Thu, Jan 28, 2021 06:38होमपेज › Bahar › वनस्पतींबाबतचे समज, गैरसमज

वनस्पतींबाबतचे समज, गैरसमज

Last Updated: Feb 08 2020 8:15PM
डॉ. मधुकर बाचुळकर,
वनस्पती तज्ज्ञ

वनस्पतींबाबत आपणाला अज्ञात असणार्‍या बाबी, त्यांचे अज्ञात गुणधर्म जाणून घेणे आवश्यक आहेत. वनस्पतींबाबत एक महत्त्वाचा गैरसमज असा आहे की, काही वनस्पती दिवस-रात्र, चोवीस तास ऑक्सिजन देतात. याबाबत सविस्तर माहिती...

आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून असा पारंपरिक समज आहे की, वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब हे देशी वृक्ष आणि तुळस ही औषधी वनस्पती दिवसा व रात्री चोवीस तास ऑक्सिजन देतात; पण आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगातही हा समज जनतेच्या मनातून दूर न होता, तो अधिक द‍ृढ होत चालला आहे, ही बाब चिंताजनक आहे. याबाबतची काही कारणेही आता समोर येऊ लागली आहेत.  

आरेका पाम, जरबेरा, अ‍ॅलोव्हेरा, सॅन्सव्हेरिया, अ‍ॅन्थुरियम, सिनड्यॉप्सस, अ‍ॅग्लोनिमा, पायलिया, क्लोरोफायटम, डायफेनबेकिया, आयव्ही प्लांट, अ‍ॅझेलिया, ड्रॉसिना, फिलोडेंड्रॉन, मनी प्लांट, बांबू पाम, ब्रॉमिलीडस, नेफ्रोलिपीस, स्पॅथिफायलम, अ‍ॅम्ब्रेला बुश, कॅलाथिया, कॉर्डिलाईन, सिंगोनियम, मॉन्सटेरिया अशा अनेक विदेशी सावलीत वाढणार्‍या शोभिवंत वनस्पती दिवसा व रात्री चोवीस तास मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडतात आणि वेगाने हवा शुद्धीकरणाचे काम करतात, हवेत गारवा निर्माण करतात, अशी माहिती आजकाल विविध माध्यमांतून व सोशल मीडियावरून प्रसारित केली जात आहे. वनस्पतींबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. इतकेच नव्हे, तर या वनस्पतींची सहजासहजी सर्वत्र उपलब्धता व्हावी, यासाठी काही आंतरराष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बुकिंग व विक्री सुरू आहे. सर्वत्रच हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे, तापमानात मोठी वाढ होत आहे, यामुळे प्रदूषण व तापमान कमी करण्याचा सोपा उपाय म्हणून हल्ली या वनस्पती खरेदी करण्याकडे जनतेचा कौल वाढला आहे. या सर्व वनस्पती ‘इनडोअर प्लांटस्’ किंवा ‘हाऊस प्लांटस्’च्या नावाने ओळखल्या जातात.

आजकाल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘ऑक्सिजन पार्क’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या पार्कच्या ठिकाणी तुळशीची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली दिसून येते. तसेच अनेक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व विश्रामगृहांच्या जागेत ‘ऑक्सिजन पार्क’ म्हणून वर नमूद केलेल्या विदेशी इनडोअर वनस्पतींची मोठ्या प्रमाणात कुंड्यांतून लागवड करण्यात आली आहे. या पार्कमधून आपणाला चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होतो, असे सांगितले जाते.

