोलिसांनी काहींवर संशय व्यक्त करत खडक गल्ली येथील 5 तर जालगार गल्ली येथे घरासमोर लावलेल्या दुचाकी नेल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.