Tue, Aug 04, 2020 22:31होमपेज › Bahar › अमेरिका-इराण संघर्ष : जगाची चिंता वाढली!

अमेरिका-इराण संघर्ष : जगाची चिंता वाढली!

Last Updated: Jan 12 2020 10:28AM
सुशांत सरीन (सामरिक तज्ज्ञ)

अमेरिका-इराण संघर्षाच्या झळा केवळ इराणलाच बसणार नाहीत, तर ज्या देशांशी इराणचा तेल व्यापार सुरू आहे त्या-त्या देशांमध्ये संकट निर्माण होणार आहे. या वणव्यात पश्चिम आशिया ओढला गेला, तर अन्य देशांमध्येही अशांतता माजेल आणि जागतिक 

महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल. अशा स्थितीत तेलाच्या उपलब्धतेचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तेलटंचाईमुळे जगभरातील बाजार हे मंदीच्या विळख्याने ग्रासून जातील. तेलवाहू जहाजांवर होणारे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे होणारे नुकसान महाभयानक असेल. सततच्या हल्ल्यांमुळे सागरी मार्ग अडले गेले, तर व्यापारउदीम ठप्प होऊन जाईल...

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये पूर्वी मैत्री होती. मात्र, तेलाच्या राजकारणामुळे या मैत्रीचं रूपांतर शत्रुत्वात झालं. आज या दोन्ही राष्ट्रांमध्ये विस्तव जात नाही, अशी स्थिती आहे. सत्तरच्या दशकापूर्वी इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये अनेक स्तरांवर गाढ दोस्ती होती. मात्र, सत्तरच्या दशकाच्या अखेरीस जेव्हा इराण इस्लामिक प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला, तेव्हापासून इराणवरून अमेरिकेचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला.  आज हे दोन्हीही देश सातत्याने एकमेकांविरुद्ध संघर्ष करताना दिसतात. अमेरिकेने इराणच्या ज्या सुप्रीम कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना हवाई हल्ल्यांद्वारे मारले ती अमेरिकेची दादागिरीच आहे. इतकेच नव्हे, तर वैश्विक अर्थव्यवस्थेला हादरा देणारे हे कृत्य आहे. जागतिक अर्थव्यवस्था आधीच मंदीच्या संकटाशी झुंजत आहे, तशातच आता सुलेमानींच्या हत्येमुळे मध्य आशियामध्ये अशांतता वृद्धिंगत होण्याच्या दाट शक्यता निर्माण झाल्या आहेत. 

आजमितीला अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. असे असले तरी या तणावाचे रूपांतर दोन्ही देशांमधील युद्धामध्ये होईल का, याची अंदाजबांधणी करता येत नाही. इराणकडून या हत्येचा बदला घेण्यासाठी इराकमधील अमेरिकेच्या ताब्यातील हवाई तळांवर केलेल्या हल्ल्यासारखी आणखी एखादी कारवाई केली जाऊ शकते आणि त्याला अमेरिकेकडूनही प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. हा सिलसिला सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे. तथापि, आरपारची लढाई होण्याच्या शक्यता आजघडीला तरी दिसत नाहीहेत. तसेच प्रत्युत्तरादाखल होणार्‍या हल्ल्यांमधून  आखाती देशांमध्ये मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यताही फार कमी आहे; पण दोन्ही देशांमध्ये दिसून येणारी आक्रमकता आणि सूडभावना पाहता पुढे काय होईल, हे ठामपणाने कोणालाच सांगता येणार नाही. केवळ प्रत्युत्तरात्मक कारवाया अशाच सुरू राहिल्या, तर त्याचा भारतावर होणारा परिणाम हा मर्यादित राहील; पण इराणने जर एखादा मोठा हल्ला केला आणि त्यातून अमेरिकेची मोठी हानी झाली, तर निश्चितपणाने डोनाल्ड ट्रम्प त्याविरोधात एखादे मोठे पाऊल उचलू शकतात. या सर्वांची उत्तरं भविष्याच्या उदरात दडलेली आहेत. युद्ध हा कोणत्याही प्रश्नाचा उपाय नसतो. कोणताही देश युद्धाच्या झळा सोसण्यास तयार नसतो. इराणने आजवर कधीही अमेरिकेचे म्हणणे ऐकलेले नाही आणि अमेरिकेचा विरोध झुगारून देत इराणने आपला अणुकार्यक्रम सुरू ठेवला आहे. त्यामुळे या संघर्षाचे पर्यावसान अण्वस्त्रांच्या हल्ल्यांमध्ये झाले, तर भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला त्याचा फार मोठा फटका बसू शकतो. 

इराण-अमेरिका यांच्यातील संघर्षानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत; पण हा एक तात्कालिक दिसणारा परिणाम आहे. हा तणाव जर असाच वाढत गेला, तर अन्यही काही परिणाम दिसू लागणार आहेत. साहजिकच, भारतासाठी ती चिंतेची बाब ठरणार आहे. 

आजघडीला भारतीय अर्थव्यवस्थेत मरगळ आलेली आहे. अशा स्थितीत तेलाच्या किमती वाढल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम देशाला भोगावे लागू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे, या तणावामुळे वैश्विक बाजारात अनिश्चिततेचे सावट गहिरे होत जाणार आहे. या अनिश्चिततेचे परिणाम भारतीय बाजाराला भोगावे लागू शकतात. कारण, अनिश्चिततेच्या काळात बाजारात जोखीम पत्करण्यास कोणाही धजावत नाही. परिणामी, गुंतवणूक आणि उत्पादन क्रिया प्रभावित होते. 

