Sat, Feb 29, 2020 13:36होमपेज › Belgaon › 488 पतसंस्थांकडून 480 कोटींचा चुना

488 पतसंस्थांकडून 480 कोटींचा चुना

Published On: Feb 21 2019 1:31AM | Last Updated: Feb 20 2019 11:34PM
बेळगाव : अंजर अथणीकर

सहकार चळवळीला 117 वर्षे पूर्ण होताना गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये याला ग्रहण लागले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 488 सहकार पतसंस्था बुडाल्या असून यामधील 73 हजार ठेवीदारांना 480 कोटींचा फटका बसला आहे. अगदी दहा हजारापासून ते 70 लाखापर्यंतचे ठेवीदार आहेत. बुडालेल्या पतसंस्था अगदी दहा लाखापासून ते दीडशे कोटीपर्यंतच्या ठेवी असणार्‍या संस्था आहेत. याच्या वसुुलीसाठी मात्र शासकीय यंत्रणा अगदी कासवगतीने काम करत आहे. 

स्थानिक लोकांची आर्थिक अडचण दूर व्हावी या उद्देशाने शहराबरोबरच गावागावांमध्ये पतसंस्थांचे जाळे विणले गेले. सुरुवातीच्या काळात याला चांगला प्रतिसाद मिळाला. आजही बेळगाव जिल्ह्यात 4 हजार 933 सहकारी पतसंस्था उत्तम स्थितीत काम करत आहेत. नव्या संस्थांच्या उगमाबरोबरच दिवाळखोरीत निघणार्‍या पतसंस्थांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षात 488 सहकारी पतसंस्था बुडाल्या आहेत. यामध्ये 73 हजार 200 ठेवीदारांना 488 कोटींचा फटका बसला आहे. पतसंस्थांमध्ये ठेवी अडकलेल्यांमध्ये बहुतांश छोटे व्यापारी, सेवानिवृत्त कर्मचारी, भाजी विक्रेते, सामान्य शेतकरी, महिलांचा अधिक समावेश आहे. 

ठेवीच्या वसुलीसाठी अनेकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे तर काही जणांंनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. संस्था चालक गजाआड  गेले तरी ठेवी मात्र अद्याप कोणाला मिळाल्या नाहीत. काही संस्थांनी ठेवीदार आणि कर्जदारांमध्ये करार करुन त्यांची गाठभेट करुन दिली आहे. यामुळे काही ठिकाणी थोडाफार पैसा ठेवीदारांना मिळाला  आहे.  पतसंस्थामध्ये ठेवी बुडालेल्या ठेवीदारांची रक्कम अगदी दहा हजारपासून ते 70 लाखापर्यंत आहेत. ठेवी बुडालेल्या ठेवीदारांनी अगदी अंथरुण धरले आहे. काहीजणांना मानसिक धक्का  तर काहींनी प्राण गमावले आहेत. याकडे शासनाने मात्र गांभीर्याने पाहिलेले नाही.