ठाणे शहरात शासकीय आदेशाप्रमाणे रस्त्यांच्या कडेला कुंड्यांमधून मोठ्या प्रमाणात छायाप्रिय विदेशी इनडोअर वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. पुलांच्या भिंतीवर या वनस्पतींची ‘व्हर्टिकल गार्डन’ तयार करण्यात आली आहेत. ‘मनी प्लांट’ ही वेलवर्गीय वनस्पती तारांच्या कुंपणावर सोडून त्याची झालर तयार करण्यात आली आहे. शासकीयस्तरावर यासाठी प्रचंड खर्च करण्यात आला आहे. हे सर्व करण्यामागे कारण एकच. या इनडोअर वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देतात आणि प्रदूषित हवा वेगाने स्वच्छ करतात. अशा प्रकारची संकल्पना, योजना सर्व शहरांत राबविण्यासाठी शासकीय प्रयत्न सुरू आहेत. यासाठी काही लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी आग्रही आहेत.

वर नमूद केलेल्या या सर्व देशी व विदेशी वनस्पती दिवसा व रात्री चोवीस तास ऑक्सिजन देतात का? या समजुतीला, विधानांना काही शास्त्रीय आधार आहे का? हे सर्व पाहणे आवश्यक आहे.
हरितद्रव्य असणार्‍या निसर्गातील सर्व हिरव्या वनस्पती दिवसा सूर्यप्रकाशात कार्बन डायऑक्साईड वायू घेतात व त्यापासून आपले अन्‍न तयार करतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर वातावरणात सोडतात, या प्रक्रियेस ‘प्रकाश संश्‍लेषण’ असे म्हणतात. ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होते. पहिल्या टप्प्यात वनस्पती दिवसा पानात असणार्‍या हरितद्रव्याच्या मदतीने सौरऊर्जा शोषून घेतात व सौरऊर्जेचे रूपांतर जैवरासायनिक ऊर्जेत करतात आणि त्याचवेळी पाण्याचे विघटन करून त्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन घटक वेगळे करून पानांवर असणार्‍या पर्णछिद्रांतून ऑक्सिजन बाहेर सोडतात. त्याचवेळी दिवसा वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड पर्णछिद्रांतून आत पानात घेतात आणि त्यावर पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या हायड्रोजन व जैवरासायनिक रासायनिक ऊर्जा यांच्या सहकार्याने कार्बन डायऑक्साईडवर रासायनिक प्रक्रिया करून, त्यापासून ग्लुकोज (स्टार्च) ची निर्मिती करतात व आपले अन्‍न तयार करतात.

ही संपूर्ण शास्त्रीय प्रक्रिया लक्षात घेतल्यास, यावरून असे स्पष्ट होते की, वनस्पतीमध्ये ऑक्सिजन तयार होण्याची प्रक्रिया फक्‍त दिवसाच, सूर्यप्रकाशाच्या सहकार्यानेच होते. ही प्रक्रिया रात्री अंधारात किंवा रात्री चंद्रप्रकाशातही होत नाही. यावरून लक्षात येते की, निसर्गातील सर्व वनस्पती फक्‍त दिवसाच ऑक्सिजन बाहेर सोडतात. भूतलावरील कोणतीही वनस्पती चोवीस तास दिवस-रात्र ऑक्सिजन देत नाही. ही शास्त्रीय बाब सुस्पष्ट आहे.

वड, पिंपळ, उंबर, तुळस व इनडोअर वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देतात, हा मोठा गैरसमज आहे. हे शास्त्रीयद‍ृष्ट्या सिद्ध झालेले असले, तरी हेतुपुरस्सर काही विदेशी संस्था व कंपन्या, व्यापारी द‍ृष्टिकोनातून, विदेशी, आकर्षक, छायाप्रिय इनडोअर वनस्पतींची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी सोशल मीडियावरून चुकीची माहिती प्रसारित करून, जनतेची दिशाभूल करून, फसवणूक करीत आहेत, हे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारचा चुकीचा प्रचार-प्रसार करणारे घटक व कंपन्या आपला दावा खरा आहे, हे दाखविण्यासाठी ‘नासा’ या आंतरराष्ट्रीय अंतराळ विज्ञानविषयक कार्य करणार्‍या संस्थेचा संदर्भ देत आहेत; पण जगभरात ‘नासा’ अशा संक्षिप्‍तरूपी नाव असणार्‍या सुमारे बारा विविध संस्था जगभरात कार्यरत आहेत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कोल्हापुरातील वनस्पती शरीरशास्त्र विषयाचे अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक व शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. डी. चव्हाण यांनीही विदेशी कंपन्यांचा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

