Wed, Aug 12, 2020 20:20होमपेज › Belgaon › राजा शिवछत्रपती भवनसाठी 1.70 कोटी अनुदान

राजा शिवछत्रपती भवनसाठी 1.70 कोटी अनुदान

Published On: Jul 14 2018 12:54AM | Last Updated: Jul 14 2018 12:54AMनिपाणी : प्रतिनिधी

नगरपालिकेतर्फे आंबा मार्केटसमोर सर्व्हे नं. 132 मध्ये बांधण्यात येत असलेल्या राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनला नगरविकासमंत्री रमेश जारकीहोळी यांनी नगरविकास खात्यातून 1 कोटी 70 लाख रूपये अनुदान देण्याच्या सूचना खात्याच्या सचिवांना दिल्या असल्याची माहिती नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिली.शहरात राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवन बांधण्याचा निर्णय सन 2009 साली झाला होता. त्यासाठी 1 कोटी 98 लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्याला 6 सप्टेंबर 2012 साली मान्यता मिळाली.  निविदा झाल्यावर 28 टक्के जादा भरलेल्या 2 कोटी 63 लाखाच्या निविदेला मंजुरी मिळून 2012 पासून काम सुरू झाले आहे. या कामासाठी एसएमटीडीपी निधीतून 90 लाख रूपये, एसएफसी फंडातून 30 लाख रूपये, कन्नड सांस्कृतिक खात्याकडून 50 लाख रूपये, एसएफसी विशेष अनुदान 1 कोटी रूपये मंजूर झाले होते.

आता हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आणखी 1 कोटी 70 लाखांची गरज होती. त्यासाठी 22 जून रोजी झालेल्या पालिका सभेत सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. आता या भवनाचे अंदाजपत्रक 4 कोटी 39 लाख 31 हजार इतके झाले आहे. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी 10 जुलै 2018 रोजी बंगळूर येथे नगरविकास मंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन भवनाचे काम मार्गी लावण्यासाठी 1 कोटी 70 लाखाचे अनुदान मिळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. लागलीच मंत्री जारकीहोळी यांनी आपल्या खात्याच्या सचिवांना आदेश देत निधी मंजूर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे नगराध्यक्ष गाडीवड्डर यांनी सांगितले.

राज्याच्या अंदाजपत्रकात नगरविकास खात्याला 1700 कोटींचा निधी मिळाला असल्याने लवकरच 1.70 कोटी रू. निधी उपलब्ध करून राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनचे काम मार्गी लावले जाईल, असेही सांगण्यात आले.यावेळी सभापती अनिस मुल्ला, नगरसेवक बाळासाहेब देसाई, राजेंद्र चव्हाण, धनाजी निर्मळे, इम्तियाज काझी, विजय शेटके, दिलीप पठाडे, किरण कोकरे, शिरिष कमते, सुनील लाटकर उपस्थित होते.