Tue, Jul 14, 2020 13:19होमपेज › Bahar › वारी असती तर : वैष्णवांचा मेळा पंढरीत 

वारी असती तर : वैष्णवांचा मेळा पंढरीत 

Last Updated: Jun 30 2020 10:08PM
  स्वामिराज भिसे

आषाढी वारीने पंढरीस आलेल्या लाखो वैष्णवांनी आज पहाटे चंद्रभागेचे स्नान, नामदेव पायरीचे आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन पंढरीचा निरोप घेतला असता. आज लाखापेक्षाही अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले असते. त्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटी वैष्णवांचा मेळाच भरला असता. सर्वत्र टाळ, मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू झाला असता. विठ्ठल नामाच्या या गजराने पंढरपूर नगरी दुमदुमून गेली असती.जुने बसस्थानक, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौक, गोपाळपूर, कराड नाका, सरगम चित्रमंदिर, दगडी पूल आदी मार्ग वारकर्‍यांनी आणि वाहनांनी फुलून गेले असते. आज पहाटेपासूनच वारकर्‍यांनी चंद्रभागेच्या दोन्ही तीरावर स्नानासाठी प्रचंड गर्दी केली असती. कोणताही भेदभाव न मानता अबालवृद्ध, महिला, पुरुष वारकर्‍यांनी चंद्रभागेचे स्नान केले असते. वारकर्‍यांनी चंद्रभागेचे स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी दूरवर रांगा लावल्या असत्या. गोपाळपूरजवळील इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत दर्शनबारी लागली असती. नामदेव पायरी, कळसाचे व विठुरायाचे दर्शन घेऊन वारकर्‍यांनी नगरप्रदक्षिणा पूर्ण केली असती. नगरप्रदक्षिणेच्या मार्गावर प्रचंड गर्दी झाली असती. या नगरप्रदक्षिणेनंतर वारकर्‍यांनी श्री संत ज्ञानदेव, श्री संत तुकाराम, श्री संत निवृत्तीनाथ, श्री संत सोपानकाका, श्री संत नामदेव, श्री संत मुक्‍ताबाई, श्री संत एकनाथ महाराज आदी संतांचे दर्शन घेतले असते. मात्र, या सर्वच संतांच्या पादुका आज शासनाच्या नियमानुसार  मोठ्या दिमाखात पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. नाना फुलांनी महाराष्ट्राची लालपरी आज सजली होती. गेली अनेक वर्षे लोकांची सेवा केल्याचे फळ तिला आज मिळाले. त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार उरला नसेल. हा सोहळा सर्व संस्थानांनी लाईव्ह केला होता. त्यामुळे ते पाहताना निष्ठावान वारकर्‍यांचे डोळे पाणावले होते. आज पहाटे मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांचे श्री विठ्ठल मंदिरात आगमन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरुवात झाली. शंख, घंटी व कलशाचे पूजन करण्यात आले. आग, तेज, वायू, ऊर्जा, पाणी यांचे पूजन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत शासकीय महापूजेचा मान विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मिळाला आहे. बडे यांनी कोरोनाच्या काळात विठ्ठल मंदिरात अखंड विणेचा पहारा दिला आहे. या सेवेचे फळ म्हणूनच आषाढी एकादशीला पांडुरंगाला महाअभिषेक करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. बडे यांच्या हस्ते विठ्ठलाला जलाभिषेक घातला गेला. त्यानंतर दूध, दही, मध, केशर यांचा अभिषेक करण्यात आला. सावळ्या विठुरायाला सुगंधी द्रव्य लावण्यात आले. महापूजेनंतर विठुरायाला अंगरखा, जरीकाठाचे पिवळे धोतर तर शिवपिंड धारण केलेल्या मस्तकावर रत्नजडीत पगडी व अंगावर जरीचे उपरणे तसेच गळ्यात तुळशीमाळा, पुष्पहार, कपाळाला चंदन टिळा व बुक्‍का लावण्यात आला. श्री विठ्ठलाला हा संपूर्ण पोशाख व अलंकार घालण्यात आला.

प्रायोजक

राजस सुकुमार मदनाचा पुतळा। रविशशिकळा लोपलिया ॥

हे सावळ्या विठुरायाचे विलोभनीय रूप पाहून उपस्थित मान्यवरांचा विठ्ठल भक्‍तीने उर भरून आला. विठ्ठल चरणी नतमस्तक होत त्यांनी विठुरायाला तुझी चरणसेवा अशीच घडू दे, असे साकडे घातले. श्री विठ्ठलाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री रुक्मिणी मातेची षोड्सोपचार पूजा करण्यात आली. मातेचा मळवट चंदन आणि कुंकवाने भरण्यात आला होता. मातेला साडी नेसविण्यात आली होती तर मस्तकी सोन्याचा मुकुट परिधान करण्यात आला होता. असा हा आनंदाचा उत्साहाचा सोहळा गर्दी कमी असली तरी भाविकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तो गोड मानून घेतला आहे.