Sun, Jan 17, 2021 05:22
युद्धगर्जनांचा गर्भितार्थ

Last Updated: Jan 09 2021 10:34PM
दत्तात्रय शेकटकर,
निवृत्त लेफ्टनंट जनरल 

माओ त्से तुंग यांच्यानंतर चीनचे आतापर्यंतचे सर्वांत शक्तिशाली  राष्ट्राध्यक्ष बनलेल्या शी जिनपिंग यांनी चिनी सैन्याला दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. आज चिनी सैन्याचे प्रशिक्षण तिबेट आणि शिनजियांग प्रांतामध्ये  सुरू आहे. लडाखसारख्या दुर्गम क्षेत्रातील युद्धासाठीची ही तयारी आहे. त्यामुळे भारताने अत्यंत सजग, सावध राहणे आवश्यक आहे. 

भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप निवळलेला नसतानाच चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या काही दिवसांत दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत.

1) पीपल्स लिबरेशन आर्मीला (पीएलए) म्हणजेच चीनच्या सैन्याला  एक संदेशवजा सूचना केली आहे. त्यानुसार, चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्यास किंवा त्याच्या हितासाठी जर काही कारवाई करायची वेळ आली तर तुम्ही युद्धासाठी तयार राहा. सामान्यतः संरक्षणसिद्धतेमध्ये आपल्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत, आपल्यावर कोणी आक्रमण करता कामा नये यांचा समावेश होतो. परंतु; आमच्या व्यवसायाला बाधा येता कामा नये, आमच्याविरोधात कोणी बोलले नाही पाहिजे, असे जेव्हा सांगितले जाते तो एक नवा आयाम म्हटला पाहिजे. जिनपिंग यांच्या नव्या घोषणेतून हा आयाम देण्यात आला आहे. आजवरच्या चीनच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये हा आयाम नव्हता. आज भारत, अमेरिका, आदी लोकशाही देशांमधील सैन्य संविधानानुसार आपली जबाबदारी पार पाडत असते. त्या-त्या देशांमध्ये सरकार कोणत्या पक्षाचे आहे, याचा सैन्याच्या या जबाबदारीशी संबंध नसतो. अस्तित्वात असणार्‍या शासनाच्या नेतृत्वाने दिलेल्या आदेशांचे पालन हे सैन्य करत असते. परंतु; चीनमध्ये तसे नाही. चिनी सैन्य हे तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठीही  काम करते. आता चीनच्या व्यापारी, आर्थिक हितांसाठी, तेथील उद्योगांच्या संरक्षणासाठीही सैन्याने सज्ज असले पाहिजे, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. 

2) याखेरीज चिनी सैन्याने नव्या प्रकारच्या दीर्घ युद्धासाठीही तयार असले पाहिजे, असेही आदेश जिनपिंग यांनी दिले आहेत. हा इशारा प्रामुख्याने भारत, तिबेट आणि शिनशियांग या तिघांसाठी आहे. शिनशियांग हा चीनमधील प्रांत असून, तेथे गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. हा प्रांत वेगळा करण्यात यावा, यासाठी आंदोलनेही सुरू आहेत. परंतु; अशी मागणी केली गेल्यास त्यांना दंड केला जाईल, असा इशारा जिनपिंग यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी चिनी सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. युद्ध हे नेहमी बाह्यशत्रूंशीच करावे लागते असे नाही; ते अंतर्गत पातळीवरही करावे लागू शकते. शिनशियांगमधील संघर्ष शमविण्यासाठी, थोपविण्यासाठी प्रसंगी अंतर्गत युद्धही केले जाऊ शकते, हे जिनपिंग यांनी सूचित केले आहे. त्याचप्रमाणे हा इशारा त्यांनी तिबेटलाही दिला आहे. अलीकडेच अमेरिकेच्या सिनेटमध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला आहे.

‘द तिबेट पॉलिसी अँड सपोर्ट अ‍ॅक्ट’ नामक या नव्या कायद्यांतर्गत तिबेटच्या प्रकरणांमध्ये अमेरिकेच्या विशेष राजदूतांना हा अधिकार देण्यात आला आहे की, पुढच्या दलाई लामांची निवड फक्त तिबेट बौद्ध समुदायाकडून करण्यात यावी. हे निश्चित करण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी करू शकतात. यामध्ये तिबेटमध्ये तिबेटी समुदायांच्या समर्थनासाठी एनजीओंच्या मदतीचा प्रस्तावसुद्धा आहे. या माध्यमातून चीनवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढविला जात आहे. यामुळेच जिनपिंग यांनी सैन्याला युद्धासाठी तयार राहा, अशा सूचना दिल्या आहेत. वास्तविक, कोणत्याही देशाचे सैन्य हे युद्धासाठी नेहमी तयारच असते. मात्र, तरीही जिनपिंग असे का सांगत आहेत? यामागचे कारण ते जगाला सांगू इच्छित आहेत की, आम्हाला तुम्ही कमी समजू नका. विशेषतः भारत, जपान, दक्षिण कोरिया, तैवान या शेजारी राष्ट्रांना ते चेतावणी देत आहेत. 

