Sat, Feb 29, 2020 11:57होमपेज › Belgaon › प्रदक्षिणेच्या गोळीने भक्ताचा बळी

प्रदक्षिणेच्या गोळीने भक्ताचा बळी

Published On: Feb 21 2019 1:31AM | Last Updated: Feb 20 2019 11:44PM
घटप्रभा : वार्ताहर

पालखी प्रदक्षिणेवेळी हवेत गोळीबार करताना एक गोळी भक्ताच्या कपाळातून आरपार गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गोकाक तालुक्यातील ढवळेश्‍वर गावातील उळ्ळीमठाच्या रंगेश्‍वर देवाच्या उत्सवात बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली.

निजगुणी मारुती अंगडी (वय 38) असे मृताचे नाव आहे. बंदूक उडविण्याचा मान महादेव नाडगौडा  यांच्याकडे होता. तोही ढवळेश्‍वरचाच रहिवाशी आहे.मुडलगीनजीकच्या ढवळेश्‍वर येथील उळ्ळीमठाच्या रंगेश्‍वर देवाचा वार्षिक कार्तिकोत्सव परंपरेप्रमाणे साजरा होत असताना बुधवारी समारोप सोहळ्यात पालखी प्रदक्षिणा घातली जात होती. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर एका बंदुकीतून एक गोळी हवेत झाडण्याची प्रथा आहे. त्यानुसार चार प्रदक्षिणांवेळी चार गोळ्या झाडल्या गेल्या. पण पाचव्या प्रदक्षिणेवेळी  गोळी उडविताना बंदुकीचे टोक कलल्याने  गोळी जवळच उभे असलेल्या निजगुणी अंगडीच्या कपाळातून आरपार गेली. 

घटनेची माहिती मिळताच गोकाकचे डीवायएसपी प्रभू डी. टी., मुडलगीचे सीपीआय मुरनाळ यांच्यासह कुलगोड उपनिरिक्षकांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.  या दुर्देवी घटनेमुळे ढवळेश्‍वर, कुळगोड, मुडळगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.