Wed, May 27, 2020 07:09होमपेज › Bahar › जागतिकीकरणाच्या पुनर्विचाराची वेळ

जागतिकीकरणाच्या पुनर्विचाराची वेळ

Last Updated: Apr 05 2020 1:01AM
हर्ष व्ही. पंत, लंंडन

कोरोनाच्या संकटामुळे खुल्या सीमा आणि खुला आंतरराष्ट्रीय व्यापार याला विरोध करणार्‍या शक्‍तींचा आवाज आणखी बुलंद होईल. या संकटाची ज्या देशांना कमी झळ बसेल, त्यांचा आर्थिक लाभ होईल, असा आशावाद व्यक्‍त केला जात असला, तरी तो खरा नव्हे. जागतिकीकरणाविषयी नव्या द‍ृष्टिकोनातून विचार सुरू करण्याची वेळ आता आली आहे. किंबहुना, कोरोनाच्या संकटापूर्वीच तो सुरू झालाही होता. आता या दिशेने विचार करण्याचा वेग वाढेल.

जागतिकीकरणाची प्रक्रिया एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे, असे हल्ली सर्वत्र बोलले जाते. ब्रेक्झिट असो वा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली निवड असो, अनिवासी नागरिकांविरुद्ध पाश्‍चात्त्य देशांमध्ये धुमसणारा असंतोष असो वा मुक्‍त व्यापाराच्या मार्गात वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न असोत, जागतिक राजकारणाचा हा टप्पा ‘जागतिकीकरणविरोधाचा’ टप्पा म्हणून ओळखला जात आहे. जग एकत्रित येऊन कोणत्याही संकटाचा एकजुटीने मुकाबला करेल, असा जो आशावाद जागतिकीकरणाने उत्पन्‍न केला होता, तो लुप्‍त होऊन एक प्रकारचा निराशावाद सातत्याने सर्वत्र आढळून येत आहे. आज जगभरातील मोजक्या अभिजनवर्गाकडे जागतिक व्यवस्थेचे नेतृत्व आहे आणि अशा प्रकारच्या व्यवस्थेला आज इतके कठोर आव्हान मिळत आहे, जे यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नाही. देशातील बहुतांश बहुपक्षीय संस्थांना एका विचित्र प्रकारच्या विरोधाभासाची जाणीव होत आहे.

कोरोना विषाणू हा सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय असला आणि त्याने आपले दैनंदिन जीवन आज व्यापून टाकले असले, तरी त्याच्याही पूर्वी जग एका धोकादायक वळणावर पोहोचले होते. 2008-09 मधील जागतिक आर्थिक संकटानंतर जग सातत्याने याच बिंदूकडे वाटचाल करीत होते आणि सध्याच्या जागतिक आर्थिक उलथापालथीच्या रस्त्यावरून जगाचा प्रवास सुरू झाला होता. या काळात जगभरातील राजकीय आणि आर्थिक अभिजनवर्गाच्या क्षमतेबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात होता. हा वर्ग जगाला प्रभावी प्रशासन देण्यास सक्षम आहे का? असा हा प्रश्‍न होता. ज्यांच्याकडे संसाधने उरलेली नाहीत, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास हा अभिजनवर्ग समर्थ आहे का, अशी शंका उपस्थित होत होती. 

आता ज्यावेळी एकापाठोपाठ एक देश स्वतःला या प्रक्रियेपासून वेगळे काढू लागले आहेत आणि अशा वेळीच कोरोनासारखे वैश्‍विक संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे, तेव्हा ज्या जीवनशैलीशी आपण सवयीने एकरूप झालो आहोत, त्या जीवनशैलीपुढेच प्रश्‍नचिन्ह लावले आहे. एवढेच नव्हे, तर कोव्हिड-19 चा वाढता प्रकोप संपूर्ण जागतिक व्यवस्थेलाच आव्हान देणारा ठरला आहे. जगभरातील कोट्यवधी लोक असुरक्षित आहेत, ही बाब खुलेपणाने समोर आली आहे आणि तज्ज्ञांकडे या आव्हानाचे विश्‍वसनीय उत्तर आहे, असे म्हणता येत नाही. 

