Sat, Apr 10, 2021 20:33
चीनला क्लीन चिट विश्वासार्हतेला तडा

Last Updated: Apr 04 2021 1:05AM

डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव 

जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाचा चीनला कोरोनाप्रकरणी क्लीन चिट देणारा अहवाल हा अनपेक्षित नसला, तरी जागतिक पातळीवरील या संघटनेच्या  विश्वासार्हतेला आणखी तडा देणारा आहे. कोरोनाप्रकरणी सत्य दडपण्याचा हा प्रयत्न आता जगभरातील तज्ज्ञांनी हाणून पाडला पाहिजे. या विषाणूचा उगम वुहानच्या प्रयोगशाळेत झाल्याचे अमेरिकन इंटेलिजन्सला वाटते, हे लक्षात घेऊन अमेरिकेनेच पुढाकार घेऊन चीनचे छुपे लष्करी इरादे जगापुढे आणले पाहिजेत. नाही तर संभाव्य जैविक अस्त्राचा चीनपासून असलेला धोका जगाला संहाराच्या दिशेने नेणारा ठरू शकेल.

कोरोना विषाणूच्या जगभरातील हाहाकाराला सर्वस्वी जबाबदार असलेल्या चीनला जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय पथकाने त्याच्या उगमाबाबतच्या वादग्रस्त मुद्द्यावर ‘क्लीन चिट’ देणे हे वरवर धक्कादायक वाटत असले, तरी अपेक्षितच होते. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को’, अशा कुटील पद्धतीने वागणार्‍या या हुकूमशाही देशाने जागतिक आरोग्य संघटना केव्हाच आपल्या दावणीला बांधलेली आहे, हे यापूर्वीही अनेकदा जगाच्या लक्षात आले होते. अगदी सुरुवातीला या संघटनेचे सरसंचालक टेड्रोस अढॅनॉम घेब्रेयेसूस यांनी चीनने या विषाणूचे संकट किती जबाबदारीने यशस्वीरीत्या हाताळले, असे सांगत या देशाचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांचे अभिनंदन केले. त्यानंतर चीनच्या तालावर नाचत त्यांना अनुकूल घोषणा ते करीत गेले. अर्थात, ती निव्वळ दिशाभूल होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता कोरोना विषाणूच्या उगमाबाबतचा या पथकाचा बहुप्रतीक्षित अहवाल हा चीनच्या चुकांवर पांघरूण घालणारा असणार, असे अंदाज आधीच बांधले गेले  होते.

अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाचा उल्लेख ‘चायनीज व्हायरस’ असा करीत असल्याने चीन त्यावर प्रक्षुब्ध होत असे. चीनच्या वुहानमधील इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेतून तो ‘लीक’ झाला असावा, असे त्यांनी ठामपणे सांगितले; पण ही थिअरी या अहवालाने जवळजवळ फेटाळून लावली आहे. या पथकाच्या निष्कर्षानुसार या विषाणूचे संक्रमण वटवाघळांपासून अन्य प्राण्यांच्या माध्यमातून मानवापर्यंत झाले असण्याची शक्यता असून प्रयोगशाळेत विषाणूचे उगमस्थान असण्याची शक्यता अगदी कमी आहे, तरीही सर्व शक्यता खुल्या असल्याची पुस्ती या अहवालाला जोडली आहे. या अहवालाच्या आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासार्हतेला या निष्कर्षांमुळे आणखी मोठा तडा गेला असून काही प्रश्नचिन्हे यातून निर्माण होतात. या अहवालाबाबत शंका घेतल्याने चीन पुन्हा संतप्त झाला असून इतर देशांचीही याबाबत पाहणी व्हावयास हवी, असा आग्रह त्यांनी धरलेला दिसतो. कदाचित अमेरिकेच्या प्रयोगशाळेेत त्याचा उगम झालेला असू शकेल किंवा ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या फ्रोझन फूडमधून तो आला असेल, अशा शक्यता व्यक्त करून आपली जबाबदारी या देशाचे राज्यकर्ते झटकत आहेत.  