माओ त्से तुंग यांच्यानंतर शी जिनपिंग हे चीनचे सर्वांत शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे (सीएमसी) ते अध्यक्ष आहेत. आपल्याकडे राष्ट्रपती ज्याप्रमाणे तिन्ही दलांचे प्रमुख असतात, तशा प्रकारचे हे पद आहे. अर्थात राष्ट्रपती सैन्याला थेट युद्धाचे आदेश देऊ शकत नाहीत. त्यासाठी एक प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामध्ये पंतप्रधान, संरक्षणमंत्री, आदींची सहमती गरजेची असते; पण चीनमध्ये तसे नाही. चीनमध्ये पूर्ण सत्ता, पूर्ण निर्णयाधिकार राष्ट्राध्यक्षांना आहेत. त्याचप्रमाणे पीएलए याचे ते अध्यक्षही आहेत. त्यामुळे एका अर्थाने ते हुकूमशहा किंवा लष्करशहा असतात. कारण जेव्हा संविधानाप्रमाणे सर्व सत्ताशक्ती, सर्व निर्णयाधिकार एका व्यक्तीच्या हाती दिले जातात तेव्हा ती हुकूमशाहीच असते. शी जिनपिंग आज हुकूमशहाच बनले आहेत. या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी चिनी सैन्याला दिलेल्या इशार्‍यांचा, सूचनांचा, आदेशांचा विचार करावा लागेल. 

भारताने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आपल्याकडे असे म्हटले जाते की, जे कुत्रे भुंकतात, ते चावत नाहीत; पण माझे काम फक्त भुंकणे आहे, मी चावणे अभिप्रेत नाहीये, हे तत्त्व किंवा आडाखा कुत्र्याला माहीत नसतो. त्यामुळे काही वेळा भुंकणारी कुत्रीही चावताना दिसतात. त्याचप्रमाणे आपण शी जिनपिंग यांच्या घोषणांकडे त्यात नावीन्य नाही, त्या नेहमीच्याच झाल्या आहेत अशा दृष्टीने पाहून चालणार नाही. कारण, काही महिन्यांपूर्वी गलवानमध्ये, पूर्व लडाखमध्ये चीनने केलेली आगळीक ही ‘बार्किंग डॉग बायटिंग’च होती. म्हणूनच भारताने अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. 

आज चिनी सैन्याचे प्रशिक्षण तिबेट आणि शिनजियांग प्रांतामध्ये  सुरू आहे. तिथे प्रचंड बर्फवृष्टी होते, वातावरणीय परिस्थिती प्रतिकूल आहे. लडाखसारख्या दुर्गम भागात युद्ध करण्यासाठीच हे प्रशिक्षण सुरू आहे; अन्यथा या प्रशिक्षणाचा उपयोग त्यांना व्हिएतनाम वा जपानशी युद्धासाठी होणार नाहीये. कारण ती समुद्रालगतची राष्ट्रे आहेत. त्यासाठी वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे. ज्याअर्थी चिनी सैन्याला पूर्ण प्रशिक्षण  पहाडी, डोंगराळ भागात दिले जात आहे, त्याअर्थी त्यांचे लक्ष्य काय असणार आहे, हे सहज कळू शकते. गलवानमध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये जेव्हा चिनी सैन्याने घुसखोरी केली त्यापूर्वी जानेवारी महिन्यापासून ते लडाखच्या पूर्वोत्तर भागात 100-150 किलोमीटर दूर अंतरावर युद्धाभ्यास करत होते. अचानक त्यांच्या गाड्या भारताच्या दिशेने वळविण्यात आल्या. यावरून आपण चीनवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. 

