Sat, Feb 29, 2020 13:03होमपेज › Belgaon › सायकल चालवा, इन्सेंटिव्ह मिळवा!

सायकल चालवा, इन्सेंटिव्ह मिळवा!

Last Updated: Nov 08 2019 12:01AM
बेळगाव : प्रतिनिधी

काळाच्या ओघात मागे पडलेल्या सायकलीचे महत्व आता पुन्हा जगासमोर आले आहे. पर्यावरणाचे रक्षण, आरोग्य जपणे आणि पैशांची बचत अशा विविधांगाने सायकल महत्वाची वाटू लागली आहे. त्यामुळेच आता जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना सायकल चालवा आणि इन्सेंटिव्ह मिळवा, अशी भन्‍नाट संकल्पना राबवणार आहे.

बैठी जीवनशैली, वाहनांची बेसुमार वाढ, त्यातून होणारे प्रदूषण, आरोग्याच्या समस्या यामुळे देशभरात आता फिट इंडिया संकल्पना पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फिट इंडिया मोहीम सुरू केली आहे. त्यांनी देशभरातील लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. कमी वयात होणारे मधुमेह, उच्च किंवा कमी रक्तदाब, लठ्ठपणा यामुळे सर्वाधिक तरुणांचा देश आरोग्याच्या समस्येने जर्जर होऊ नये, यासाठी फिट इंडिया मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहीमेत सहभागी होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी जैन अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी सायकल चालवा, इन्सेंटिव्ह मिळवा, हा उपक्रम राबवणार आहे.

बेळगावात याआधी विश्‍वेश्‍वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) आवारात कोणतेही वाहन घेऊन जाण्यास बंदी होती. त्यामुळे विद्यार्थी, भेट देण्यास येणार्‍या लोकांसाठी सायकलींची सोय करण्यात आली होती. त्यानंतर जीएसएस महाविद्यालयाने महिन्यातील ठरावीक दिवशी सायकल चालवा मोहीम राबवली. विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग सायकलचा वापर करतात. आता जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

सायकल चालवणार्‍या विद्यार्थ्यांना पाचशे रूपयांची सबसिडी किंवा इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे. पण, ती कधी मिळणार, याबाबत नोटिसीत उल्‍लेख नाही. शिवाय नोटिसीत सायकलसाठी विशेष पार्किंगची सोय करण्यात येणार आहे.ज्या विद्यार्थ्यांना सायकलबाबत अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी प्रशासक कर्नल डिसोजा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे सायकल क्‍लब स्थापन करणे व फिटनेसबाबत जागृती निर्माण करण्याचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फिटनेसबाबत महाविद्यालयाने पुढाकार घेतला असल्यामुळे विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.