Tue, Jul 14, 2020 11:00होमपेज › Bahar › महान संत निळोबाराय पिंपळनेरकर

महान संत निळोबाराय पिंपळनेरकर

Last Updated: Jun 30 2020 10:14PM
सचिन परब

आधी गोष्ट रामेश्‍वरभट्ट वाघोलीकरांची. ते ज्ञानेश्‍वरमाऊलींचे निस्सीम उपासक. त्यासाठी वतन सोडून आळंदीत राहायला गेले. तिथे तुकोबा दर वद्य एकादशीला माऊलींसमोर कीर्तन करायचे. रामेश्‍वरभट्टांना सर्वसमावेशक वारकरी विचार मान्य नव्हता. अशावेळेस तुकोबा शूद्र असून आणि वारकरी म्हणून माऊलींवर अधिकार सांगत होते. त्याला लोकमान्यता मिळत होती. त्यामुळे रामेश्‍वरभट्टांनी तुकोबांना अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला लावल्या; पण त्या तरल्या. तुकोबांचे दोस्त अनगडशाह बाबांच्या विहिरीवर आंघोळ केल्यानंतर रामेश्‍वरभट्टांच्या अंगाची आग होऊ लागली. काही केल्या जाईना. मग त्यांनी माऊलींच्या समाधीसमोर लोटांगण घातले. माऊलींनी त्यांना स्वप्नात येऊन द‍ृष्टांत दिला. रामेश्‍वरभट्ट सांगतात, 

ज्ञानेश्‍वरे मज केला उपकार। स्वप्नी सविस्तर सांगितले॥
तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर। का जो अवतार नामयाचा॥

रामेश्‍वरभट्ट मग मरेपर्यंत तुकोबांच्या विचारांचे झाले. जातीच्या अहंकारापायी फक्‍त ज्ञानदेवांनाच आपले म्हणत नामदेवराय आणि तुकोबांचा वारसा मात्र दुर्लक्षित करणार्‍यांना माऊलींनी हा कायमचा दणका देऊन ठेवला आहे; पण तरीही ‘ज्ञानोबा तुकाराम’ या गजरात बिब्बा घालण्याची कारस्थाने कायम होत राहिली. कधी माऊलींना वेगळे पाडून, तर कधी ‘नामदेव-तुकाराम’ असा नवा घोष जन्माला घालून. तरीही महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवणारा ‘ज्ञानोबा तुकाराम’ हा महामंत्र आजही प्रेरणा देतोच आहे. त्याचे मर्म ओळखून तुकोबानंतर तो जयघोष सुरू ठेवण्याचे काम केले ते निळोबारायांनी. बहिणाबाई, रामेश्‍वरभट्ट, कचेश्‍वर ब्रह्मे या तुकोबांच्या महत्त्वाच्या शिष्याप्रमाणेच संत निळोबा पिंपळनेरकर हेदेखील ब्राह्मण. एका शूद्राला गुरू मानल्यामुळे या चौघांनीही आपल्याच जातीच्या, नात्याच्या लोकांकडून छळ सोसला; पण तुकोबा सोडले नाहीत. निळोबा हे पिंपळनेर या आजच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या गावचे कुलकर्णी. लहानपणापासून देवभक्‍त. उपासनेत अडथळा होतो म्हणून सगळे दान करून सपत्निक तीर्थयात्रेला निघाले. फिरत पंढरपूरला आले. तिथे तुकोबांची कीर्ती ऐकली. म्हणून देहूला आले. तुकोबांनी आधीच हे जग सोडले होते. तुकोबांचे सुपुत्र तपोनिधी नारायणबुवा यांनी त्यांना तुकोबांचे चरित्र सांगितले. निळोबा भारावूनच गेले. तुकोबांना भेटायचेच या वेडाने ते 42 दिवस इंद्रायणीकाठी तुकोबांच्या नावाचा जप करत राहिले. खुद्द पांडुरंग आला. त्यांनी देवालाही हाकलवून लावले, 

प्रायोजक 

येथे तुजलागी बोलाविले कोणी। प्रार्थिल्यावांचूनि आलासी का॥

शेवटी तुकोबांनी त्यांना स्वप्नांत दर्शन दिले. कवित्व करण्याची आज्ञा केली. त्यानुसार निळोबांनी संख्या आणि दर्जा या दोन्ही मापदंडांनी श्रेष्ठ असलेली अभंगनिर्मिती केली. उदाहरण, 

साकरेंचा नव्हे ऊस। आम्हा कैचा गर्भवास॥
बीज भाजुनी केली लाही। जन्म मरण आम्हा नाही॥

तुकोबा आणि तुकोबापुत्र नारायण महाराज यांनी दाखवलेल्या रस्त्यावर निळोबा शेवटपर्यंत चालत राहिले. त्यांचे योगदान इतके महत्त्वाचे आहे की, महाराष्ट्रात संतांची परंपरा ‘निवृत्ती ते निळोबा’ अशी सांगितली जाते. त्या निळोबारायांना नमस्कार करून आषाढीच्या दिवशी हे ‘संतदर्शन’ जगण्याचा भाग बनवुया.

आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळा। माझिया सगळा हरिच्या दासां॥
कल्पनेची बाधा न हो कोणे काळीं। हे संतमंडळीं सुखी असो॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझियां विष्णुदासां भाविकांसी॥
नामा म्हणे तया असावे कल्याण। ज्यामुखी निधान पांडुरंग॥आहेत.