Tue, Jun 15, 2021 12:09होमपेज › Bahar › संक्रांतीचा स्नेहभाव

संक्रांतीचा स्नेहभाव

Last Updated: Jan 12 2020 1:20AM
मानसी चिटणीस

थंडी ऐन बहरात येऊन गुलाबी होते... धुक्याच्या लाटा सकाळीच्या कुशीतून उमलायला लागतात... सांज अधिक गहिरी कातर होऊ लागते... पानगळीचे गालिचे रस्त्यांवर पहुडायला लागतात अन् हिवाळा भरात येतो. शेकोटी, हुरडा, वांग्याचा लुसलुशीत कोवळेपणा, सोलाण्याचा जिभेवर रेंगाळणारा करकरीतपणा, माघाची थंडी आणि जोडीला संक्रांतीचे तिळवण... जणू काही एका सर्जनोत्सवाचीच मैफलीत रंगलेली अदाकारी...
मला अजूनही आठवतेय, भोगीपासूनच संक्रांतीला सुरुवात व्हायची. 

पारोशानेच सवाष्णीला तीळ, वांगी, शिकेकाई, गूळ, कापूस, ओंब्या, लोणी-साखर इ. वाण दिल्यानंतरच घरातल्या इतर गोष्टींना सुरुवात व्हायची. सगळ्या भाज्या (गाजर, बोर, शेंगदाणे, वांगी) एकत्र करून त्याची खास भोगीची भाजी बनवली जायची. सोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि खिचडी असायची. अंघोळीच्या पाण्यातही तीळ घातलेले असायचे. दुसरा मुख्य दिवस संक्रांतीचा. या दिवशी आई, काकू सुगडांची पूजा करायच्या. घरात तिळाची वडी, लाडू, शेंगपोळी आणि गुळाची पोळी बनवली जायची. काळ्या रंगाचे कपडे घातले की, हमखास रागवणारी आजी मुद्दाम नवा काळा फ्रॉक घालायला सांगायची. नवीन लग्न झालेल्या कुणा ताईचा हलव्याच्या दागिन्यांनी सजवून फोटो काढला जायचा... संक्रांत सण साजरा व्हायचा. आम्हा मुलींची तर खूप धमाल चालायची. मैत्रिणींना भेट देण्यासाठी कानातले, रुमाल, पिना अशा भेटवस्तू खरेदी करून त्या भेट दिल्या जायच्या. दादा लोक मात्र पतंग उडवण्यात मग्न असायचे. संध्याकाळी आईसोबत अनेक ठिकाणी हळदी-कुंकवासाठी जावं लागायचे. तिथेही अनेक वस्तू वाण म्हणून मिळायच्या. तिसरा दिवस मात्र शिळी संक्रांत किंवा किंक्रांत म्हणून साजरा व्हायचा. अनेकांकडे त्या दिवशी आवर्जून सामिष बनवलं जायचं. आजही संक्रांतीच्या या सार्‍या आठवणी ऊब देऊन जातात...
सर्जनानंतर पानगळ आणि पानगळीनंतर सृष्टीच्या विलयातून पुन्हा सर्जन हा निसर्गाचा नियमच आहे. दुःखाच्या कडू घोटानंतर सुखाचा गोडवा काही वेगळाच असतो ना..! 
संक्रांत हीच शिकवण देत वारंवार गोडवा देत राहते... तिळगूळ घ्या आणि गोड, चांगले बोला. चांगला विचार आणि चांगली कृती करा हे सांगत राहते.
भारतीय उपखंडात अनेक भागांत तिथल्या तिथल्या पर्यावरणाला अनुसरून त्या त्या भागात विशिष्ट सण साजरे केले जातात.

मकर संक्रांत हा सण पर्यावरणावर अवलंबून नाही, तर पर्यावरण ज्याच्यावर अवलंबून आहे अशा सूर्याशी जोडलेला आहे. सूर्य मकर वृत्तावर दिसू लागला की, येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत. सूर्य उत्तरेकडे सरकणार म्हणजे ऊन वाढणार, ऊर्जा वाढणार, वनस्पतींना अन्न बनवायला अधिक वाव मिळणार, प्राण्यांना ते खायला मिळणार. जीवाला बरे वाटणार.
आनंदाचे दिवस असले की, उत्साह वाढतो- उत्सव, सण करावासा वाटतो.

पूर्वी कदाचित हाच दिवस मकर संक्रांत म्हणून मानत असावेत. कालांतराने पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दक्षिणायनाचा दिवस आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस यात अंतर पडले. सध्या मकर संक्रांत 14 जानेवारीला येत आहे. काही वर्षांनंतर ती 15 जानेवारीला येईल.

