Thu, Nov 26, 2020 21:34होमपेज › Bahar › ओबामांच्या नजरेतून राहुल व मनमोहन सिंग

ओबामांच्या नजरेतून राहुल व मनमोहन सिंग

Last Updated: Nov 21 2020 9:25PM
हेमंत देसाई

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘अ प्रॉमिस्ड लँड’ हे आठवणीवजा पुस्तक लिहिले असून, सध्या ते गाजत आहे. जागतिक वित्तीय अरिष्टापासून ते ओसामा बिन लादेनला ठार मारण्यापर्यंतच्या अनेक घटनांबद्दल ओबामा यांनी या खंडात लिहिले आहे. मात्र, ओबामा यांनी या पुस्तकात भारताच्या व पाकिस्तानच्या संदर्भात जे काही लिहिले आहे, तेच आपल्या द़ृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. 

अमेरिकेच्या वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांची अनेक आत्मचरित्रे आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत आणि गाजलीही आहेत. भारतातील खूप कमी पंतप्रधानांनी व राष्ट्रपतींनी आत्मचरित्र वा आठवणी लिहिल्या आहेत. इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, चंद्रशेखर, व्ही. पी. सिंग, अटलबिहारी वाजपेयी यांचे सर्वांगीण व परिपूर्ण आत्मचरित्र लोकांना नक्कीच वाचायला आवडले असते; परंतु आपल्याकडे यशवंतराव चव्हाण, शरद पवार अशा काही मोजक्याच नेत्यांनी आपल्या जीवनाबद्दल मोकळेपणाने लिहिले आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी ‘इनसायडर’ हे पुस्तक लिहिले, परंतु ती कादंबरी होती. त्यांनी जर सगळे खरेखुरे लिहिले असते, तर वादळच निर्माण झाले असते...अमेरिकेत मात्र थिओडोर रूझवेल्ट, हर्बर्ट हुवर, हॅरी ट्रुमन, आयसेनहॉवर, रिचर्ड निक्सन, जेराल्ड फोर्ड, जिमी कार्टर, रोनाल्ड रेगन, बिल क्लिटंन, जॉर्ज डब्ल्यू बुश प्रभृतींची आत्मचरित्रे प्रसिद्ध झाली आणि गाजलीदेखील. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘सर्व्हायव्हिंग टू द टॉप’ हे पुस्तक खूप पूर्वीच लिहिले असून, ते अर्थातच त्यांनी आपल्या औद्योगिक कामगिरीबद्दल लिहिलेले पुस्तक आहे. आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘अ प्रॉमिस्ड लँड’ हे आठवणीवजा पुस्तक लिहिले असून, सध्या ते गाजत आहे.

‘ड्रीम्स ऑफ माय फादर’ (1995) आणि ‘दि ऑडेसिटी ऑफ होप’ (2006) या प्रचंड खप झालेल्या पुस्तकांप्रमाणेच त्यांचे हे नवे पुस्तकदेखील आत्मकथनवजाच आहे. 2008 साली अध्यक्षीय निवडणुकीतील ओबामा यांचा प्रचार परिणामकारक होण्यास त्यांचे आशावादाने परिपूर्ण असे वक्तृत्व कारणीभूत होते, तशीच या पुस्तकांमुळे निर्माण झालेली त्यांची प्रतिमाही महत्त्वाची ठरली होती. ‘पेंग्विन रँडम हाऊस’ या नामांकित प्रकाशन संस्थेतर्फे दोन भागांत ओबामांचे आत्मकथन प्रसिद्ध होत आहे. त्याचा हा पहिला भाग आहे. अमेरिकेतील ट्रम्प विरुद्ध जो बायडेन यांची अध्यक्षीय निवडणूक पार पडल्यानंतर ओबामांचे हे पुस्तक प्रसिद्ध झाले, हे विशेष. ते जर त्यापूर्वी आले असते, तर डेमोक्रॅटिक पक्षाला त्याचा अधिक फायदा झाला असता. जागतिक वित्तीय अरिष्टापासून ते ओसामा बिन लादेनला ठार मारण्यापर्यंतच्या अनेक घटनांबद्दल ओबामा यांनी या खंडात लिहिले आहे. मात्र, ओबामा यांनी या पुस्तकात भारताच्या व पाकिस्तानच्या संदर्भात जे काही लिहिले आहे, तेच आपल्या द़ृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. 

