वारी असती तर : वैश्विक सुखाचा आनंद

Last Updated: Jun 27 2020 11:44PM
Responsive image

स्वामिराज भिसे
 


वारीतील प्रत्येक परंपरा वैश्विक सुखाचा आनंद देते. जगाला सुखी करायचे असेल तर वारीतील प्रत्येक परंपरेला आपल्याला नेमकं समजून घ्यायला हवं. तोंडले गावातील मुलाणी नामक गृहस्थ. या गावात मुलाणी घराण्याच्या चारहून अधिक पिढ्या गेल्या. संत ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा तोंडले या गावी विसाव्याला आला की, मानाचे अश्व आजही या मुलाणी कुटुंबाच्या येथे विसाव्याला थांबतात. तोंडले बोंडले या गावांच्या मध्ये नंदाचा ओढा आहे. पूर्वी या ओढ्यावर प्रचंड पाणी असायचे. म्हणून माऊलींचे अश्व या ओढ्याच्या कडेला बांधले जायचे. तिथेच या मुलाणींचे घर होते. या अश्वाला एके दिवशी हरभरा आणि घास या मुलाणींच्या पूर्वजांनी खाऊ घातला. तेथूनच ही परंपरा सुरू झाली. मुलाणी सांगतात की, ही आमची पिढ्यान्पिढ्यांची सेवा आहे. माऊली येणार म्हटल्यावर आमच्या घरी खर्‍या अर्थाने दिवाळी असते. धर्मवादी होण्यापेक्षा धार्मिक व्हा... या महात्मा गांधीजींच्या वाक्याचा नेमका अर्थ आपल्याला ही परंपरा समजावून सांगते. यावर्षी वारी असती तर आज सकाळी ज्ञानोबाराय वेळापूरहून भंडीशेगावकडे मार्गस्थ झाले असते. ठाकूर बुवा येथील गोल रिंगणाचा आनंद वारकर्‍यांनी घेतला असता. सकाळी 11.30 वाजता पालखी सोहळा बोंडले येथे आल्यानंतर ग्रामस्थांनी माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत केले असते. येथे माऊलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेऊन तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली असती. दरवर्षी तोंडले गावात जाताना नंदाच्या ओढ्याला पाणी असते. या पाण्यात माऊलींचा पालखी सोहळा ओलाचिंब झाला असता. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ग्रामस्थांनी सोहळ्यावर गुलाब पाण्याचे शिंपण करण्यासाठी शॉवरची व्यवस्था केली असती. या गुलाब पाण्याने माऊलींना जलाभिषेक घालण्यात आला असता. मुलाणींच्या घरी अश्व थांबले असते. याच तोंडले-बोंडले गावात आणखी एक परंपरा आहे. नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपालांसमवेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या शेकडो वर्षांपासून येथे दिंड्यांना थालीपीठ, दही, विविध प्रकारच्या चटण्या, उसळ, माडगं, भाकरी, भात, लोणचे अशा प्रकारची शिदोरी दिली जाते. ही शिदोरी तोंडले-बोंडले गावासह तांदूळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आदी भागातील गावकरी घेऊन येतात. अर्थातच ही शिदोरी अठरा पगड जातींच्या घरांमधून येते. या शिदोरींमधून आलेल्या निरपेक्ष प्रेमाचा वारकरी देखील त्याच आनंदाने स्वीकार करतात. 

प्रायोजक 

घ्या रे भोकरे भाकरी । दहिभाताची शिदोरी ॥ 

या संतवचनाची येथे नक्कीच आठवण होते. वारकरी संप्रदायातील वासकरांच्या दिंडीतील ही परंपरा मानवतेचे नेमके दर्शन घडविणारी आहे. या शिदोरीचा आनंदही आज वारकर्‍यांनी घेतला असता. सायंकाळी 4 वाजता माऊलींच्या अश्वांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला असता. त्यानंतर सायंकाळी 4.35 वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा टप्प्याजवळ आल्यानंतर संत सोपानदेवांचा पालखी सोहळा माऊलींच्या पालखी सोहळ्याजवळ आला असता. येथे दोन्ही संस्थानच्या वतीने एकमेकांना श्रीफळ भेट दिले असते. माऊली आणि सोपानदेव यांच्या पादुकांचे दर्शन होताच हजारो भाविकांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा जयघोष केला असता. या बंधुभेटीच्या सोहळ्याने आनंदात आणखीनच भर पडली असती. पंढरपूर जवळ येत असल्याने वारकर्‍यांच्या उत्साहात प्रचंड वाढ झाली असती. आज संत ज्ञानोबारायांसह संत तुकाराम, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, जगनाडे महाराज आदी संतांच्या पालख्यांचे टप्पा येथे आगमन होताच पंढरपूर तालुक्यातील प्रवेश झाला असता. संत ज्ञानदेव व संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामी तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला असता.