Fri, Nov 27, 2020 12:02होमपेज › Bahar › बहार विशेष : हायपरलूप स्वप्‍न नव्हे, वास्तव

बहार विशेष : हायपरलूप स्वप्‍न नव्हे, वास्तव

Last Updated: Nov 21 2020 11:31PM
अतुल कहाते
(आयटी तज्ज्ञ)

अतिवेगवान प्रवासाचे भविष्यातील साधन म्हणून हायपरलूपकडे पाहिले जात आहे.अलीकडेच अमेरिकेत व्हर्जिन हायपरलूप या कंपनीने ट्रेनची पहिली मानवी चाचणी घेतली. याच कंपनीने मुंबई ते चेन्नई या मार्गावर हायपरलूप महामार्ग उभारण्याची तयारी दाखवल्याचे सांगितले जाते. अर्थात हे तंत्रज्ञान अद्यापही प्राथमिक अवस्थेत आहे. 

विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तसतशी दळणवळणाच्या क्षेत्रातही बदल घडत गेले. गेल्या काही वर्षांत मॅगलेव्ह ट्रेन, बुलेट ट्रेन, ई-बस, सोलर प्लेन, सी प्लेन, फ्लाईंग कार यांसारख्या आधुनिक वाहतूक साधनांची चर्चा आहे. यामध्ये आणखी एक प्रगत तंत्रज्ञान म्हणून हायपरलूप विषयीही सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. अतिवेगवान प्रवासाचे भविष्यातील साधन म्हणून हायपरलूपकडे पाहिले जात आहे. वास्तविक याची सुरुवात 2012-13 मध्ये झाली. त्यावेळी प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क याने जाहिरपणाने याविषयी भाष्य केले. हायपरलूप या शब्दाचे दोन भाग आहेत. यातील हायपर हा शब्द हायपरसॉनिक स्पीड दर्शवण्यासाठी आहे. हा वेग साधारणपणे ताशी 4800 किलोमीटर्सपेक्षा अधिक असतो. म्हणजेच आवाजाच्या वेगापेक्षाही हायपरसॉनिक वस्तूचा वेग अधिक असतो. ‘लूप’ म्हणजे या वेगाने वहन करणारी साधने विस्कळीत स्वरूपात न राहता ती कुठे तरी एकमेकांना जोडलेली राहणे. त्यामुळे अशा वेगाने जाऊ शकणारी यंत्रणा उभी करणे म्हणजे हायपरलूप. अर्थात सध्याच्या काळामध्ये इतका वेग गाठण्याची कल्पना कुणीही मांडताना दिसत नाही. पण, तो गाठला जावा हे उद्दिष्ट मस्क यांनी ठेवले आहे. 

या प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा साधारण 300-350 किलोमीटर प्रतितास इतका वेग होता. 2019 मध्ये 450 किलोमीटर प्रतितास वेगापर्यंत मजल मारण्यात यश आलेले आहे. यापुढील चाचण्या त्याहून अधिक वेगाच्या घेतल्या जातील. 
यानिमित्ताने हायपरलूप तंत्रज्ञानामागचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही वाहनामधून प्रवास करत असताना दोन गोष्टी वेगावर मर्यादा टाकत असतात. एक म्हणजे फ्रिक्शन किंवा घर्षण आणि दुसरे म्हणजे एअर रेझिस्टन्स किंवा हवेचा पडणारा दाब. कितीही वेगाने धावणारे वाहन तयार करायचे झाले तरी या दोन गोष्टींमुळे त्याच्यावर एकूणच मर्यादा येतात. उदाहरणार्थ, टायरचा विचार केला तर घर्षणामुळे एका मर्यादेपलीकडे वेग गाठू शकत नाही. तशाच प्रकारे उलट दिशेने असेल किंवा चहूबाजूंनी पडणार्‍या हवेच्या दाबामुळे वेगावर मर्यादा येत असतात. या दोन्हींचा विचार करून, किंबहुना त्या मर्यादांवर मात करण्याच्या उद्देशाने हायपरलूपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये पूर्णपणे हवा शोषून बाहेर टाकत निर्वात पोकळी तयार केली जाते जेणेकरून हवेच्या दाबाचा प्रश्नच उरत नाही. बाहेरून येत असलेल्या हवेचा दाब रोखण्यासाठी पहिल्या हायपरलूपमध्ये ती शोषण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. पण, सुधारित तंत्रज्ञानामध्ये तीही गरज उरलेली नाही, असे म्हटले जाते. उरला घर्षणाचा मुद्दा. यासाठी हवेत उडणार्‍या विमानांसारख्या वाहनांमध्ये ज्याप्रमाणे घर्षणाचा प्रश्न सोडवला जातो तशा प्रकारे जमिनीपासून काही अंतरावरून धावणारे वाहन तयार करण्यात आले. अशा दोन गोष्टींचा मिलाफ घडवून आणत हायपरलूप तंत्रज्ञान विकसित झाले आहे. 

