Mon, Apr 06, 2020 10:31होमपेज › Bahar › ललित : देशाच्या राजधानीत ‘माय मराठी’ 

ललित : देशाच्या राजधानीत ‘माय मराठी’ 

Last Updated: Feb 22 2020 9:34PM

संग्रहित छायाचित्रवैजनाथ महाजन

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी असलेल्या दिल्लीनगरीत होण्याची प्रसादचिन्हे दिसू लागली आहेत. असे जर घडून आले, तर ते माय मराठीच्या शिरपेचात एक झगमगीत असा तुरा ठरणार आहे. केवळ  संमेलन राजधानीत होईल एवढाच त्याला अर्थ नाही, तर त्याला तसा पूर्वेतिहासही आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून आपण ज्यांचा सार्थ गौरव करतो, त्या यशवंतराव चव्हाणांनी  राजधानी दिल्लीत स्वतःचा तर दबदबाच  निर्माण केलेला होता; पण त्याचबरोबर मराठी माणसाला दिल्लीतल्या कोणत्याही कार्यालयात कामासाठी गेल्यावर त्यांचे काम  तत्परतेने होईल, अशी त्यांनी जरबही निर्माण केली. त्यामुळे मराठी माणूस दिल्लीच्या कोणत्याही कार्यालयात ताठ मानेने जात असे. त्याही पूर्वी दिल्लीत मामा वरेरकर हे आपले नाटककार दीर्घकाळ पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मित्र बनून राहिलेले होते. असाच दिल्लीशी काकासाहेब गाडगीळ यांचा घरोबा होता. कराडचे आनंदराव चव्हाण आणि  अहमदनगरचे अण्णासाहेब शिंदे हे अनेक वर्षे नेहरूंच्या मंत्रिमंडळात अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम मंत्री म्हणून नावारूपाला आलेले होते.

त्यानंतर प्रेमलताताई चव्हाण या इंदिरा गांधींच्या अत्यंत विश्‍वासातील आणि उत्तम काँग्रेसचे काम करणार्‍या म्हणूनही सर्वदूर परिचित होत्या. या काळात दिल्लीत मराठी माणसासाठी उत्तम वातावरण तयार झालेले होते. पुढे बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी या दिशेने मोलाची कामगिरी केलेली आहे. याही अगोदर बंडोपंत सरपोतदार हे ‘दिल्ली दरवाजा’ या नावाचे मराठी मासिक  अनेक वर्षे दिल्लीतून प्रकाशित करत असत. याही मासिकाची दिल्लीकरांना चांगली ओळख झालेली होती आणि आजही ती दिल्लीच्या स्मरणात आहे. पुढे अलकाझीच्या नाट्यशाळेत मराठीतील अनेक कलावंत प्रशिक्षणासाठी जात असत आणि ते इथून नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणार्‍या अनेकांना दिल्लीत पाठवत असत. अलीकडेच या पदावर काम करण्याकरिता एका मराठी नाट्य दिग्दर्शकाची नेमणूक झाली होती आणि त्याने इथे काम केलेले आहे. यशवंतराव चव्हाण दिल्लीत असताना दिल्लीत अनेक मराठी नाटके होत असत. त्या नाटकांतील कलावंतांना यशवंतराव चव्हाण आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांचा गौरव करत असत. त्यामुळे दिल्लीतील महाराष्ट्र सदन हेही या काळात गजबजलेले असे. आता काळ पालटलेला आहे. दिल्ली महाराष्ट्राकरिता फ ारशी अनुकूल राहिलेली नाही, असा निष्कर्ष काढण्यासारखी आजची स्थिती आहे. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे, मराठी भाषेला  अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता केंद्र सरकार अद्याप राजी नाही आणि याबद्दल महाराष्ट्रातून एवढी नाराजी प्रकट होऊनसुद्धा  याबाबत केंद्र सरकार लक्ष घालताना दिसत नाही. जर आगामी साहित्य संमेलन राजधानीत निश्‍चित झाले, तर मराठी भाषेला नवी ऊर्जा मिळण्याकरिता निश्‍चितच वातावरण तयार होईल, असे वाटते.

याकरिता तत्परतेने दिल्लीकरांचा प्रस्ताव समंत व्हायला हवा आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठीचे वातावरण तयार होऊन त्याचा प्रभाव राजधानीवर निर्माण व्हायला हवा. सुदैवाने अलीकडचे ज्ञानपीठ परितोषिक मराठी साहित्यिकालाच मिळालेले आहे. ही यातील जमेची बाजू म्हणता येईल. तसेच दरवर्षी जशी कोलकाता येथे जागतिक स्तरावरची ग्रंथ जत्रा भरते. तसेच मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन यानिमित्ताने दिल्लीत भरविता येईल. त्याकरिता मराठी प्रकाशक संघटनेने आतापासून हालचाली करणे गरजेचे आहे. कारण, आपली तिथली ग्रंथ विक्री हीसुद्धा याबाबतीत मोलाची ठरणार आहे. त्यामुळे संमेलनाची निश्‍चितता होणे महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर त्याच तोलामोलाचा अध्यक्षही नियुक्‍त होणे अगत्याचे आहे. कारण, संमेलन दिल्लीत असल्यामुळे देश-विदेशातील मराठीप्रेमी दिल्लीत दाखल होतील आणि त्याचबरोबर अन्य भाषेचे आणि साहित्याचे अभ्यासक मराठी साहित्याच्या परिवारात येतील. याकरिता संमेलनाचे संयोजन तितक्याच काटेकोर पद्धतीने करावे लागेल. त्याकरिता महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांचा संयोजनात कसा सहभाग असेल, हे पाहावे लागेल. याकरिता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळ व महाराष्ट्राची  मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थांमध्ये अत्यंत मोलाचा असा समन्वय व संवाद निर्माण होणे अगत्याचे आहे.

त्याकरिता आतापासूनच संमेलनाच्या सिद्धतेकरिता प्रयत्नशील राहणे अगत्याचे आहे. त्याबरोबरच आपणाला अन्य भारतीय भाषांतील साहित्यिकांशी नव्याने संवाद प्रस्थापित करावा लागेल. याकरिता दिल्लीत सर्वमान्य असलेली अशी एखादी जागा संमेलनासाठी निश्‍चित करावी लागेल. असे सर्व जर योजनाबद्धरीत्या घडून आले, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याशिवाय केंद्र सरकारला पर्याय उरणार नाही. याबरोबरच सध्या भाषेच्या क्षेत्रात  अनुवादाचा अत्यंत महत्त्वाचा असा नवा क्षेत्रीय वर्ग निर्माण होतो आहे. तो स्वागतार्हच आहे. आपण मराठीत अन्य भारतीय पुस्तके यावीत याकरिता या संमेलनाच्या निमित्ताने काही योजना आखता येतील का? ते आजमावून पाहण्यास हरकत नाही. दिल्लीतही  अनेक साहित्यिक वास्तव्यास आहेत. त्यांचा हातभार या संमेलनाला लागावा, अशीही योजना करणे गरजेचे आहे. बर्‍याच वेळा आपले साहित्य संमेलन म्हणजे फ क्‍त तीन दिवसांचा उत्सव अशाच स्वरूपाचे ते असते. त्यामुळे आपोआपच संमेलनाचा अध्यक्ष हा  तीन दिवसांचा गणपती होऊन राहतो. यावेळी मात्र असे होऊ नये, अशी तमाम मराठी भाषिकांची इच्छा आहे. याकरिता संमेलनाच्या यशस्वितेकरिता आतापासून कंबर कसणे गरजेचे आहे.