जेव्हा कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू झाला, तेव्हा जगाला असे वाटले होते की, ही समस्या केवळ चीनपुरती सीमित आहे. एवढेच नव्हे, तर या विषाणूच्या प्रकोपामुळे अमेरिकेतील ज्या नोकर्‍या संपुष्टात आल्या आहेत, त्या उत्तर अमेरिकेतील नागरिकांना पुन्हा मिळतील, असे वक्‍तव्य अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्ब रॉस यांनी केले होते. परंतु, आजमितीस कोरोना विषाणूचा प्रकोप जगभरात दिवसागणीक अक्राळविक्राळ स्वरूप धारण करीत असल्याचे स्पष्ट होत असताना कोव्हिड-19 च्या प्रकोपाचे जागतिक पुरवठा साखळीवर (सप्लाय चेन) काय परिणाम होऊ शकतील, ही चर्चा सर्वत्र रंगली आहे. जागतिक अर्थव्यवस्था मुळातच मोठा संघर्ष करीत असतानाच आता कोरोना विषाणूमुळे जगभरातील भांडवल, माल आणि मनुष्यबळाचा प्रवाह वाढविण्याच्या प्रक्रियेस सहकार्य मिळण्याच्या उरल्यासुरल्या शक्यता क्षीण होताना दिसत आहेत. अर्थात, जे देश कोरोनाच्या संकटापासून बचावले आहेत किंवा जे देश कमी असुरक्षित आहेत, अशा देशांना या परिस्थितीचा आर्थिक लाभ मिळू शकतो, असे प्रलोभन निर्माण होणे शक्य आहे. परंतु, हे प्रलोभन कपोलकल्पित असून, असे काहीही होण्याची सूतराम शक्यता दिसत नाही.

कोरोना विषाणूचा उद्रेक सर्वप्रथम चीनमध्ये झालेला असला आणि त्यापासून बचाव करण्यासाठी चीनने जी प्रशासकीय पावले उचलली, त्याविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात येत असले, तरी जगात आज असंख्य लोक असे आहेत, जे चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडून उपयोगात आणल्या गेलेल्या उपाययोजनांकडे प्रशासकीय सामर्थ्याचा सकारात्मक पैलू म्हणून पाहत आहेत. या संकटापासून बचाव करण्याच्या भारतासारख्या देशांच्या सामर्थ्यावर असे लोक शंका उपस्थित करीत आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे चीनचे अतोनात नुकसान झाले आहे, हे खरे; परंतु या संकटातून बाहेर येऊन पुन्हा उभे राहण्याची क्षमता चीनकडे आहे. चीनसमोर आता मुख्य समस्या असेल ती म्हणजे, अनेक वर्षांपासून जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून घेण्याच्या चीनच्या प्रयत्नांना ज्या पाश्‍चात्त्य देशांनी सहकार्य केले, ते देश चीनकडे पाठ फिरवू शकतात. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी व्यापारी युद्धात चीनविरुद्ध वापरलेल्या मोठ्या अस्त्रांचे परिणाम आधीपासून दिसत आहेतच. जगातील अनेक देशांची चीनमध्ये असलेली उत्पादन केंद्रे आता चीनमधून अन्यत्र स्थलांतरित होत आहेत. आता व्यापारी आणि तांत्रिक विच्छेदाच्या दिशेने पडू लागलेल्या पावलांमुळे एक नव्या प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ पाहत आहे आणि त्यामुळे ज्या प्रक्रियेला आपण 1990 च्या दशकापासून सरावलो आहोत, त्या जागतिकीकरणाच्या मूलभूत तत्त्वांनाच आव्हान मिळणार आहे. 