पाकिस्तानातील अबोटाबाद येथे 2 मे 2011 रोजी अमेरिकन कमांडोजनी छापा टाकून ओसामा बिन लादेनला ठार मारले. या कारवाईस संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स आणि तत्कालीन उपाध्यक्ष जो बायडेन यांचा विरोध होता. आज बायडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली असून, डेमोक्रॅटिक पक्षाची आणि खासकरून, बायडेन यांची काश्मीरसंबंधातील भूमिका भारताच्या द़ृष्टीने फारशी अनुकूल नाही. ‘अफगाणिस्तानमधील अमेरिकी फौजांना लागणार्‍या साधनसामग्रीबाबत पाक सरकारने सहकार्य केले असले, तरीदेखील पाक लष्कर आणि आयएसआयचे तालिबान व अल कायदाशी संबंध आहेत, हे आम्हाला ठाऊक होते. त्यामुळेच लादेनविरोधी कारवाईचा पत्ताही आम्ही पाकिस्तानला लागू दिला नाही’, असे ओबामा यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. वास्तविक लादेन जेथे राहत होता, तेथून जवळच पाक लष्कराच्या छावण्या होत्या. त्याच्या नकळत ही कारवाई होणे असंभवनीय वाटते. लादेनचे निर्दालन केल्यानंतर पाकिस्तानमध्ये तीव्र विरोधी प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पाकिस्तान सरकारला या कारवाईची माहिती असणार, असे आरोपही झाले. ते आरोप फेटाळून लावण्यासाठी पाकिस्तान सरकारची यंत्रणा घाईघाईने कामाला लागली होती, हे येथे आठवते.

या कारवाईनंतर पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांना पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला झाल्याची टीका सहन करावी लागेल, असे मला वाटले होते; परंतु त्याना फोन केला तेव्हा त्यांनी, याचे कोणते का पडसाद उमटेनात. ही शुभवार्ताच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझी पत्नी बेनझीर भुत्तो यांना अल कायदाशी संबंधित अतिरोक्यांनीच मारले होते, याची आठवण झरदारींनी करून दिल्याचा उल्लेख आत्मचरित्रात आहे. मात्र, झरदारींच्या काळातही पाकपुरस्कृत दहशतवादी कृत्ये घडली तेव्हा, ते नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स होते, असे सांगून त्यांनी काखा वर केल्या होत्या, हेदेखील ओबामांनी सांगायला हवे होते.

ओबामा यांना भारताचे आकर्षण वाटले, ते महात्मा गांधी यांच्यामुळे. गांधी केवळ बोलत नव्हते, तर कृती करत होते. आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुरुंगात जात होते. जिवाचा धोका पत्करत होते. गांधीजींनी सलग तीस वर्षे ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन केवळ देशालाच स्वतंत्र केले नाही, तर त्यांच्यामुळे जगात एक नैतिकतेची ऊर्जा सर्वत्र पसरली. जगातील सर्व वंचित, उपेक्षितांना, ज्यात कृष्णवर्णीय अमेरिकनही आले, त्यांच्या लढ्यामुळे प्रेरणा मिळाली, अशी अत्यंत सुरेख मांडणी ओबामा यांनी केली आहे. आपल्या पहिल्या भेटीत ओबामा हे मुंबईतील मणिभवनला गेले होते, हे येथे स्मरते. 

ओबामा यांनी या पुस्तकात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या घरी जो भोजन समारंभ झाला, त्याविषयी लिहिले आहे. या समारंभास सोनिया गांधी व राहुल गांधी उपस्थित होते. पती गमावल्याच्या दुःखातून बाहेर येऊन, प्रभावशाली नेतृत्व करणार्‍या सोनियाजींबद्दलची आदरभावनाही ओबामा यांनी सार्थपणे प्रकट केली आहे. सोनियाजींनी कमी बोलून अधिक ऐकणेच पसंत केले. मात्र, जेव्हा धोरणात्मक विषयांवर बोलायला सुरुवात झाली, तेव्हा सावधपणे डॉ. सिंग यांना सोनियाजींनी वेगळे ठेवले, असा या पुस्तकात उल्लेख आहे. ते लिहितात, ‘या स्नेहभोजनप्रसंगी डॉ. सिंग यांच्या धोरणाबद्दल मतभिन्नता व्यक्त करतानाच त्या काळजीपूर्वक बोलत होत्या आणि अनेकदा संभाषणाचा रोख आपल्या मुलाकडे वळवत होत्या.’ ओबामा यांची निरीक्षणशक्ती जबरदस्त असून, सोनिया व डॉ. सिंग यांच्यात सामाजिक-आर्थिक प्रश्नांबाबत मतभिन्नता होती, हे त्यांच्या चाणाक्ष नजरेने जाणले. 