1962 पासून 2021 पर्यंतचा चीनचा इतिहास हेच सांगतो आहे की, चीनने भारताचा सातत्याने विश्वासघात केलेला आहे. भारताच्या पाठीत त्यांनी खंजिर खुपसलेला आहे. मागील काळात चीनचे राष्ट्राध्यक्ष दोनवेळा भारतात येऊन गेले. आपल्या पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले, वार्तालाप केला, चर्चा केली. याखेरीज आपले पंतप्रधान गेल्या चार वर्षांत पाचवेळा चिनी राष्ट्राध्यक्षांना भेटले. यावरून भारत-चीन संबंध सुधारले असा डंका अनेकांकडून पिटला गेला; पण चीनने त्यांच्या पूर्वेतिहासानुसार पुन्हा एकदा विश्वासघात केला. त्यामुळे भारताने आता इतिहासाची पुनरावृत्ती होऊ न देता, युद्धासाठी तयार राहायला हवे. 

युद्ध केव्हा होईल, हे कोणीही सांगू शकणार नाही. कारण ते भारताकडून केले जाणार नाही. अलीकडेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीतूनही हे सांगितले आहे की, भारतीय सैन्य युद्धासाठी तत्पर नाही. परंतु, आमच्याविरुद्ध आगळीक केली तर राष्ट्राचा सन्मान कायम राखण्यासाठी ते सक्षम आहेत. ते शत्रूपुढे नतमस्तक होणार नाहीत. हे योग्यच आहे. परंतु, नतमस्तक व्हायचे नसेल तर त्यासाठी   तयारीही तशी असली पाहिजे. ही तयारी केवळ सैन्याचीच असून उपयोगाचे नाही. 21 व्या शतकामध्ये फक्त सैन्याने सावधान राहून चालत नाही. भारतापुढे बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंचे आव्हान अधिक आहे. चीनचे पाठीराखे, समर्थक असणार्‍यांची संख्या आपल्याकडे मोठी आहे. चीन या छुप्या शत्रूंना आर्थिक रसद पुरवत असतो. गेल्या 60 वर्षांत आपल्याकडील काही राजकीय पक्षांनी चीनचा एक बागुलबुवा तयार केला आहे. चीनचे शस्त्रसामर्थ्य, लोकसंख्येचा आकार, आर्थिक स्थिती ही भारतापेक्षा जास्त आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु; सातत्याने ती गोष्ट सांगून आपण आपल्याच राष्ट्रातील लोकांमध्ये चीनविषयीचा एक भयगंड निर्माण केला आहे. त्यामुळेच आज अगदी गावखेड्यातील एखादा सामान्य नागरिकही चीनशी पंगा घेऊ नये, चीन खूप मोठा देश आहे असे म्हणताना दिसतो.  ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तसेच भारतात चीनसाठी काम करणारे जे लोक आहेत त्यांचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे. थोडक्यात, आपल्याला चीनशी मुकाबला करताना सर्व पातळीवर प्रयत्न करावा लागेल. 

चीनची जी शक्ती आहे, दादागिरी आहे तिच्या मुळाशी त्यांची आर्थिक ताकद आहे. त्यामुळेच आपण या मुळाशी घाव घालणे आवश्यक आहे. भारतीयांनी जर चिनी वस्तूंची खरेदी थांबवली तर चिनी अर्थव्यवस्थेला धक्के बसतील. याचे परिणाम युद्धक्षमतेवर झाल्याशिवाय राहणार नाहीत.  त्यामुुळे सामरिक सामर्थ्य वाढविताना, राष्ट्रीय जनमानस तयार करताना आर्थिक बाबतीतही चीनला शह दिला पाहिजे.

आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारत, कर्मयोगी भारत हे आपल्या पंतप्रधानांनी दिलेले नारे हा चीनविरुद्धच्या युद्धाच्या तयारीचाच एक भाग आहे. आज भारत हा संरक्षणक्षेत्रातील सर्वांत मोठा आयातदार आहे. आपण शस्रास्रांसाठी, युद्धसामग्रीसाठी एखाद्या देशाकडे मागणी केली तर ती लगेच मिळत नाहीत. त्यासाठी काही महिने, वर्षे वाट पाहावी लागते. कोट्यवधी परकीय चलन मोजावे लागते.  त्यामुळे चीनच्या आव्हानाचा विचार करता भारताने युद्धक्षमतेत वाढ करण्यासाठी आतापासूनच पावले टाकली पाहिजेत. ज्याप्रमाणे पावसाळ्यात आपल्याकडे छत्री असेल तर फारशी भीती वाटत नाही, तशाच प्रकारे चीनविरुद्धच्या संभाव्य युद्धाचा विचार करता आपल्याकडे संरक्षणसिद्धता, राष्ट्रीय मानसिकता, आर्थिक क्षमतेची छत्री आवश्यक आहे.