सध्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत होत असलेल्या परिवर्तनावर जी मंडळी टीका करतात तसेच अर्थव्यवस्था आणि सीमांमध्ये अधिक खुलेपणा आणण्याचे समर्थन करतात, अशा व्यक्‍तींना या संकटामुळे बळ मिळेल. सध्याच्या संकटात ज्यांचा आवाज कमकुवत होणार आहे, अशी मंडळी मोठ्या आव्हानांना तोंड देत असूनसुद्धा जागतिकीकरणाच्या बाजूने मत नोंदवताना नेहमी दिसतात. वस्तुतः, जागतिकीकरणाविरुद्ध जी आंदोलने सुरू आहेत, ती यापुढे अधिक तीव्र होतील. वस्तुतः, जागतिकीकरणाविरुद्ध उठणारे आवाज दिवसेंदिवस तीव्र होत चाललेच आहेत. कोरोना विषाणूचे संकट येण्यापूर्वीच अनेक पाश्‍चात्त्य देशांनी आपल्या धोरणांना नवी दिशा देण्यास प्रारंभ केलेला होता. विशेषतः, ज्या देशांमधील प्रमुख राजकीय पक्ष व्यापार, अनिवासींचा प्रश्‍न याबाबतीत आपल्या अनेक वर्षे जोपासलेल्या तत्त्वांमध्ये परिवर्तन घडवून आणत आहेत, अशा देशांंमध्ये तर ही प्रक्रिया स्वाभाविकच आहे.  आजमितीस जग एका अर्थाने विखंडित होत चालले असताना, जागतिकीकरणाच्या धोरणांचे समर्थन करून ती पुनरुज्जीवित करणे हे मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान दिवसेंदिवस आणखी खडतर बनणार आहे.

भारतासारख्या देशांसाठी ही मोठी समस्या असेल. कारण, जागतिकीकरणाच्या धोरणांनी लाभान्वित झालेल्या देशांपैकी भारत हा एक देश आहे. विशेषतः, विचार, माहिती, नोकर्‍या आणि मनुष्यबळाचा मुक्‍त प्रवाह, यामुळे भारतीय नागरिकांना समृद्ध होण्याची अभूतपूर्व संधी प्राप्‍त झाली आहे. परंतु, आता जागतिक द‍ृश्य प्रचंड वेगाने बदलत आहे आणि ही प्रक्रिया घडत असताना भारतातील धोरणकर्त्यांना एक ठोस धोरण ठरवावे लागेल आणि नव्याने निर्माण होत असलेल्या संधीचा अधिकाधिक लाभ घेण्याच्या द‍ृष्टीने नवा रस्ता तयार करावा लागेल. कारण, आज जुनी जागतिक पुरवठा साखळी खंडित होत आहे आणि त्याजागी व्यापार आणि गुंतवणुकीची नवी व्यवस्था निर्माण केली जात आहे. जेवढे जग जवळ येत राहील, तेवढी असुरक्षितता वाढेल, असा तर्क वास्तववादी लोक पूर्वीपासून देत होते; परंतु जागतिकीकरणाच्या अतिआत्मविश्‍वासापुढे हा तर्क फार तग धरू शकला नाही. आता हा आत्मविश्‍वास ढळत चाललेला असताना जे धडे आपण शिकत आहोत, त्यातून उलट आणखी नुकसान होऊ नये, याचेच भय आहे.

जागतिकीकरणाचे मृत्युलेख यापूर्वीही अनेकदा लिहिले गेले आहेत. जागतिकीकरणाची प्रक्रिया या नव्या आक्रमणातूनही बचावू शकेल, हेही खरे आहे. परंतु, या प्रक्रियेचे नव्या आक्रमणामुळे जे नुकसान होईल आणि तिचे जे परिवर्तित स्वरूप आपल्यासमोर येईल, त्यातून आपल्याला एक निर्णय करावा लागेल तो असा की, ज्या जगात आपण जगतो, त्याविषयी नव्या क्रियात्मकतेने विचार केला पाहिजे. बदललेल्या परिस्थितीविषयी आपल्याकडे धोरणात्मक पर्याय तयार असायला हवा, ही आणखी महत्त्वाची गोष्ट आहे. या दिशेने पुनर्विचार करण्याची प्रक्रिया कोरोना विषाणूचा उद्रेक होण्याच्या पूर्वीपासून सुरूच होती. आता या दिशेने विचार करण्याचा वेग वाढेल, अशीच दाट शक्यता वाटते. (लेखक इंग्लंडमधील किंग्स कॉलेज लंडन येथे आंतरराष्ट्रीय संबंध, संरक्षण अभ्यास विभाग येथे प्राध्यापक आहेत.)