Thu, Feb 20, 2020 16:40होमपेज › Belgaon › राज्यात 10 हजार शिक्षकांची भरती करणार : शिक्षणमंत्री

राज्यात 10 हजार शिक्षकांची भरती करणार : शिक्षणमंत्री

Published On: Sep 16 2019 1:37AM | Last Updated: Sep 16 2019 12:08AM
बंगळूर : प्रतिनिधी

राज्यात  डीएड, बीएड पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, शिक्षक भरती न झाल्याने ते सध्या सुशिक्षित  बेकार आहेत. मात्र सरकारने पदवीधारकांना खुशखबर दिली असून ऑक्टोबर अखेर दहा हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तशी घोषणा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी केली आहे. 

सरकारी शाळेतील मराठी, उर्दू व कन्नड  माध्यमाच्या अनेक शिक्षकांच्या जागा रिक्‍तआहेत. त्यामुळे अनेक शाळा तर एकशिक्षकी बनल्या आहेत. काही शाळांमध्ये विषय शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने गुणात्मक शिक्षण देण्यासाठी पहिली ते पाचवीपर्यंत डीएड शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहावी ते आठवीपर्यंत बीएड पदवी उमेदवारांची निवड करीत आहे. शिक्षण खात्यातर्फे शिक्षक पात्र परीक्षा (टीईटी) व सामाईक परीक्षा (सीईटी) घेऊन शिक्षकांची निवड केली जाणार आहे. शिक्षण खात्यातर्फे उच्च प्राथमिक शाळेतच शिक्षक भरती  केली जात आहे. त्यामुळे पहिली ते पाचवी वर्गासाठी अनेक शिक्षक टीईटी देऊन उत्तीर्ण झाले आहेत. पण, शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे डीएड कॉलेज ओस पडली आहेत. राज्यात निवृत्त शिक्षकांच्या रिक्त जागा अधिक आहेत. पण भरतीच झाली नाही.  राज्य सरकारने शाळांतून अतिथी शिक्षकांची भरती करून घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने दोन वर्षात 24 हजार शिक्षकांच्या जागा भरणार असे घोषित केले होते. पदवी घेऊन अनेक विद्यार्थी फिरत आहेत. पण शिक्षक भरती  झालेली नाही. 

ऑक्टोबरअखेर 10 हजार शिक्षकांची नेमणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. लवकरच नेमणुकीसंबंधी अधिसूचना जारी करण्यात येईल, असे मंत्री सुरेशकुमार यांनी आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे राज्यातील डीएड, बीएडधारकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.