दुसरा महत्त्वाचा गैरसमज असा आहे की, इनडोअर वनस्पती इतर सर्व वनस्पतींपेक्षा जास्त ऑक्सिजन हवेत सोडतात; पण तशीही वस्तुस्थिती नाही, हे शास्त्रीयद‍ृष्ट्या स्पष्ट झाले आहे. वनस्पतींच्या फांद्यांचा विस्तार, आकार व पर्णसंभार जितका मोठा व जास्त, तेवढा त्या वनस्पतींकडून जास्त ऑक्सिजन हवेत सोडला जातो, इनडोअर वनस्पती या इतर वृक्ष आणि मोठ्या झुडपांच्या तुलनेत अगदी लहान असल्याने, इनडोअर वनस्पती मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात, हा दावा पूर्णपणे खोटा आहे.

वनस्पतींबाबत तिसरा गैरसमज असा आहे की, तुळस वनस्पती पहाटे व सकाळी पानांवाटे ओझोन वायू वातावरणात सोडतात. तुळस किंवा निसर्गातील कोणतीही वनस्पती त्यांच्या कोणत्याही प्रक्रियेतून ओझोन वायू तयार करीत नाहीत. यामुळे तुळस वनस्पती ओझोन वायू सोडतात, हा समजही चुकीचा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

काही इनडोअर वनस्पती रात्रीच्या वेळीही कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात व रात्री ऑक्सिजन बाहेर हवेत सोडतात, असा दावा केला जातो. यामुळे रात्रीच्या वेळी घरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड या इनडोअर वनस्पती घेतात व ऑक्सिजन देतात. यामुळे रात्री घराच्या खिडक्या व दारे बंद असतानाही आपणास स्वच्छ हवा, ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो. या समजुतीतून आज अनेक बंगल्यांमध्ये व घरांमध्ये तसेच हॉटेल्समध्ये या सावलीत वाढणार्‍या इनडोअर वनस्पतींच्या कुंड्या मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत.

इनडोअर वनस्पतींच्या गटात अ‍ॅलोव्हेरा, अ‍ॅगेव्ह, ब्रायोफायलम, हॅवोरथिया, पेपरोमिया, सिडम, स्टेपेलिया, अ‍ॅवोनियम, सॅन्सव्हेरिया यासारख्या अनेक मांसल (सक्युलंटस्) वनस्पतींचा समावेश होतो. या वनस्पतींची पाने किंवा खोड जाड व मांसल असतात. या सर्व मांसल वनस्पती तसेच आरेका पाम, जरबेरा यासारख्या काही इतर अमांसल (नॉन-सक्युलंटस्) इनडोअर वनस्पती रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड घेतात व त्याचवेळी रात्री ऑक्सिजन बाहेर सोडतात अशा प्रकारची माहिती विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून सर्वत्र ऑनलाईन प्रसारित केली जात आहे. ही माहिती कितपत सत्य आहे, ते आपण पाहू.  

मांसल वनस्पती प्रामुख्याने उष्ण, कोरड्या हवामानात, ज्या ठिकाणी पाऊस अत्यंत कमी पडतो, अशा प्रदेशात नैसर्गिकपणे वाढतात. या वनस्पतींचे विविध आकार, त्यांच्या पानांची रचना, त्यांची फुले अत्यंत सुंदर व मनमोहक असल्याने यांची आकर्षक वनस्पती म्हणून सर्वत्र लागवड करतात. मांसल वनस्पतींचे असंख्य प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. या वनस्पतींमध्ये त्यांची पर्णछिद्रे रात्री पूर्णपणे उघडी असतात, तर दिवसा अंशत: उघडी किंवा बंद असतात. कारण, या वनस्पतींचे मूळस्थान उष्ण प्रदेशातील असल्याने, दिवसा उष्ण तापमानात बाष्पोत्सर्जन प्रक्रियेत त्यांच्या शरीरातील पाणी बाष्पाच्या रूपात पर्णछिद्रांतून बाहेर जाऊ नये, यासाठी त्यांची पर्णछिद्रे दिवसा बंद, तर रात्री उघडी असतात. कारण, या वनस्पतींना पाणी शरीरात साठवून ठेवून ते जपून वापरावे लागते, म्हणूनच पाणी साठविण्यासाठी त्यांचे शरीर मांसल असते व त्यांची पर्णछिद्रे अपित्वचेच्या खाली लहान पोकळीत असतात.