इराणचे संकट हे केवळ इराणपुरतेच मर्यादित नाही. ज्या देशांशी इराणचा तेल व्यापार सुरू आहे त्या-त्या देशांमध्ये संकट निर्माण होणार आहे. अमेरिकेने प्रतिबंध घातल्यानंतर भारताने इराणकडून होणारी तेलाची आयात जवळपास पूर्णपणानेथांबवली आहे; पण भारताचे इराणशी असणारे संबंध केवळ तेलापुरतेच मर्यादित नाहीत. आज आखाती देशांमध्ये लाखो भारतीय राहत आहेत. युद्धसद़ृश परिस्थितीमध्ये या भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. मागील काळात येमेनमध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती आपण पाहिली आहे. तेथील भारतीय कशाप्रकारे या अनिश्चिततेच्या सावटाचे शिकार झाले होते, हे देशाने अनुभवले आहे. अर्थात, इराण आणि अमेरिकेतील लढाई ही या दोन राष्ट्रांपुरतीच मर्यादित राहिली, तर त्याचा भारताला फार मोठा फटका बसणार नाही. कारण, इराण आणि इराकमध्ये राहणार्‍या भारतीयांची संख्या तुलनेने कमी आहे. मुद्दा आखातातील अन्य देशांचा आहे. या देशांपर्यंत जर या युद्धझळा फैलावल्या, तर भारताच्या चिंता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. त्यामुळेच आज केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील युद्धविरोधी वैश्विक संघटनांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

इराण हा जगातला सर्वात मोठा शियाबहुल देश आहे. त्यामुळे इराणला सुन्नीबहुल देशांची साथ मिळणार नाही; पण युद्धाच्या वणव्यात जर पश्चिम आशिया ओढला गेला, तर अन्य देशांमध्येही अशांतता माजेल आणि जागतिक महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल. अशा स्थितीत तेलाच्या उपलब्धतेचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेलाची टंचाई निर्माण झाली, तर वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी नकारात्मक बाब ठरेल. जागतिक अर्थव्यवस्था अधिक सुस्तावेल आणि जगभरातील बाजार हे मंदीच्या विळख्याने ग्रासून जातील. सागरी मार्गांनी जी तेलवाहू जहाजे एका देशाकडून दुसर्‍या देशांमध्ये जातात त्या जहाजांवर होणारे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढतील. त्यामुळे होणारे नुकसान महाभयानक असेल. सततच्या हल्ल्यांमुळे सागरी मार्ग अडवले गेले, तर व्यापारउदीम ठप्प होऊन जाईल. 

अर्थव्यवस्थेच्या द़ृष्टिकोनातूनच नव्हे, तर सामरिकद़ृष्ट्याही इराण आणि अमेरिकेतील तणाव नकारात्मक ठरणारा आहे. कारण, आजचे युग शक्तिप्रदर्शनाचे आहे. युद्धाच्या काळात नेहमीच अन्य देशांमध्ये गेलेले नागरिक मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरू होते. यातून एक मोठे संकट निर्माण होते. पाच-दहा हजार लोक परतले, तर फार मोठी गोष्ट नाही; पण ही संख्या वाढून जर लाखांवर पोहोचली, तर त्या-त्या देशांना या नागरिकांचा सांभाळ करणे अवघड होऊन जाते. भारतातील जवळपास 40 लाख लोक आखाती देशांमध्ये राहतात. रोजीरोटीसाठी गेलेल्या या भारतीयांकडून आपल्या कुटुंबासाठी नियमित स्वरूपात पैसे पाठवले जात असतात. ही रक्कम थोडी-थोडकी नसून, जवळपास 50 अब्ज डॉलर्स इतकी आहे. याला फॉरेन रेमिटन्स असे म्हटले जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा पैसा खूप महत्त्वाचा ठरत असतो. युद्ध सुरू झाल्यास यावरही प्रतिकूल परिणाम होतील. अशा अनेक मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. जागतिक संघटनांना हा संघर्ष रोखण्यासाठी, तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्याची गरज निर्माण झाली आहे. भारताचा इराणसोबतचा व्यापार 12 ते 14 अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. हा आकडा मोठा दिसत असला, तरी अन्य आखाती देशांच्या तुलनेने तो कमी आहे. त्यामुळे इराणी संकट जर मध्यपूर्वेतील अन्य देशांमध्ये पोहोचले, तर परिस्थिती अधिक बिकट होणार आहे. जगातील मोठी लोकसंख्या यामुळे बाधित होणार आहे. इराणने आजवर अनेकदा भारताला मदत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारत सध्या शांत आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून इराणची भूमिका भारताच्या बाजूने नसते. अन्यही काही गोष्टींमध्ये इराणने हस्तक्षेपाचा प्रयत्न केला आहे. आज ज्या कासिम सुलेमानींच्या हत्येवरून इराण-अमेरिका संघर्ष पेटला आहे, त्या सुलेमानींवरही भारताच्या इस्रायलमधील दूतावासावर हल्ला केल्याचा आरोप होता. असे असले तरी भारत आजवर मध्यममार्ग स्वीकारत चालत राहिला आहे; पण आता हे इराणी संकट भारताच्या अडचणी वाढवणारे ठरण्याच्या दिशेने निघाले आहे. नजीकच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे हे सांगणं कठीण असलं, तरी इराण काय भूमिका घेतो यावरच पुढील गोष्टी अवलंबून आहेत. 

(लेखक ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन 
(ओआरएफ) चे सीनिअर फेलो आहेत.)