Sat, Oct 24, 2020 08:47होमपेज › Bahar › स्त्री शक्तीचा जागर?

स्त्री शक्तीचा जागर?

Last Updated: Oct 18 2020 1:13AM
रेणुका कल्पना

स्त्री शक्तीचा जागर करायचा असेल, तर भारतातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यातल्या स्त्रीला तिच्या अधिकारांची जाणीव करून द्यायला हवी. तिचं रोजचं जगणं सुखकर करायला हवं. कोणतं काम स्त्रीचं आणि कोणतं काम पुरुषाचं याचे पारंपरिक निकष मोडायला हवेत.

कोरोना नसता तर आतापर्यंत नऊ दिवस जागर स्त्री शक्तीचा साजरा करणारे भलेमोठे फ्लेक्स रस्त्यावर दिसू लागले असते. ऑफिसला, नोकरीवर जाणार्‍या महिलांना नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालून मिरवता आलं असतं. अनेक मंडळांना खर्‍या दुर्गा म्हणून इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, जिजामाता, झाशीची राणी वगैरे महान स्त्रियांची आठवण काढता आली असती. त्यांच्यावर व्याख्यानं वगैरे ठेवता आली असती; पण झगमगाटात लपून गेलेल्या तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यातल्या बाईचं काय करायचं? नवरात्र चालू असताना मासिक पाळी आली म्हणून देवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही, असं हिरमुसून सांगणार्‍या तरुण मुलींचं काय करायचं? महान स्त्रीवरचं व्याख्यान ऐकणार्‍या अगदी छोट्या मुलीच्या मनात आलेल्या आपल्यालाही शाळा शिकता आली असती तर किती बरं झालं असतं, या भावनेचं नेमकं काय करायचं? नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकीच एखाद्या रंगाची अंगभर साडी घालून लोकलमधून जाताना पुरुष अंगचटीला येतो म्हणून वैतागलेल्या बाईचं काय करायचं? अशा अनेक स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र साजरा करण्याचा नेमका मार्ग कोणता, याचे प्राधान्यक्रम आता आपण लावून घ्यायला हवेत किंवा बलात्कार झालाच नाही असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गुपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत, हे तरी निदान ठरवून घ्यायला हवं.

काल घटस्थापना होती. आपलं सृजन साजरं करण्यासाठी शेतीचा शोध लावलेल्या बाईनेच चालू केलेला हा सण. मातीच्या पोटातून बीज अंकुरतं तसंच आपल्या गर्भाशयात हा नवा जीव अंकुरतो, तिथूनच उगवतो, हे स्त्रीला कळालं. आपलं गर्भाशय हे या सृजनशील पृथ्वीचं छोटं रूप आहे, हेही तिला उमगलं. त्याचाच उत्सव आजवर ती घटाच्या रूपात मांडत गेली. आज या घटांना देवीची उपमा दिली जाते.

नवरात्रीच्या तीन दिवसांत आपण दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीची उपासना करतो. नवरात्र म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, बुद्धीचा आणि धनाचा उत्सव, असंही म्हणतो; पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ही देवी अजिबात सुरक्षित राहात नाही. तिला साधी सन्मानाची वागणूकही मिळत नाही. स्त्रीभ्रूण हत्येच्या आरोपाखाली सुदाम मुंडे दुसर्‍यांदा अटक होतात. त्यांच्याकडे जाऊन पोटातल्या मुलीची हत्या करणार्‍यांना ती लक्ष्मीचं रूप वाटत नाही. लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागात बालविवाहाचं प्रमाण वाढलंय, अशी बातमी कालपरवाच सगळ्या पेपरमध्ये छापून आली होती. मुलींचं शिक्षणाचं वय असताना त्यांचं लग्न करून दिलं जातं, तेव्हा त्या सरस्वती आहेत, याची आठवण आपल्याला होत नाही. हाथरसमधल्या मनीषावर बलात्कार झाल्यावर मुली स्वतःची सुरक्षा करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी असक्षम असतात, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात. तेव्हाही ती दुर्गेचा अवतार आहे, हे त्यांच्या मनात येत नाही. हे चित्रं बदलत नाही, तेव्हा स्त्री शक्तीचा जागर झाला, असं म्हणता येणार नाही.

स्त्री शक्तीचा जागर करायचा असेल, तर भारतातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यातल्या स्त्रीला तिच्या अधिकारांची जाणीव करून द्यायला हवी. तिचं रोजचं जगणं सुखकर करायला हवं. कोणतं काम स्त्रीचं आणि कोणतं काम पुरुषाचं याचे पारंपरिक निकष मोडायला हवेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन कुणाच्याही आधाराच्या कुबड्या न घेता खंबीरपणे स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहील, हे पहायला हवं.

मुलींशी कसं वागायचं, त्यांचा सन्मान कसा राखायचा, याचे धडे आपल्या मुलांना द्यायला हवेत. या सगळ्यासाठी नऊ दिवसांत काही प्रयत्न करता येतायत का ते पहायला हवं. स्त्रीभ्रूण हत्या कधी थांबणार, मुलींना हवं तेवढं शिक्षण कधी मिळणार, बालविवाह कधी थांबणार, बलात्कार कधी थांबणार, मासिक पाळीची अस्पृश्यता कधी जाणार, लग्नात हुंडा देणं-घेणं कधी थांबणार, घरात स्त्रीला समान वागणूक कधी मिळणार, मुलीला वस्तूसारखं दान करायला लावणारी कन्यादानाची प्रथा कधी बंद होणार, तिच्या शरीरावर तिच्या एकटीचा अधिकार आहे, हे आपण कधी मान्य करणार, या नऊ प्रश्नांची उत्तरं नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपल्याला शोधायची आहेत. ही उत्तरं सापडतील, नवरात्रीचे नऊ दिवस नऊ देवींची पूजा आपण मोकळ्या मनाने करू शकू, नऊ रंगांची मजा निर्धास्तपणे लुटू शकू, तेव्हाच खर्‍या अर्थाने नवरात्रीचा उत्सव साजरा होईल.

समान मानव माना स्त्रीला 
तिची अस्मिता खुडू नका
दासी म्हणून पिटू नका वा देवी 
म्हणून भजू नका.

दासी, पुरुषाच्या पायाखालची घाण असलं काही समजून स्त्रीला मारू नकाच; पण देवी म्हणून देव्हार्‍यात बसवून तिची आरतीही करू नका. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर तरी स्त्रीला माणसासारखी समान वागणूक द्या, हीच कुसुमाग्रजांच्या स्वातंत्र्यदेवतेचीही विनवणी आहे.

 "