राहुल गांधी तेव्हा राजकारणात तुलनेने नवीन होते आणि ओबामा यांच्यासारख्या नेत्याशी राहुल यांची जवळीक वाढावी, असा सोनियांचा हेतू असल्याचे ओबामांना जाणवले. डॉ. मनमोहन सिंग हे अतिशय हुशार, असामान्य, प्रामाणिक असल्याचे कौतुकही ओबामांनी केले आहे. देशातील वाढत्या मुस्लिमविरोधी वातावरणाने भविष्यकाळात हिंदुराष्ट्रवादी भाजपचा प्रभाव वाढेल, अशी भीती सिंग यांना वाटत होती, असे ओबामा लिहितात. डॉ. सिंग यांचा हा अंदाज 2014 मध्येच खरा ठरला! अनिश्चिततेच्या काळात धार्मिक, वांशिक ध्रुवीकरणाचे आवाहन लोकाना आकर्षित करून घेऊ शकते आणि त्याचा राजकीय फायदा उठवला जाऊ शकतो, असे डॉ. सिंग यांना वाटत होते. चेक प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष हॅवेल यांनी आपल्याशी बोलताना युरोपातील वाढत्या सनातनी प्रवृत्तींविषयी चिंता प्रकट करत इशारा दिला होता, याचीही आठवण ओबामांनी नमूद केली आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या मागणीला डॉ. सिंग यांनी दाद दिली नाही, या गोष्टीची मोठी राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागली, अशी स्पष्टोक्तीही ओबामांनी केली आहे. मनमोहन सरकार हे दुबळे होते, अशी टीका करण्याची संधी त्यामुळेच भाजपला मिळाली, हे येथे मलाही स्पष्टपणे नमूद करावेसे वाटते.   

राहुल गांधी यांचा राजकारणाकडे ओढा नाही आणि त्यासाठीची त्यांच्यात पॅशनही नाही. ते नर्व्हस व्यक्तिमत्त्वाचे आहेत आणि त्यांची जडणघडण अद्याप पूर्णत्वास आलेली नाही. एखादा विद्यार्थी शिक्षकांवर प्रभाव टाकू इच्छितो, पण त्या विद्यार्थ्यात पारंगतता प्राप्त करण्याची आवड वा क्षमताही नसते, तशी राहुलजींची स्थिती आहे, असे अचूक निरीक्षण ओबामांनी नोंदवले आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राहुलजींच्या या ‘गुणांचे’ दर्शन घडलेच! गेली सहा वर्षे काँग्रेसला सातत्याने पराभव स्वीकारावा लागत आहे आणि त्याची कोणतीही चिकित्सा पक्षात होत नाही.

भट्टापरसोल, नियमगिरी येथे आंदोलने करणार्‍या राहुलजींनी त्यानंतर तेथील शेतकरी वा आदिवासींचे काय झाले, याची साधी विचारपूसही केली नाही. दलित, आदिवासी, मुस्लिम हे काँग्रेसला पाठिंबा देणारे प्रमुख समाजघटक. राहुल त्यांच्याबद्दल बोलतात, पण त्यांच्यासाठी सातत्याने व ठोस प्रयत्न करत नाहीत. अयोध्येचे राममंदिर, 370 वे कलम, तिहेरी तलाक, शबरीमलाचा वाद अशा अनेक महत्त्वाच्या विषयांबाबत काँग्रेसची भूमिका गोंधळलेली आहे. मला अध्यक्षपद नको, असे म्हणून राजीनामा देणार्‍या राहुलजींनी अद्यापही पक्ष आपल्याच मुठीत ठेवला आहे. त्यामुळे ओबामा जे म्हणाले, ते पटण्यासारखेच आहे. 

ओबामा यांचे हे पुस्तक पहिल्या दिवशीच जवळपास नऊ लाख प्रती इतके विकले गेले. त्यांच्या पत्नी मिशेल यांचे ‘बिकमिंग’ हे पुस्तक पहिल्या दिवशी सव्वासात लाख प्रती इतके विकले गेले होते. बिल क्लिटंन यांच्या पुस्तकाने पहिल्या दिवशी चार लाखांचा, तर जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या पुस्तकाने दोन लाखांचा आकडा पार केला होता. आजकालच्या वाचण्यापेक्षा पाहण्याच्या युगात एखादे पुस्तक इतके खपते आणि त्याची चर्चा होते व राजकारणावर त्याचा परिणामही होतो, हे उल्लेखनीय आहे. भारतातही असे कधी घडेल का?.