या तंत्रज्ञानावर वेगवेगळ्या प्रकारची बरीच चर्चा झाली. हे तंत्रज्ञान खरोखरीच चालणारे आहे का, असे प्रश्नही उपस्थित झाले. त्यामुळे एलॉन मस्क आणि इतरांनी मिळून असे ठरवले की, हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले असावे. त्याबाबत एकच कंपनी किंवा काही मोजक्याच व्यक्तींनी काम करण्यापेक्षा सर्वांनी मिळून त्यामध्ये भर टाकावी. त्यानुसार 2013 मध्ये हे तंत्रज्ञान ‘ओपन सोर्स’ स्वरूपात उपलब्ध झाले. त्यामुळे हे तंत्रज्ञान कुणीही वापरू शकते, त्यासंबंधीची उत्पादने तयार करू शकते, त्यात भर घालू शकते; पण त्यात काही सुधारणा घडवून आणल्यास त्या सर्वांना उपलब्ध करून देण्याचे बंधन त्या व्यक्तीवर किंवा कंपनीवर असेल, असे ठरवण्यात आले. थोडक्यात, कम्प्युटिंगमध्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमप्रमाणे याची रचना करण्यात आली. लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम इंटरनेटवरून मोफत डाऊनलोड करता येते आणि वापरता येते. पण, त्यामध्ये एखाद्या कुशल तंत्रज्ञाने काही सुधारणा केल्या किंवा भर घातली तर ती सुधारणा केल्यानंतरची आवृत्ती संपूर्ण जगाला उपलब्ध करून देण्याचे बंधन या तंत्रज्ञावर असते. तशाच प्रकारचे ओपनसोर्स आता हायपरलूपबाबतही करण्यात आले. 

इंग्लंडमधील व्हर्जिन ही विमानप्रवास, शीतपेये आणि इतर अनेक उद्योगांमधील एक मोठी कंपनी आहे. या कंपनीचे मालक रिचर्ड ब्रँडसन हेदेखील अशाच स्वरूपाच्या भन्नाट कल्पनांना मूर्तरूप देण्याबाबत सुप्रसिद्ध आहेत. परग्रहावर माणूस उतरवणे यांसारख्या गोष्टींमध्ये त्यांनाही एलॉन मस्क यांच्याप्रमाणेच प्रचंड रुची आहे. हायपरलूप ओपनसोर्स झाल्यानंतर त्यांनीही या प्रकल्पावर काम सुरू केले. याच कंपनीने मुंबई ते चेन्नई या मार्गावर हायपरलूप महामार्ग उभारण्याची तयारी दाखवल्याचे सांगितले जाते. याखेरीज अन्यही काही मोठे उद्योगपती आणि कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यातून या तंत्रज्ञानात सुधारणा होत गेल्या. 7-8 वर्षांमध्ये त्याच्या पुढच्या जनरेशन्स किंवा आवृत्त्या विकसित होत गेल्या. आता त्याची चौथी आवृत्ती किंवा पिढी आली आहे, असे मानले जाते.  

यादरम्यान अशा प्रकारचा प्रकल्प कोण उभा करून दाखवू शकतो किंवा त्याची चाचणी घेऊ शकतो याबाबत स्पर्धा घेण्यात आल्या. 2015-16 पासून अनेक कंपन्यांनी त्यावर कामही सुरू केले. अमेरिकेमध्ये घेण्यात आलेल्या एका चाचणीमध्ये 22 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यातील एलॉन मस्कच्या ‘स्पेस एक्स’ या कंपनीचा प्रयोग तेव्हा चांगलाच गाजला होता. पण त्याविषयी काही वादही निर्माण झाले होते. 

