Tue, May 26, 2020 14:57होमपेज › Belgaon › महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तेलंगणाचे 350 मजूर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तेलंगणाचे 350 मजूर

Last Updated: Mar 29 2020 1:09AM
उमरगा : पुढारी वृत्तसेवा 

कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मुंबईला कामानिमित्त गेलेल्या तेलंगणातील 350 जणांना गावाकडे परतत असताना तालुक्यातील कसगी येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27) रात्री रोखले. कर्नाटक पोलिसांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याने सर्व मजूर कुटुंबीयांसह अडकून पडले आहेत.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतून कामानिमित्त शेकडो लोक मुंबईच्या विविध भागांत दाखल झाले. काही कंपनीत, तर अनेक जण रस्त्याच्या कडेला छोटा-मोठा उद्योग व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने सर्वत्र संचारबंदी लागू आहे. रोजच्या कामाने कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने व कोरोनाच्या भीतीने मुंबईतील लोकांना आपल्या गावची ओढ लागली आहे. राज्य व जिल्हाबंदी लागू झाल्याने शुक्रवारी रात्री तेलंगणा येथील नारायण पेठ जिल्ह्यातील कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईच्या विविध भागांत राहून काम करून कुटुंबाचा सांभाळ करीत होते. शुक्रवारी टेम्पो, ट्रक व मिळेल त्या वाहनाने 350 ते 400 लोक लहान बालकांसह गावाकडे निघाले होते. उमरगा तालुक्यातील चौरस्ता जकेकूर येथून गुलबर्गाकडे निघाले असता सीमेवर असलेल्या कसगी गावाच्या सीमेवरच रात्रीच्या वेळी कर्नाटक पोलिसांनी सीमा प्रवेश नाकारल्याने हे लोक अडकून पडले.