होमपेज › Bahar › भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमध्ये?

भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमध्ये?

Last Updated: May 30 2020 8:33PM
रेणुका कल्पना

कोरोना व्हायरसची सेकंड वेव्ह म्हणजे दुसरी लाट येणार, असे म्हटल्यापासून देशोदेशींचे सरकार आतून-बाहेरून हादरून गेले. पहिल्या लाटेतच देशाची, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची ऐशीतैशी करणारा कोरोना व्हायरस पुन्हा परतून येणार या विचाराने सगळे चिंतातूर झालेत. पण कोरोना व्हायरसची दुसरी लाट येणार म्हणजे फक्त पुन्हा लोकांच्यात कोरोना व्हायरसचा प्रसार वाढणार, असं नाही. तर त्याचबरोबर आधीपेक्षा कोरोना व्हायरस जास्त धोकादायकही होईल.

कोरोना व्हायरसची पहिली लाट म्हणजे पहिला उद्रेक झाला तो जानेवारी महिन्यात. फेब्रुवारीपर्यंत हा कोरोना व्हायरस जगभरात पसरला. मार्चच्या मध्यापर्यंत जवळपास सगळ्या देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आणि कोरोना व्हायरसची लागण झालेले नवीन पेशंट समोर येणं बंद होत नाही तोपर्यंत सगळ्या देशांनी लॉकडाऊन तसाच ठेवला होता.

पण अजूनही काही देशांनी लॉकडाऊन कायम ठेवलाय. काही देशांनी एकदा लॉकडाऊन उघडून देश पुन्हा बंद केला. पण कुठल्याही देशाला फार काळ लॉकडाऊनमध्ये राहता येणार नाही. ते अर्थव्यवस्थेला परवडणारंही नाही. पण लॉकडाऊन उघडल्यानंतर लोक पुन्हा एकमेकांत मिसळतील आणि त्यातूनच कोरोना व्हायरसची दुसरी किंवा अगदी तिसरीही लाट येऊ शकेल, अशी भीती वैज्ञानिक व्यक्त करतायत.

साथरोगाची दुसरी लाट म्हणजे काय?

वैद्यकीय भाषेत एखाद्या साथरोगाची दुसरी लाट म्हणजे व्हायरसचा प्रसार अचानक वाढण्याची घटना असे म्हटले जाते. एखाद्या साथरोगाचा पहिल्यांदा उद्रेक होतो तेव्हा काही लोकांच्या एका गटाला याची लागण होते. त्यानंतर प्रसार कमी झालाय असे आपल्याला वाटते. आणि मग लोकसंख्येच्या दुसर्‍या गटाला याची लागण सुरू होते. तेव्हा आपण व्हायरसची दुसरी लाट आली, असे म्हणतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता बोलून दाखवलीय. ‘जागतिक साथरोग हे नेहमी वेव्हमध्ये म्हणजे लाटेसारखे येतात. याचा अर्थ असा की, पहिल्या लाटेदरम्यान साथरोगाची तीव्रता कमी करणे शक्य झाले अशा ठिकाणी पुन्हा काही महिन्यांनी साथरोगाचा उद्रेक होऊ शकतो. पहिल्या लाटेवेळी लावलेले निर्बंध अचानक काढले तर दुसर्‍या लाटेत आधीपेक्षा जास्त वेगाने प्रसार होण्याचीही शक्यता असते,’ असे डब्ल्यूएचओचे आणीबाणी परिस्थिती तज्ज्ञ डॉक्टर माईक रायन यांनी सांगितले. 25 मे रोजी ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याचे उदाहरण आपल्याला चीन, जर्मनी, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये दिसूनही येते. जर्मनीमध्ये सापडलेल्या नव्या पेशंटच्या आकडेवारीवरून साथरोगाच्या प्रसाराचे प्रमाण वाढल्याचे दिसतेय. एका ठराविक लोकसंख्येत ठराविक काळात एखाद्या व्हायरसचा प्रसार किती जणांना होऊ शकतो, याचा विचार करून रोगाच्या प्रसाराचे प्रमाण काढले जाते. जर्मनीत ही गती 0.65 वरून 1.13 झाल्याचे समोर आलेय. दक्षिण कोरियामध्येही एका माणसामुळे नाईट क्लबमधल्या जवळपास 150 लोकांना एका रात्रीत लागण झाल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती निर्माण झालीय.