भारतात- खरे तर भारतीय उपखंडातच मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकाच दिवशी साजरा होत असूनही त्या सणाची नावे मात्र खूपच वेगळी आहेत. महाराष्ट्रात मकर संक्रांत किंवा संक्रांत म्हणतात. ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत तीळ आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या वड्या किंवा लाडू यांची देवाण-घेवाण करतात.

महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटकातसुद्धा जवळजवळ महाराष्ट्रासारखाच हा सण साजरा होतो. उसाची सुगी झालेली असते. ‘एल्लू’ म्हणजे सफेद तीळ, भाजलेले शेंगदाणे, खोबर्‍याचे काप आणि बेळ म्हणजे गुळाचे खडे; यांचे वाण सुपातून नेतात. त्यात कधी सक्कर अच्चू म्हणजे बत्तासे, उसाचे करवे असेही पदार्थ ठेवतात. ते एकमेकांना देता-घेताना ‘एल्लू बेळ तिंडू झोल्ले मातंडी’ म्हणजे ‘तिळगूळ खा, चांगलेच बोला’ असं म्हणतात. तर महाराष्ट्राच्या वायव्येला असलेल्या गुजरात आणि राजस्थानमध्ये हाच सण ‘उतराण’ किंवा ‘उत्तरायण’ म्हणून साजरा होतो. तिळगुळाची चिक्की करतात. या मोसमात आलेल्या जवळजवळ सर्व प्रकारच्या फळभाज्या, शेंगभाज्या, कंदमुळे घालून मिश्र भाजी किंवा उंधीयू करतात. पतंग उडविण्याचा मोठा जल्लोष असतो. जणू काही पतंगाच्या मार्गानं शर्यतच लागलेली असते- सूर्यापर्यंत पोहोचायची...
गोवा, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, मणिपूर या सगळ्या प्रांतांमध्ये ‘मकर संक्रांत’ साजरी केली जाते.

आंध्र प्रदेशात हा सण चार दिवस असतो - 1) भोगी, 2) पेट्टा पांडुगा, 3) कणुमा आणि 4) मुक्कनुमा.

हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये ‘माघी’ म्हणतात.
काश्मीरमध्ये ‘शिशुर सैंक्रांत’ म्हणतात.
आसाममध्ये ‘माघी बिहू’ किंवा ‘भोगाली बिहू’ असं म्हणतात.
उत्तर प्रदेशमध्ये ‘खिचडी’ म्हणतात.
दक्षिणेकडील प्रांतांमधूनही हा सण साजरा होतो. 
तामिळनाडूत त्याला ‘पोंगल’ म्हणतात.
केरळ प्रांतात ‘मकर विलू’ म्हणतात.

भारताबाहेर भारताजवळच्या देशांमध्येही हा सण साजरा होतो. नेपाळमध्ये ‘तरुलोक-माघी’, थायलंडमध्ये ‘सोंगक्रान’, लाओसमध्ये ‘पि-मा-लाओ’, म्यानमारमध्ये ‘थिंग्यान’, तर कम्बोडियामध्ये ‘मोहा संक्रांत’ म्हणून हा सण साजरा होतो. या सणाशी अनेक पौराणिक कथाही जोडलेल्या आहेत.

मकर राशीचा स्वामी शनी म्हटला जातो- (शनी या शब्दाचा अर्थ हळूहळू सरकणारा.) तो सूर्यापासून निर्माण झाला आणि खूप लांब गेला. वर्षातून एकदा एक महिनाभर सूर्य शनीला भेटतो, तो हा सण. दुसर्‍या एका कथेत असे सांगितले आहे की, संक्रांतीपासून देवतांचा दिवस सुरू होतो. (देव लोक वर- उत्तरेकडे राहतात असे मानतात. उत्तरीय ध्रुव प्रदेशात या क्षणानंतर सूर्य दिसायला सुरुवात होते.) आणखी मजेदार दंत कथा अशीही आहे की, याच दिवशी भगीरथाने गंगा स्वर्गातून खाली आणली. काहीही असले तरी तीळ आणि गूळ यांचा स्निग्धभाव संक्रांतीच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीत टिकून राहिला आहे.
आजही हा स्नेहभाव आपल्या सणांच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे सोपवला जातोय.
तुम्हा सर्वांना हा तिळाचा तैलभाव आणि गुळाचा गोडवा आयुष्यभर मिळो, याच संक्रांतीच्या शुभेच्छा..!