विविध देशांतील शास्त्रज्ञ आणि चीनमधील 17 शास्त्रज्ञ यांच्या पथकाने 14 जानेवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान चीनमध्ये जाऊन जी पाहणी केली ती तिथल्या कम्युनिस्ट राजवटीच्या दबावाच्या वातावरणात केली, असे म्हणायला आता वाव आहे. मुळात या विषाणूचा उगम झाल्यानंतर तब्बल 15 महिन्यांनी हा तपास करण्यात आला. इतका कालावधी लोटल्यानंतर कोणते पुरावे त्यांच्या हाती लागले असतील, हा प्रश्नच आहे. त्यामुळे हा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष परिणामकारक असू शकत नाहीत. चीनने हे पुरावे आधीच नष्ट केले असण्याची शक्यता अधिक  आहे. मुळात या पथकाचा दौरा 15 दिवसांनी लांबणीवर टाकण्यात आला. त्यानंतर त्यांना वुहानमध्ये दोन आठवडे क्वारंटाईन करण्यात आले. हा अहवाल सादर करण्यास झालेला उशीर, नमुने आणि माहितीत पारदर्शकता नसणे, मुक्तपणे चौकशी करण्यातील अडसर, सर्व आवश्यक माहितीचा अ‍ॅक्सेस पुरवण्यातील अडथळे इत्यादीमुळे हा सर्व खटाटोप केवळ रंगसफेदी करण्यासाठी तर नाही ना, अशी शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. 

चीन आपल्या विस्तारवादी धोरणामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांवरील प्रभाव वाढवत चालला आहे. संयुक्त राष्ट्राशी संबंधित जागतिक आरोग्य संघटनाही त्याला अपवाद नाही. या संघटनेतील पदाधिकारी किंवा त्यात काम करणारे काही तज्ज्ञ, शास्त्रज्ञ चीनच्या राज्यकर्त्यांना दुखवू इच्छित नाहीत. कारण, आपले कॉन्ट्रॅक्ट्स, गलेलठ्ठ पगार त्यांना गमवायचे नाहीत. आपल्या उद्दिष्टाच्या विरोधात काम करणार्‍यांना वेचून बाहेर काढण्याचे तंत्र या एकाधिकारशाही राजवटीने आत्मसात केले आहे. त्यामुळे अशा वातावरणात स्वतंत्र वस्तुनिष्ठ अहवाल तयार होणे अशक्यच होते. हा अहवाल जाहीर करण्यासाठीची पत्रकार परिषदही विलंबाने सुरू झाली. त्याचे कारण चिनी  शास्त्रज्ञ आणि पथकातील इतर देशांचे तज्ज्ञ यांच्या प्रतिपादनात एकवाक्यता असावी, असा प्रयत्न होता. एकूण कोरोनाबाबत बर्‍याच सत्य घटना दडपून  ठेवण्याच्या प्रयत्नाचा हा पुढचा अंक होता. चिनी सरकारने त्यावरून शेवटचा हात फिरविला, असा संशय त्यामुळे बळावला आहे . 

