टिवल्या-बावल्या : मुख्यमंत्रिपदाचा तिढा

Last Updated: Nov 02 2019 8:43PM
Responsive image

प्रा. सुहास द. बारटक्के


‘काय सर, मुख्यमंत्री होणार का?’ शेजारचे मंगुअण्णा घरात डोकावत विचारते झाले.

‘या या अण्णा... काय म्हणताय? अहो, सीटस् तुमच्या जास्त निवडून आल्यात आणि मी कसा काय मुख्यमंत्री? मी आपला गृहमंत्री म्हणून घरचं सगळं सांभाळतोय ते बरंय... उगाच नसतं टेन्शन नको. अहो, मुख्यमंत्री होणं साधं काम आहे का? पाच वर्षं राब राब राबा... दिल्लीश्वरांना अहवाल द्या, शंभराहून अधिक सीटस् निवडून आणा, तरी सगळ्यांच्या शिव्या खा. कुणी सांगितलाय हा नसता उद्योग.’
‘जणू काही तुम्हाला खरोखरच विचारलंय असं बोलताय सर.’ 

‘मी खरंच म्हणतोय, काय झालं एखाद्या वेळेस सर्वसामान्य जनतेतून मुख्यमंत्री निवडायला? हल्ली नगराध्यक्ष नाही का थेट जनतेतून निवडत? मग थेट जनतेतून ऑनलाईन चॉईस विचारून मुख्यमंत्री निवडायला काय हरकत आहे?’

‘अहो; पण ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच होतो ना मुख्यमंत्री...’

‘असू देत ना... तुम्ही युती झालेल्या दोन्ही पक्षांतील एक पाच नावं जाहीर करा, मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून आणि घ्या मत जनतेचं.’ 

‘हे मात्र तुमचं भलतंच कायदेकानूनमध्ये न बसणारं आहे. तुम्ही फक्त एवढंच सांगा की, सध्याच्या परिस्थितीत काय करावं? म्हणजे आमचे आमदार शंभरहून अधिक, तुमचे केवळ पन्नास-पंचावन्न; आमचे तुमच्याहून डबल, तरी मुख्यमंत्री तुमचा हे कसं शक्य आहे?’

‘मग फिफ्टी-फिफ्टी ठरलंय ना?’

‘म्हणजे मुख्यमंत्रिपदसुद्धा वाटून घ्यायचं? तीन दिवस आमचा, तीन दिवस तुमचा? म्हणजे आम्ही सोमवारी घेतलेला निर्णय तुम्ही गुरुवारी रद्द करणार... आम्ही नाणार आणणार, तुम्ही नाणार घालवणार...’

‘अण्णा, खरं सांगू का मुख्यमंत्री आमचाच व्हायला हवा. आम्ही जर तुम्हाला सपोर्ट दिला नाही, तर तुम्ही कसे होणार पुन्हा मुख्यमंत्री? मी पुन्हा येईन... पुन्हा येईन... बसा बोंबलत.’

‘मग, आलोच आम्ही पुन्हा? तुम्ही पन्नाशीत अडकलात ते बघा. नैसर्गिक न्यायाप्रमाणं आता आमचाच मुख्यमंत्री व्हायला नकोय? आम्ही सच्चे सेवक जनतेचे. आमची व्हॅल्यू जास्त.’

‘आणि आमची व्हॅल्यू काय कमी आहे?’

‘रागावू नका सर... पण तुमचं न्यूझन्स व्हॅल्यू... म्हणजे उपद्रवमूल्य जास्त हे खरंय; पण जनमानसात आमची व्हॅल्यू खरी म्हणूनच बहुसंख्येनं आलो ना निवडून? मग मनाचा मोठेपणा दाखवा आणि द्या सपोर्ट खुल्या दिलानं या मोठ्या भावाला.’

‘मग, या लहान भावाचा हट्ट कसा पुरा होणार? तुम्हीच मनाचा मोठेपणा दाखवा आणि बसवा आमच्या राजकुमारांना गादीवर.’

‘ते कदापि शक्य नाही... केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र हे आधीपासूनच ठरलंय आमचं आणि जास्त दादागिरी कराल तर...’

‘तर काय कराल? एकट्यानंच स्थापन कराल सरकार? आहे ताकद?’

‘तर तुमचे पंचेचाळीस आमदार आमच्या संपर्कात आहेत लक्षात ठेवा.’

‘नुसत्या वावड्या उठवू नका. नावं सांगा त्या आमदारांची. तुमच्याकडे पैसा जास्त असेल, त्या जोरावर आपण काहीही विकत घेऊ शकतो, अशी तुमची मिजास असेल तर विसरून जा. आमचं शिवबंधन तोडणं एवढं सोप्प नाहीय... हाताची नस कापण्यासारखं आहे ते आणि तुमचेही काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं म्हटलं तर?’

‘आमचं सगळं शिस्तीच्या धाग्यात बांधलेलं असतं. आम्हाला कसल्या धाग्या दोर्‍याची गरज नसते. लोक दुसर्‍या पक्षातून फुटून आमच्यात येतात. आम्ही कुणाच्या पक्षात जात नाही.’

‘ते सगळं राहू दे अण्णा... पण सध्याचा तिढा कसा सोडवणार ते सांगा ना?’

‘तेच मी तुम्हाला विचारायला आलोय ना? मी म्हणतो पक्षात आलेल्या त्या माजी मुख्यमंत्र्यांनाच पुन्हा संधी दिली तर?’

‘हे मात्र बरंय म्हणजे ते पूर्वी सेनेत होतेच म्हणजे पक्के सैनिक आहेतच. आता तुमच्या पक्षात आलेत म्हणजे त्यांना दोन्ही पक्षांबद्दल आस्था आहे असं नाही का होत? ते दोघांनाही रिप्रेझेंट करू शकतात खर्‍या अर्थानं. ते अर्धे सैनिक, तर अर्धे स्वयंसेवक आहेत. सध्या ते शांतही झालेत असं म्हणतात.’

‘म्हणतात नव्हे, तसं त्यांनीच जाहीर केलंय... मी शांत झालोय म्हणून.’

‘पण, खरं तर तसं लोकांनी म्हणायला हवं ना? तुम्ही म्हणून काय उपयोग. पुन्हा तुमचा मूळचा स्वभाव उफाळून आला तर?’

‘मग, हा तिढा कसा काय सुटणार?’

‘ते आता पावसात भिजलेल्या, पक्क्या मुरलेल्या, त्या राजकारणी नेत्यालाच माहीत.’

‘त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय ना... तुम्हालाच पाठिंबा देणार ते.’

‘नको नको... त्यांचा टेकू ते कधी काढून घेतील याचा भरवसा नाही... म्हणूनच निर्माण झालाय ना तिढा?’

‘म्हणूनच म्हणतो ना, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बदला. तिढा कसा पटकन सुटतो की नाही बघा. मग, महाराष्ट्राचा गड सर करण्यासाठी गडकरींना आणलं तरी चालेल. बदल हवाय ना... घ्या बदल.’
...हातावर टाळी देत अण्णा परत गेले.