Sat, Sep 26, 2020 23:38होमपेज › Belgaon › महिलेकडून 1500 जणांना गंडा 

महिलेकडून 1500 जणांना गंडा 

Last Updated: Nov 13 2019 10:56PM
बेळगाव : प्रतिनिधी

मुद्रा योजनेसह विविध सरकारी योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून भातकांडे गल्ली परिसरातील एका महिलेने सुमारे 1500 जणांना आर्थिक गंडा घातला आहे. हे लोक जेव्हा तिच्या घरी जाऊन बसले तेव्हा तिने आपले अपहरण झाल्याचा बनाव करत मार्केट पोलिसांत फिर्याद दिल्याचे समजते. प्रकरण ठाण्यापर्यंत गेले असून, या प्रकरणी अद्याप कोणावर गुन्हा दाखल झालेला नाही. 

भातकांडे गल्ली परिसरात राहणार्‍या एका महिलेने वडगाव, शहापूर, सुळेभावी, खासबाग, काकती, होनगा, चन्नहोसूर, कल्लोळसह  शहर व तालुक्यातील सुमारे 1500 जणांकडून रक्‍कम उकळली आहे. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवून देतेे, असे सांगून या महिलेने काही महिलांकडून प्रत्येकी 60 हजार रुपये, तिरूपती बालाजी ट्रस्टकडून विधवांना कर्ज, उद्योगिनीसाठी कर्ज असे सांगत शेकडो महिलांकडून प्रत्येकी 3 हजार रुपये उकळले आहेत; पण दोन ते अडीच वर्षे लोटली तरी कोणालाही कर्ज दिले नाही अथवा घेतलेली रक्‍कम परत दिली नाही. 

वडगावचे लोक ठाण्यात 

वडगाव परिसरातील 300 जणांना या महिलेने फसविल्याचे स्पष्ट झाले असून, तेथील लोकांनी या महिलेकडे रकमेची विचारणा केली. परंतु, ती काहीच प्रतिसाद देत नाही म्हटल्यानंतर तिच्याविरोधात वडगाव पोलसांत फिर्याद दाखल केली. 

महिलेकडून अपहरणाचा बनाव

मंगळवारी रात्रीपर्यंत सदर महिला गुंतवणूकदारांसमवेत होती. परंतु, बुधवारी अचानक तिने आपले अपहरण केल्याची फिर्याद मार्केट पोलिसांत दिली. ज्यांच्याविरोधात ही फिर्याद होती ते सर्वजण सायंकाळी मार्केट ठाण्यात दाखल झाले. आम्ही तिचे अपहरण केले नसून, आमचीच मोठी रक्‍कम ती देणे आहे, असे या गुंतवणूकदारांनी सांगितले.

या प्रकरणी सदर महिलेला पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी बुधवारी रात्री ठाण्याकडे बोलावून घेतले. संबंधित गुंतवणूकदार देखील हजर झाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांची चौकशी सुरू होती.     

अनेकांची व्यक्‍तिगतही फसवणूक 

सदर महिलेने अनेक गोरगरिबांकडून रक्‍कम लाटली आहेच. शिवाय काहीही कारण सांगून व्यक्‍तिगतरीत्या लाखो रुपयांची रक्‍कमही तिने घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु, हे सर्व चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

 "