कोरोनाप्रकरणी सार्‍या जगाला अंधारात ठेवण्याचा अक्षम्य अपराध चीनने केला आहे. या विषाणूच्या धोक्याची व्हिसलब्लोअरच्या भूमिकेतून पहिल्यांदा (डिसेंबर 2019) जाणीव करून देणारे चीनमधील डॉक्टर ली वेनलिआंग (वय 34) यांच्याबद्दल खरे तर या देशाने कृतज्ञ राहायला हवे होते; पण उलट्या काळजाच्या या राजवटीने त्यांच्यावर कोरोनाविषयी ‘अफवा पसरवल्या’ असा ठपका ठेवून  त्यांना धमकावले. ‘माझ्या या कृतीने देशाच्या ‘सामाजिक व्यवस्थेची’ घडी बिघडली आणि असे पुन्हा करणार नाही’, असे पत्र त्यांच्याकडून त्यांनी सक्तीने लिहून घेतले. अशाही काळात कोरोनाबाधित रुग्णांवर आपला जीव धोक्यात घालून उपचार करण्याचे काम त्यांनी चालू ठेवले. त्यातच त्यांना त्याची लागण होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चीनमधील सर्वसामान्य जनतेने त्याबद्दल हळहळ व्यक्त केली. हा डॉक्टर त्यांच्या नजरेत हिरो होता; पण चिनी राज्यकर्त्यांनी त्याला व्हिलन ठरविण्याचा प्रयत्न केला. या विषाणूवर संशोधनाचे काम करणार्‍या एका महिला शास्त्रज्ञालाही या राजवटीच्या ससेमिर्‍याला तोंड द्यावे लागले. हाँगकाँगच्या हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये ली मेंग यान या व्हॉयरॉलॉजी आणि इम्युनिऑलॉजी क्षेत्रात संशोधन करीत होत्या. त्यांच्या कामाची कौतुकाने दखल घेणे तर दूरच; पण त्यांनाच गप्प करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यामुळे त्यांना जीव वाचविण्यासाठी आणि चिनी सरकारची लपवाछपवी जगापुढे आणण्यासाठी पळून   अमेरिकेत आश्रयासाठी जावे लागले.

फॉक्स चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या तरुण शास्त्रज्ञ महिलेने चीनच्या लपवाछपवीच्या प्रकरणांचा पर्दाफाश केला. रेटून खोटी आकडेवारी देण्यात चीनचा हात कोणी धरू शकणार नाही. लागण झालेल्यांचे आणि मृतांचे आकडेही चीनकडून लपविण्यात आले. या साथीत आपल्याच देशातील शेकडो लोकांना या राजवटीने क्रूरपणे मारून टाकले. चीनमध्ये, चीनमुळेच आलेल्या या संकटाचे गांभीर्य पाहून सुमारे 3500 लोक याच कालावधीत विमानाने जगाच्या वेगवेगळ्या भागांत गेले. त्यांना त्यांच्या सरकारने रोखले नाही. इटलीत चिनी मजूर  मोठ्या संख्येने काम करतात. इटलीत ते आल्याने या देशात मोठ्या प्रमाणावर लागण झाली. या सर्वांनी जगात या विषाणूचा प्रसार केला. वुहान येथून मागच्या वर्षी जानेवारीतून वेगवेगळ्या मार्गाने किमान 5 लाख लोक भीतीने परदेशात गेले; पण त्यातील बहुसंख्य कोरोनाचे वाहक असल्याने त्याचा फटका जगाला बसला. जागतिक आरोग्य संघटनेने सुरुवातीला आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी नको, अशी भूमिका घेतली होती.

त्याची जबर किमत जगाला चुकवावी लागली. 17 नोव्हेंबर 2019 ला या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे  चीनला प्रथम समजले, असे अनेक व्हिसलब्लोअर म्हणतात; पण याची कुणकुण जगातील कोणत्याही देशाला लागू नये, याची खबरदारी त्यांनी घेतली. कोरोनाविषयीच्या निगेटिव्ह बातम्या रोखण्यासाठी या राजवटीने माध्यमांवर कडक सेन्सॉरशिप लादून त्यांची गळचेपी केली. या अहवालातील निष्कर्षाने तर चीनविषयीची चीड आणखी वाढल्यास आश्चर्य नाही. अमेरिकेचे बायडेन प्रशासन याबाबत चीनविरोधात आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या विरोधात अधिक कठोर भूमिका घेईल, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी या अहवालाच्या मेथडॉलॉजी विषयी आधीच शंका व्यक्त केलेली आहे. हा 123 पानी अहवाल लिहिण्यासाठी चीन सरकारने मदत केल्याचेही दिसते, असे ते म्हणतात, हे अधिक बोलके! वुहान प्रयोगशाळेतून हा विषाणू अपघाताने बाहेर पडल्याच्या थिअरीसंबंधात अगदी थोड्या ओळी यात दिसतात . 

