Sat, May 30, 2020 23:50होमपेज › Bahar › चम्मत ग... ओ हंसिनी...

चम्मत ग... ओ हंसिनी...

Last Updated: May 17 2020 1:06AM
प्रा. दिनेश डांगे

अरे कोण म्हणतोय कोरोना आहे? अरे हा तर आपल्या मनाचा खेळ आहे! आपल्या मानगुटीवर बसले आहे कोरोनाचे भूत! उतरवा त्याला हळूच! आणि चला सुरू करूया मनाचा दुसरा खेळ! आनंदाचा खेळ! महापुराचेही पाणी किती दिवस असते पसरलेले? हळूहळू ओसरतेच ना? तसा हा कोरोना हळूहळू ओसरू लागलाय. सांगा तुमच्या मनाला. काढा लॉकडाऊनमधून बाहेर त्याला. अगदी हळूहळू हं! बिच्चारं किती घाबरलंय ते! त्याचा विश्‍वासही बसणार नाही त्याच्या डोळ्यांवर. सांगा त्याला, रे मना तू आता मोकळा झाला आहेस. पराकोटीच्या भीतीमधून. हं ऊठ. मस्तपैकी दाढी कर चंदन आणि हळदीयुक्‍त साबणाने खसखशीत अंघोळ कर. मादक सुवासाचा उत्साहवर्धक स्प्रे मार अंगावर. छानपैकी डिझाईनची वस्त्रे परिधान कर. चल घरातून. पड बाहेर. टू व्हीलर स्टार्ट कर. इकडे तिकडे बघतोयस काय असा गांगरल्यासारखा! पोलिसांना घाबरतोयस? अरे बघ बघ ते कसे तुझ्याकडे प्रेमाने बघताहेत ते! त्यांच्या हातांत लाठी नाहीय. गुलाबाचं फूल घेऊन येताहेत तुझ्याकडे. पुढे चल. रस्त्यावरची दुकाने दुतर्फा किती बहरलीत बघ. जो तो बायको-मुलांसह मनाला येईल ते खरेदी करत आहे. सगळी दुकाने सजली आहेत नव्या नवरीसारखी. रिक्षा बघ कशी तोर्‍यात चाललीय! बाजूच्या हॉटेलातला कांदाभजीचा वास वेड लावतोय ना! गाडी सांभाळून चालव गाय आली बघ समोरून. एसटीची लालपरीपण भन्‍नाट गेली बघ. ते फेरीवाले बघ. किती आंनदी आणि समाधानी चेहरे त्यांचे. हापूस आंबे विकताहेत. गोड रस जमा झाला ना जीभेवर? विसरलास ना आता ते कोरोनाचे काळेकुट्ट दिवस? ती काळ्यापाण्याची शिक्षा? आता बघ हा रंकाळा. पाणी कसे निवळशंख आहे बघ. हवा कशी सुखद आहे. बघता बघता संध्याकाळ झाली. जनप्रवाह कसा अविरत वाहतोय बघ. जणू सुंदर पक्ष्यांचा थवा. नजर खिळवून ठेवणारे सौंदर्य. रंगीबेरंगी पोशाखांतील पर्‍याच जणू. तिकडे सूर्याचे लाल बिंब डुंबू लागले आहे. पदपथ सगळा दिव्यांनी उजळला आहे. रंकाळा सगळा स्वर्गासारखा भासू लागलाय. रे मना तू कुठे भिरभिरत आहेस? कुठे खवय्यांच्या सेवेसाठी आणि त्यांना आकृष्ट करण्यासाठी खमंग पदार्थांचा गंध दरवळत आहे. 

मध्यंतरीच्या काळात वायूचे आणि पाण्याचेही प्रदूषण संपल्याचे जाणवले. सकाळी प्रभातफेरीला जावे, तर शुद्ध वातावरणात अनेक आपल्या गावचे आणि परगावचे पक्षी वावरताना, बागडताना दिसताहेत. त्यात साळुंक्या आहेत, मैना आहेत, मयुरी आहेत, कुठ कुठे तर शुभ्र हंसिनीही आहेत. मग कधी कधी ओळख पटते न पटते, ओळख लागते न लागते, डोळ्यांत ओळखीचे अस्फुट हसू दिसते, आपण नजर भिडवताच त्या लाजर्‍या पक्ष्यांची लाज आडवी येते...आणि का कुणास ठाऊक, पण डोळ्यांतल्या ओळखीची जागा लटिक्या रागाने घेतलेली दिसते. कुठे कुठे तर गजर्‍यातला मोगरा आसमंत धुंद करत  आहे. आणि हे मना तू एकाएकी रस्त्यातच पुतळा बनून काय उभा आहेस? सौंदर्याच्या पुतळ्यासमोर तू असा स्तब्ध का उभा आहेस? अरे ही तर आपली हंसिनी! मग ओळख का दाखवीत नाहीय? कोरोनामुळे माझा स्मृतिभंश झाला की तिचा? सकाळपासून आंनदाला किती भरते आले होते! एका पाठोपाठ एक किती शुभसंकेत मिळत होते! मन पिसाट माझे झाले होते. मोरपिसालाही मागे टाकत होते. आणि अगदी क्‍लायमॅक्सला मन असे उदास का व्हावे? हंसिनी तू मला ओळखले नाहीस का? त्यावर ती म्हणाली, मी तुझी हंसिनी नाही. तुझे मन एकदम मोकळे झाले आहे ना, म्हणून तुला भास होत आहेत. तुझी हंसिनी कोरोनाने नेली आहे. दूर दूर खूप दूर! मन पुन्हा विषण्ण झाले. त्याला पुन्हा कोरोनाचा झटका येऊ नये म्हणून त्याला पाणीपुरी दिली आणि बजावले, ‘हँस तू हरदम खुशी या हो गम!’