दिवसा पर्णछिद्रे बंद असल्याने मांसल वनस्पती प्रकाश संश्‍लेषणासाठी आवश्यक कार्बन डायऑक्साईड दिवसा घेऊ शकत नाहीत; पण त्यांची पर्णछिद्रे रात्री उघडी असल्याने मांसल वनस्पती रात्री कार्बन डायऑक्साईड आत घेतात.  आत घेतलेला कार्बन डायऑक्साईड पानांत असणार्‍या संयुगांशी एकरूप होऊन ‘मॅलिक अ‍ॅसिड’ तयार होते. ‘मॅलिक अ‍ॅसिड’ रात्रभर पानात साठविले जाते. यामुळेच मांसल वनस्पतींची पाने रात्री खाल्ल्यास ती आंबट लागतात. कारण, त्यावेळी पानांत ‘मॅलिक अ‍ॅसिड’ साठवलेले असते.  दिवसा ‘मॅलिक अ‍ॅसिड’वर पुढील प्रक्रिया होऊन त्यापासून या वनस्पती ग्लुकोज (स्टार्च) हे अन्‍न तयार करतात. या प्रक्रियेस ‘क्रॅस्युलिन अ‍ॅसिड मेटाबोलिझम’ असे म्हणतात. मांसल वनस्पती दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने पानांत असणार्‍या पाण्याचे विघटन करून त्यातील ऑक्सिजन अंशत: उघड्या असणार्‍या पर्णछिद्रातून किंवा उपत्वचेतून बाहेर वातावरणात सोडतात.

या सर्व माहितीवरून हे स्पष्ट होते की, इनडोअर मांसल वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन बाहेर सोडत नाहीत, फक्‍त दिवसाच ऑक्सिजन बाहेर सोडतात; पण कार्बन डायऑक्साईड मात्र रात्री घेतात. आरेका पाम, जरबेरा या वनस्पतींची पाने व खोड मांसल नसल्याने या रात्री कार्बन डायऑक्साईड घेतात हा दावा असत्य असल्याचे स्पष्ट होते.

चुकीच्या संकल्पनेतून ज्या आकर्षक विदेशी इनडोअर वनस्पतींची सर्वत्र लागवड केली जाते, या गटातील अ‍ॅलोकॅसिया, कॅलाडियम, अ‍ॅन्थुरियम, अ‍ॅग्लोनिमा, फिलोडेंड्रॉन, सिंगोनियम, मॉनस्टेरा, डायफेनबेकिया, स्पॅथिफायलम इ. यासारख्या वनस्पती ‘अ‍ॅरेएसी’ या कुळातील आहेत. या वनस्पतींच्या खोडा-पानांत ‘कॅलशियम ऑक्झलेट’सारखी रसायने असतात, जी आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत. डायफेनबेकियासारख्या वनस्पती विषारी आहेत, त्यांचा अंगरस तोंड, घसा व डोळ्यात गेल्यास त्यातील कॅल्शियम ऑक्झलेट या रसायनाच्या टोकदार व अणकुचीदार स्फटिकांमुळे प्रचंड खाज येते आणि सूज येऊन वेदना होतात. यामुळे या वनस्पतींपासून लहान मुलांना दूर ठेवणे आवश्यक असते.  विदेशी इनडोअर वनस्पतींची विक्री वाढावी, या हेतूने हल्ली अशास्त्रीय, चुकीची माहिती प्रसारित होत आहे. तरी याबाबत जनतेने वेळीच सावध होणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरून प्रसारित केली जाणारी सर्वच माहिती शास्त्रीयद‍ृष्ट्या खरी नसते, हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे आणि अशा विधानांची शास्त्रीय शहानिशा केल्याशिवाय अशी माहिती व गैरसमजुती समाजात पसरवू नयेत.  