चीनने तर सगळ्या देशांच्या आधी लॉकडाऊन उघडला. मात्र दहा दिवसांपूर्वी तिथेही कोरोना व्हायरसचे काही नवीन पेशंट सापडल्याचे समोर आले. महत्त्वाचे म्हणजे आधीपेक्षा हा व्हायरस जास्त धोकादायक असल्याचेही समोर आलेय. याचा संसर्ग काळ म्हणजे व्हायरसची लागण झाल्यापासून ते त्याची लक्षणे दिसेपर्यंतचा काळ हा आधीपेक्षा जास्त वाढल्याचे लक्षात आलेय. शिवाय ताप, खोकला ही कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणेही आता या नव्या पेशंटमध्ये दिसत नाहीत.

भारतात कधी येणार दुसरी लाट?

कोरोना व्हायरसच्या उद्रेकाची दुसरी लाट भारतातही येण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जातेय. पण दुसरी लाट नेमकी कधी येईल, याबद्दल वेगवेगळी मते आहेत. आपण कोरोनाला रोखण्यासाठी किती प्रभावशाली उपाययोजना करतो, त्यावर लाट कधी येईल, याचे गणित अवलंबून आहे. पीटीआयच्या एका बातमीनुसार भारतात जुलै किंवा ऑगस्टमध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल. ऐन मान्सूनच्या काळात कोविड-19 च्या पेशंटची संख्या वाढताना दिसेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात दुसरी लाट येईल, असे सांगितले असले तरी ती तेव्हाच येईल, असे नाही.

भारतात किती प्रभावीपणे फिजिकल डिस्टन्सिंगचा अंमल केला जातो, तसेच भारत लॉकडाऊन कधी उठवतो, यावरही दुसर्‍या लाटेचा कालावधी अवलंबून आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा प्रभावी अंमल करण्यात अपयश आले, तर ही लाट अपेक्षेहून खूप लवकर येऊ शकते. शिव नाडर युनिव्हर्सिटीतले गणित विभागप्रमुख समित भट्टाचार्य सांगतात, ‘जेव्हा अचानकपणे कोरोनाच्या केसेसमध्ये खूप मोठी वाढ होईल, तेव्हा त्या वाढीला दुसरी लाट म्हणता येईल. भारतात जुलै किंवा ऑगस्टमध्ये मान्सूनच्या काळात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. या काळात आपण फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम किती काटेकोरपणे पाळतो, यावर दुसर्‍या लाटेचा उद्रेक अवलंबून आहे.’ बंगळूर इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रोफेसर असलेले राजेश सुंदरेसन हेही भट्टाचार्य यांच्या मताला दुजोरा देत सांगतात, ‘आपण दैनंदिन गोष्टी करण्यासाठी नेहमीसारखे घराबाहेर पडू तेव्हा कोरोनाचा प्रसार होण्याचा वेग आणखी वाढेल.’

साथीसोबत दुसरी लाटही येते

कुठल्याही साथरोगाची दुसरी लाट येते आणि ती लाट जास्त धोकादायक असते, हे आपल्याला इतिहासानेही वारंवार दाखवून दिलंय. बीबीसीच्या एका स्टोरीनुसार, मध्ययुगात म्हणजे साधारण 14 व्या शतकात ब्लॅक डेथ म्हणजेच प्लेग साथीचा पहिल्यांदा उद्रेक झाला. मात्र त्यानंतर प्रत्येक शतकात त्याची लाट येत राहिल्याचे पुरावे आपल्याला सापडतात. अगदी 18 व्या शतकापर्यंत प्लेगचा पुन्हा पुन्हा उद्रेक होत होता.

