निपाणी : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने सर्वच अत्यावश्यक सुविधा सर्वसामान्यांना एकत्र मिळवून देण्यासाठी 112 ही हेल्पलाईन (फोन नंबर ) अस्तित्वात आणला आहे. प्रत्यक्षात बेळगाव जिल्ह्यात रविवार दिनांक 24 रोजी या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. दरम्यान निपाणीत मंगळवारी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी या वाहनाचे लॉन्चिंग नगरपालिका कार्यालय समोर अयोजित कार्यक्राम करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री ना. शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबर्गी, उपअधीक्षक मनोजकुमार नायक, पालिकाआयुक्त महावीर बोरणावर,नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे सभापती सद्दाम नगारजी यांच्यासह नगरसेवक, पोलिस कर्मचारी उपस्थित होते. स्वागत शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी केले.
पूर्वी तातडीची सुरक्षितता मिळविण्यासाठी अपघात झाल्यानंतर 108 हा फोन नंबर डायल करावा लागत होता. तर एखादी जळीत घटना झाल्यानंतर 101 तर अपघात व गुन्ह्यासंदर्भात 100 नंबर हा नंबर नागरिकांना डायल करावा लागत होता. मात्र आता राज्य सरकारने नागरिकांना आपत्कालीन सेवेसाठी होणारा त्रास लक्षात घेऊन आता सगळ्यांसाठीच 112 नंबर वर आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी स्वतंत्र स्कार्पिओ वाहन तालुका व सर्कल पोलीस विभागात कार्यरत राहणार आहे. यासाठीची जनजागृती निपाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात केली आहे.
राज्य सरकारने आता राज्यात सर्वत्रच 112 या फोन नंबरवर आरोग्य, अग्निशमन, पोलिस या विभागा अंतर्गत येणाऱ्या घटनेशी संबंधित सुविधा नागरिकांना मिळवून देण्यासाठी राज्यभरात स्कार्पिओ वाहन कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.