Thu, Sep 24, 2020 08:44होमपेज › Belgaon › बेळगाव आगारात येणार 86 नव्या बसेस

बेळगाव आगारात येणार 86 नव्या बसेस

Last Updated: Jan 08 2020 11:10PM
बेळगाव : प्रतिनिधी

वायव्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बेळगाव आगाराकडे मार्चअखेर 86 नवीन बस येणार असून, यातील 30 नव्या बस आता ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे मागणीच्या ठिकाणी बससेवा सुरू करण्यासाठी मदत होणार आहे. मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या ऐरावत बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बेळगाव विभागातून संपूर्ण जिल्ह्यास सध्या  पाच राज्यांसाठी सुविधा दिली जाते. बेळगाव आगाराकडे एकूण 720 बसेस बस उपलब्ध आहेत. गतवर्षी 60 बसेस भंगारामध्ये काढल्याने बर्‍याच ठिकाणी बससेवा देण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. विशेषत: बेळगाव परिसराच्या आजुबाजूच्या गावांमधील बससेवा बंद करण्यात आली होती. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना आणि बेळगावात रोज येणार्‍या कर्मचार्‍यांंना बसला होता. काही ठिकाणी बससेवा अनियमित करण्यात आली. अतिरिक्त बससाठीचा प्रस्ताव शासनाकडे नोव्हेंबर 2019 मध्ये पाठवण्यात आला होता. यावेळी बेळगाव आगारासाठी 90 बसेसची मागणी करण्यात आली होती. 

परिवहन महामंडळाने बेळगाव आगारासाठी यंदा 86 बसेस देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यातील 30 बस पाठवण्यात आल्या आहेत. यावर्षी एकूण सहा ऐरावत बस बेळगाव आगाराला मिळणार असून, यामधील 4  बस आता ताफ्यात सामील झाल्या आहेत.

एका बसची किंमत सव्वा कोटी रुपये असून या चारही ऐरावत बस आता लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये तिरुपती, नाशिक, बंगळूर शहराचा समावेश आहे. या बस ताफ्यात आल्यानंतर बहुतांशी ठिकणी सेवा सुरू करण्यासाठी मदत होणार आहे.

 "