बरोबर शंभर वर्षांपूर्वी जगभरात आणि भारतातही एन्फ्लुएन्झा किंवा स्पॅनिश फ्लूची साथ पसरली. जगभरातल्या एक तृतीयांश लोकांना या फ्लूची लागण झाली. याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी या रोगाच्या दुसर्‍या लाटेने आधीपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतल्याचे म्हटले जाते. त्यावेळी आत्तासारख्या चांगल्या वैद्यकीय सुविधा किंवा आधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध नव्हते. आता आपल्याकडे ते उपलब्ध आहे. त्यामुळेच अगदी काही वर्षांपूर्वी उद्रेक झालेल्या सार्स आणि मर्ससारख्या व्हायरसची दुसरी लाट येण्यापासून आपण वाचू शकलो. पण हे व्हायरस आत्ताच्या कोरोना व्हायरसपेक्षा कमी वेगाने पसरत होते, हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मात्र 2008 मधे स्वाईन फ्लूची दुसरी लाट आली होती आणि त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.

R0 नंबर एकपेक्षा कमी करावा लागेल

कुठल्याही व्हायरसची, अगदी कोरोना व्हायरसची दुसरी लाट थांबवायची असेल तर एका माणसाकडून दुसर्‍या माणसाला त्याची लागण होणार नाही, याची पुरेपूर काळजी आपल्याला घ्यावी लागेल. थोडक्यात, कोरोना व्हायरसचा R0 म्हणजेच आरनॉट आपल्याला एकपेक्षा खाली ठेवायचाय, असे बीबीसीच्या स्टोरीत म्हटले आहे.

एखाद्या साथरोगात व्हायरसची लागण झालेल्या एका माणसामुळे साधारणपणे किती लोकांना लागण होऊ शकते हे दाखवण्यासाठी या R0 चा वापर केला जातो. सध्या कोरोना व्हायरसबाबतीत हा R0 भारतात 1.29 इतका तर जगात 5.7 इतका सांगितला जातो. हा R0 एकपेक्षा कमी होईल तेव्हाच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका माणसामुळे दुसर्‍या माणसाला कोरोनाची लागण होणार नाही. साहजिकच, साथरोग पूर्णपणे आपल्यातून गेला, असं म्हणता येईल.

बचावाची त्रिसूत्री

आनंदाची गोष्ट अशी की, आरनॉट नंबर एकपेक्षा कमी ठेवण्यासाठी नेमकं काय करायचंय हे आपल्याला आधीच माहीत झालंय. तेच उपाय आपण आणखी जोराने केले पाहिजेत. त्यातले तीन मुख्य उपाय म्हणजे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाईन.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोना व्हायरसची लागण झालेला एक माणूस आणखी किती जणांच्या संपर्कात आला असावा याचा शोध घेणे. त्या सगळ्या लोकांची टेस्टिंग म्हणजे कोरोना व्हायरसची लागण झालीय की नाही याची तपासणी करणे. आणि तिसरं म्हणजे, तपासणी केलेल्या लोकांना क्वारंटाइन करणे हे तीन उपाय मोठ्या प्रमाणावर करत राहिल्याने कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्यापासून थांबवलं जाऊ शकतं.

शारीरिक अंतर पाळणं, तोंडाला मास्क बांधणं आणि सतत आपले हात साबणाने धुत राहणं खूप महत्त्वाचं आहे. या तीन गोष्टी केल्याने कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. पण लॉकडाऊन संपल्यावर हे उपाय करणं अवघड जाऊ शकतं. विशेषतः भारतासारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या म्हणजे कमी जागेत जास्त लोक राहात असलेल्या देशात शारीरिक अंतर पाळणं अशक्य होतं. त्यामुळेच कोरोनावरची लस निघाल्यावरच किंवा सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच हर्ड इम्युनिटी विकसित झाल्यावरच हा कोरोना व्हायरस पूर्णपणे आपली पाठ सोडेल.