हायपरलूपच्या या प्रवासादरम्यान एक महत्त्वाचा टप्पा 9 नोव्हेंबर 2020 रोजी घडला. या दिवशी व्हर्जिन हायपरलूप या कंपनीने दोन माणसांना हायपरलूप ट्रेनमध्ये बसवून काही अंतरापर्यंत जाण्यासाठीची चाचणी घेतली आणि ती यशस्वीरीत्या पार पडली. हायपरलूप ट्रेनची पहिली मानवी चाचणी म्हणून तिचे वर्णन केले जाते. यामध्ये साधारणतः 500 मीटरचे अंतर 15 सेकंदांमध्ये कापण्यात आले. यासाठी त्यांनी गाठलेला वेग 160 किलोमीटर प्रति तास इतका होता. याच धर्तीवर आता वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. दूरवरच्या अंतरांसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करता येऊ शकेल का, त्यामध्ये धोके काय आहेत, त्यासाठी किती खर्च करावा लागू शकतो या द़ृष्टिकोनातून विचारमंथनही सुरू आहे. काही जणांच्या मते, हायपरलूप ट्रेन योग्य प्रकारे अस्तित्वात आल्यास मोठ्या प्रमाणावर खर्चाची बचत होऊ शकते. पण, दुसर्‍या बाजूला काहींचे म्हणणे असेही आहे की, या प्रकल्पासाठी सुरुवातीला करावा लागणारा खर्चच इतका प्रचंड असणार आहे की त्यातून परतावा मिळण्यास बरीच वर्षे लागू शकतात. 

हायपरलूपबाबत अशी मतमतांतरे सातत्याने पुढे येत आहेत आणि याबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. मध्यंतरी, कॅलिफोर्नियामध्ये हा प्रकल्प उभा करावा, असे म्हटले जात होते; परंतु तिथे आधीपासूनच हाय स्पीड ट्रेनसाठीचा प्रकल्प उभारला जात होता. त्यामुळे या नव्या प्रकल्पाची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला गेला. केवळ आर्थिकच नव्हे तर राजकीय आणि सामाजिक परिणामही याबाबत दिसू लागले आहेत. 

भारतामध्ये पुणे-मुंबईदरम्यान हायपरलूप ट्रेनचा प्रस्ताव मध्यंतरी पुढे आला होता. सद्यस्थितीत या प्रवासासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. पण, हायपरलूपद्वारे तो अर्ध्या तासात होऊ शकेल, असे म्हटले जाते. तथापि, त्यासाठीचा खर्च भारतासारख्या देशाला परवडणारा आहे का, अन्य मूलभूत सुविधा प्राथमिकच्याही आधीच्या अवस्थेत असताना अशा प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावेत का, ते गरजेचे आहे का असे प्रश्न विचारले जाऊ लागले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असे म्हटले होते की, जगभरात कुठेही हे तंत्रज्ञान वापरले गेलेले किंवा चाललेले दिसत नसताना आपण त्यामध्ये इतकी भरमसाट गुंतवणूक करावी का, याचा विचार करायला हवा. असा मतप्रवाह मांडणार्‍यांची संख्या मोठी आहे. कारण आज मुळातच भारतात अनेक राज्ये कर्जबाजारी झालेली आहेत. आरोग्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र सुधारणांसाठी निधीची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. ती पूर्ण केली जात नसताना बाल्यावस्थेत असणार्‍या अत्याधुनिक कल्पनेसाठी निधी पुरवावा का, असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे, हायपरसॉनिक वेगाने प्रवास करणे मानवी शरीराला सहन होणार आहे का, असा प्रश्न वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. प्रचंड वेगाने प्रवास करत असताना अचानकपणे काही तांत्रिक बिघाड होऊन वीज गेली किंवा एखादी वस्तू धडकली तर त्या स्थितीचे परिणाम काय होतील, यांसारख्या गोष्टींचा अभ्यास होणे गरजेचे आहे. हायपरलूप ट्रेनचा वापर मालवाहतुकीसाठी करण्यात यावा, असाही एक मतप्रवाह आहे. 

एकंदरीत, अतिवेगवान प्रवासासाठीचे हायपरलूप तंत्रज्ञान हे आता विज्ञान कथांमधून बाहेर पडलेले आहे आणि विज्ञानाकडे जवळपास आलेले आहे, पण त्यामधील धोके, व्यवहार्यता, राजकीय-आर्थिक गोंधळ पाहता ते किती वेगाने पुढे जाईल हे येणार्‍या काळात पहावे लागेल. अमेरिका, चीनसारख्या समृद्ध देशांमध्ये याची सुरुवात होऊ शकते आणि कालांतराने तेथील अनुभव पाहून, तिथे काय घडते हे पाहून भारताने या प्रकल्पाचा विचार करावा, असे सर्वसाधारण जनमत दिसते. 

अर्थात, आपल्या कार्यकाळात भरीव किंवा क्रांतिकारी काही तरी करून दाखवायचे असा ध्यास घेतलेली राजवट सध्या भारतात असल्याने हायपरलूपची सुरुवात किंवा पायाभरणी येणार्‍या काळात होऊ शकते.