ही सर्व माहिती लक्षात घेऊन विदेशी वनस्पतींच्या मोहजालात फारसे न अडकता, सर्वांनी आपल्या घरांभोवती, रस्त्याच्या कडेने देशी वृक्षांची व झुडपांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे. यामुळे आपली देशी, स्थानिक जैवविविधता वाढीस लागेल. आपणाला मुबलक ऑक्सिजन व शुद्ध हवा मिळेलच; पण परिसरातील तापमान कमी होण्यासाठीही मदत होईल.

आपल्याकडे असाही एक समज अनेक वर्षांपासून आहे की, रात्री झाडाखाली झोपू नये, तसेच रात्री घरात झोपताना आपल्या जवळ वनस्पती असू नयेत. कारण, वृक्ष आणि सर्व प्रकारच्या वनस्पती रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडतात. यामुळे याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हा समजही चुकीचा आहे. याबाबत आपण माहिती घेऊ.

प्राण्यांप्रमाणेच वनस्पतीही दिवस-रात्र श्‍वसन करतात. श्‍वसन प्रक्रियेच्या वेळी वनस्पती वातावरणातील ऑक्सिजन पर्णछिद्रांतून आत घेतात. या ऑक्सिजनची प्रक्रिया वनस्पतींमध्ये असलेल्या ग्लुकोजवर होऊन त्याचे विघटन होते. या प्रक्रियेतून जैवरासायनिक ऊर्जा व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. या प्रक्रियेतून तयार झालेली जैवरासायनिक ऊर्जा वनस्पती त्यांच्या वाढीसाठी व इतर प्रक्रियांसाठी वापरतात आणि कार्बन डायऑक्साईड पर्णछिद्रांतून बाहेर वातावरणात सोडतात किंवा दिवसा हाच कार्बन डायऑक्साईड प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेत वनस्पतींकडून वापरला जातो. श्‍वसन प्रक्रिया, वनस्पतींमध्ये दिवसा व रात्री दोन्हीवेळा सुरू असते; पण रात्री होणार्‍या श्‍वसन प्रक्रियेचा वेग तुलनेने दिवसा होणार्‍या श्‍वसन प्रक्रियेच्या वेगापेक्षा फारच कमी असतो. कारण, पर्णछिद्रांची उघडझाप होण्याची प्रक्रिया सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. यामुळे पर्णछिद्रे दिवसा पूर्ण उघडी असतात व रात्री बंद असतात किंवा अंशत: उघडी असतात. यामुळे वनस्पती रात्रीच्या वेळेस श्‍वसन प्रक्रियेतून अत्यंत अल्प प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हवेत सोडतात. यामुळे याचा मानवी व प्राणी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, हे शास्त्रीयद‍ृष्ट्या सिद्ध झाले आहे. यामुळे रात्री झाडाखाली झोपू नये, तसेच झोपण्याच्या वेळी आपल्या जवळपास वनस्पती असू नयेत, हे समज चुकीचे आहेत.  

वायू बदलांची प्रक्रिया पानांच्या पृष्ठभागांवर असणार्‍या उपत्वचेमार्फतही होते. तसेच वनस्पतींमार्फत वातावरणात बाहेर सोडल्या जाणार्‍या ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड या वायूंचे प्रमाण समान नसते. तुलनेने ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. या वैज्ञानिक बाबीही लक्षात घेणे आवश्यक आहेत.