अमेरिकेच्या डिक्लासीफाईड इंटेेलिजन्समधून जे चित्र पुढे येते, ते चीनच्या छुप्या हालचालींवर प्रकाश टाकणारे आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजीमध्ये वटवाघळाच्या कोरोना विषाणूवर चीनच्या लष्कराच्या  एका गुप्त संशोधन प्रकल्पावर काम चालू होते. त्यात 2019 च्या ऑटम सीझनमध्ये त्या प्रयोगशाळेतील कर्मचारी कोव्हिडसारखी लक्षणे येऊन आजारी पडले. चीन सरकारने ही माहिती दडवून ठेवली; पण जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार या संस्थेची प्रयोगशाळा ‘वेल मॅनेज्ड’ होती. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ अमेरिकन इंटेलिजन्सचा दावा चुकीचा आहे. परंतु, ही प्रयोगशाळा धोकादायक संशोधन करीत असल्याचा दावा या क्षेत्रातील जाणकार तज्ज्ञांनी केला आहे. वटवाघळाच्या कोरोना विषाणूचा माणसाच्या फुफ्फुसाच्या पेशींवर काय परिणाम होईल, हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य भाग होता. 

एकंदरीत चीन आणि जागतिक आरोग्य संघटना लॅब अ‍ॅक्सिडंट थिअरीचा गांभीर्याने पाठपुरावा करण्याची शक्यता नसल्यानेे बायडेन प्रशासनाने यात पुढाकार घेण्याची गरज आहे. लॅबबाबत त्यांच्याकडे जी महिती आहे, ती त्यांनी जाहीर केली पाहिजे.  त्यामुळे या विषाणूच्या उगमाचे गूढ उकलू शकेल आणि भावी काळात अशी महामारी रोखण्यासाठी त्याची मदत होईल. 

चीनमधील काही मोठ्या संशोधन आणि उत्पादन संस्था या चिनी लष्कराच्या एक्स्टेन्शन आहेत, हे आता गुपित राहिलेले नाही. लष्करी कारणासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर करण्यासंबंधातील त्यांचा प्रयत्नही उघड झाला आहे. जगातील बायोलॉजिकल रिसर्च जिनॉमिक्स आणि टेक्नो इंडस्ट्री या क्षेत्रातील  आघाडीचा बीजीआय हा उद्योग समूह चीनच्या लष्कराबरोबर (पीपल्स लिबरेशन आर्मीबरोबर) काही विषयांवर संशोधन करीत आहे. रेस्पिरेटरी पाथेजिन्ससाठी मास टेस्टिंगपासून ते ब्रेन सायन्सपर्यंत हे संशोधन चालू आहे. या संस्थांकडे महत्त्वाचा स्ट्रॅटेजिक डाटा आणि माहितीचा मोठा साठा असून तो चुकीच्या हातात पडल्यास धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. ‘चायना मिलिट्री ऑनलाईन’ या चीन सरकारच्या अधिकृत न्यूज पोर्टलवरचे लिखाण बायोटेक्नॉलॉजी आधुनिक युद्धतंत्राचा भाग म्हणून वापरण्याचे त्यांचे इरादे स्पष्ट करतात.

चीनचे लष्कर आणि चायनीज कम्युनिस्ट पक्ष यांचे घट्ट नाते असून या दोन्हींचे नेतृत्व शी जिनपिंग यांच्याकडे आहे. संशोधन संस्थांना बरोबर घेऊन चीनची आर्थिक आणि लष्करी ताकद वाढवून ती अमेरिकेच्या पातळीपलीकडे नेणे हे या विस्तारवादी हुकूमशहाचे स्वप्न आहे. कोरोनामुळे मात्र चीनविरोधात सार्वत्रिक संतापाचे वातावरण तापत चालले आहे. अशा स्थितीत चीनचे मांडलिक असल्यासारखे वागत जागतिक आरोग्य संघटना या एकाधिकारशाहीला वाचवू पाहत आहे, हे दुर्दैवी आहे. म्हणूनच  जगातील 14 हून अधिक देशांनी या अहवालाच्या विश्वासार्हतेबद्दल एका संयुक्तनिवेदनाद्वारे शंका व्यक्त केली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही एकत्र येऊन या अहवालातील असत्य उजेडात आणले पाहिजे. कोणीच विरोध न करणे चीनच्या पथ्यावर पडणारे आहे.

चीनमधील विद्वानांच्या वर्तुळातही कोरोनाप्रकरणी जगाने  चीनला जबाबदार धरले पाहिजे, या देशाने केलेल्या घोर अपराधाबाबत त्याने सर्वांची जाहीर माफी मागितली पाहिजे, इतकेच नव्हे तर काही भरपाई देण्याचा विचार केला पाहिजे, असा विचारप्रवाह आहे. अर्थात, एवढे प्रत्यक्षात समजा झाले, तर ते  पुरेसे ठरणार नाही. दुसर्‍या महायुद्धात हिटलरचा पाडाव करण्यासाठी संघटित, सर्व ताक दीनिशी प्रयत्न झाले. त्यामुळे त्याचा पराभव होऊ शकला. आताही त्याचीच गरज आहे. कारण, शी जिनपिंग हिटलरपेक्षा कू्रर, धूर्त आणि महत्त्वाकांक्षी राज्यकर्ते आहेत. भारतानेही या अहवालप्रकरणी आपले मौन सोडून सक्रिय झाले पाहिजे. आता तर वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीचे (डब्ल्यूएचए) नेतृत्व भारताकडे आले आहे. या  ‘डब्ल्यूएचए’खाली जागतिक आरोग्य संघटना येते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या या एक्झिक्युटिव्ह बोर्डचे चेअरमनपद भारताला 1 वर्षासाठी कोव्हिड काळासारख्या आव्हानात्मक स्थितीत मिळणे ही या संघटनेचे नेतृत्व करण्यासाठीची मोठी संधी आहे. कारण, ही निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे फंडिंग ट्रम्प यांनी बंद केल्याने ही संघटना अर्थिकद़ृष्ट्या अडचणीत आलेली तर आहेच शिवाय तिची विश्वासार्हता अगदी लयाला गेली आहे.

अशावेळी आपले स्वातंत्र्य आणि हितसंबंधांना बाधा न आणता तिला बळ आणि विश्वासार्हता प्राप्त करून देण्यासाठी भारताने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. आपण या विषयावर गप्प राहण्याने आपण कच खात असल्याचे वातावरण तयार होण्याचा धोका आहे. ज्या चौदा देशांनी या अहवालाच्या सत्यशोधनाबाबत शंका उपस्थित केल्या, त्यात आपल्या देशाचा सहभाग का नाही? अमेरिका, जपान, ऑस्ट्रोलिया, कॅनडा, इंग्लंडसारख्या बड्या देशांपासून लॅटिव्हिया, लिथुनियासारख्या छोट्या देशांनी या संयुक्त निवेदनातून आपले चीनविरोधी परखड मत व्यक्तकेले. जॉन्स हॉपकिन्सच्या अंदाजानुसार जगात 12.7 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाने ग्रासले असून 27 लाख 90 हजारांहून अधिक निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात मार्चमध्ये दुसर्‍या लाटेत 55 हजार मुलेही कोरोनाग्रस्त झालेली आहेत. या सर्वाला चीनची कूट राजनीती आणि लपवाछपवी जबाबदार आहे. 

मुळात चीनने कोरोना संसर्गाने जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ज्या पद्धतीने भारतासह अनेक देशांशी विनाकारण संघर्ष सुरू केले, त्याविषयी जगभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. एकीकडे सार्‍या जगाला आर्थिक मंदीच्या खाईत त्यांनी लोटले असताना चीनमध्ये त्याची लाट लवकर कशी ओसरली, हा विषाणू वुहानबाहेर फारसा कसा पसरला नाही, त्यांची अर्थव्यवस्था इतक्या लवकर कशी सावरली इत्यादी असंख्य प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.  अमेरिकेलाच नव्हे तर जगभरातील लोकशाही आणि स्वातंत्र्याची मूल्ये मानणार्‍या देशांना दुसर्‍या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा धोका चीनपासून आहे. आपली  आर्थिक, लष्करी आणि तंत्रज्ञानाची ताकत वापरून त्यांना अमेरिका आ